श्रीमती उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ गा बेटी गा… भाग – 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण पाहीलं – तिच्या डोळ्यापुढे आपल्या वडिलांची गाणारी मूर्ती… त्यांनी कुठे कोणते आलाप घेतले, ताना घेतल्या, मींड घेतली… हेच सारं तिला दिसू लागलं. आता इथून पुढे -)
दुस-या दिवशी साधना बॅंकेतून घरी आली तर निरंजनने पाठवलेलं पत्र मिळालं.
‘छान! म्हणजे हा काही कोणार्कहून सरळ घरी येत नाही. कुठे कुठे हिंडूण, मैफली गाजवून येणार स्वारी… त्याला कितीदा सांगितलं, अशी परस्पर आलेली आमंत्रणं स्विकारू नकोस…’ असं पुटपुटत साधनानं पत्र फोडलं.
‘साधना गेले वर्षभर मी एका प्रचंड वादळात सापडलोय. संसार की संगीत… मला वाट दिसत नव्हती. भोवतीनं दाट धुकं आहे आणि मला श्वासही घेता येत नाही असं वाटत होतं.
मनाशी खूप झगडून मी संगीताच्या वाटेवर पावलं ठेवलीत. प्रज्ञा माझी साथसंगत करणार आहे.
माझ्यासाठी केव्हापासून तिने आपलं घर सोडून यायची तयारी दाखवलीय. माझाच निर्णय होत नव्हता.
वाटत होतं, मी तुझ्यावर खूप अन्याय करतोय. अजूनही वाटतंच. मी तुझा ऋणाईत आहेच. शेवटपर्यंत तसाच राहीन. तुझ्यामुळेच माझा कलंदराचा संसार मार्गी लागला. त्यासाठी तुला तुझं आवडतं संगीतही सोडावं लागलं, हे कसं विसरू? त्यासाठी तुला तुझी आवडती संदीताची करिअर सोडावी लागली, हे तरी कसं विसरू? पण, या कलंदराला साथ द्यायला, सावरायला, सांभाळायला तुझे हातच आता रिकामे नाहीत…
वाचता वाचता साधनाच्या मनापुढे तिचा भूतकाळ उभा राहिला. गाण्यानेच त्यांना जवळ आणलं होतं. दोघेही साधुरामांचे पट्ट शिष्य. या दोघांबद्दलही खूप आशा बाळगून होते ते! आपल्या घराण्याचा नावलौकिक दोघेही वाढवतील याबद्दल साधुरामांची पक्की खात्री. गाता गाता दोघेही एकमेकांत गुंतत गेले. पुढे लग्न करून अगदी एकमेकांचे झाले. संगीताच्या क्षेत्रात दोघेही अजून धडपडत होते. अजून नाव व्हायचं होतं. दोघांनाही मैफलीसाठी स्वतंत्रपणे निमंत्रणे यायची. पुढे वर्षभरात मधू झाली आणि त्यांच्या लक्षात आलं, दोघांनाही विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर घेऊन हिंडणं शक्य नाही. कुठे तरी स्थिर झालं पाहिजे. वाढल्या संसाराला स्थैर्य येण्यासाठी निश्चितपणे आणि नियमितपणे अर्थप्राप्ती होणारा व्यवसाय पत्करणं जरूर होतं. मग साधनाने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. निरंजनने मात्र गाणं आणि गाणचं करायचं. साधनाला बॅंकेत नोकरी मिळाली. घराला स्थैर्य आलं. मधूच्या पाठीवर तीन वर्षांनी अनूप जाला. वर्षे सरत गेली. नावलौकिकाच्या पायऱ्या चढत निरंजन नामांकित गायक झाला. घराणेशाहीत बंदिस्त झालेल्या शास्त्रीय संगीताला त्याने अभ्यास, प्रयोगशीलता याच्या साहाय्याने नवी झळाळी, नवा चेहरा देण्याचा प्रयत्न केला. लोकसंगीताला शास्त्रीय बैठक देण्याचा त्याने प्रयत्न केला. हे सारं खूप लोकप्रिय झालं. रसिकांमध्ये, जाणकारांमध्ये त्याने स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण केले.
अलीकडे अलीकडे साधनाला जाणवत होतं. स्वरांचा धागा पकडून निरंजन उंच उंच जातोय. त्याच्या दृष्टीच्या कवेत केवढा तरी विशाल विस्तार आहे. आपण मात्र जमिनीवरच उभे आहोत आणि तो सप्तसुरांचा धागा आपल्या हातून निसटत चाललाय. छे! केव्हाच निसटून गेलाय. आता आपलं गाणं हौशानवशा गायिकेइपतपच! बॅंकेमधली नोकरी करता करता इतके रूक्ष होऊन गेलो का आपण? कधी झालं असं? निरंजनच्या रियाजाच्यावेळी त्याने एखादी सुंदर जागा घेतली, एखादी अवघड तान घेतली तर पूर्वीसारखी आपली झटकन् दाद जात नाही. कामाच्या घाईत आपल्या लक्षातच येत नाही. कान जणू बधीर झालेले… त्या गाण्यातल्या, स्वरातल्या लावण्यकळा आपल्या मनाला उमगायच्याच नाहीत. निरंजनमधला कलावंत मग नाराज व्हायचा. पत्रातून त्याने हीच वस्तुस्थिती मांडली होती. पण, व्यवहाराच्या साऱ्या जबाबराऱ्या पेलता पेलता ती इतकी थकून जायची की त्याला अपेक्षित असलेलं ताजं, टवटवीत, तरल मन तिच्याकडे उरलेलंच नसायचं.
पुढे मधू गाणं शिकायला लागली. तिचा आवाज, तिची गाण्यातली जाण पाहून साधनाने आपल्या आशा-आकांक्षा तिच्यावर केंद्रित केल्या. आपली स्वप्नपूर्ती ती तिच्यात शोधणार होती. मधूला चांगली गायिका बनवायचं. दहावीची परीक्षा झाली की तिच्या गाण्यावर भर द्यायचा. कॉलेजचं शिक्षण दुय्यम, असं त्यांनी केव्हाच ठरवून टाकलं होतं. मधूलाही दहावीचं वर्ष कधी पार पडतंय असं झालं होतं… आणि आज अचानक निरंजन घर सोडून गेला होता प्रज्ञाबरोबर…
क्रमश:…
© श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈