सौ राधिका भांडारकर

??

? पंडिता रमाबाई सरस्वती ? सौ राधिका भांडारकर ☆

पंडिता रमाबाई सरस्वती

५ एप्रिल १९२२. पंडीता रमाबाई सरस्वती यांचा मृत्युदिन.

राष्ट्रीय व अंतराष्ट्रीय स्तरावर,मूलभूत सामाजिक कार्यासाठी गाजलेलं पहिलं अलौकिक भारतीय महिला व्यक्तीमत्व!

स्त्रियांसाठी अत्यंत भीषण असा काळ. बालविवाह,जरठ कुमारी विवाह,पतीनिधनानंतर केशवपन करुन केलेला तिचा मानसिक छळ. माणूस म्हणून जगण्याचे तिचे सारे अधिकारच हिसकावून घेतले जायचे. मन मारुन एका अंधार्‍या खोलीत तिचं जीवन कुरुपतेत सडायचं. अशा समाजानं अव्हेरलेल्या पीडीत स्त्रियांच्या मागे पंडीता रमाबाई खंबीरपणे उभ्या राहिल्या. बालविधवांच्या पुनर्वसनासाठी त्या झटल्या.

वास्तविक त्या काळातल्या अनेक सांकेतिक, पारंपारिक समाजजीवनाला हादरून सोडणार्‍या घटना त्यांच्या जीवनात घडल्या. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमीही  तशीच होती.

त्यांचे वडील अनंतशास्त्री डोंगरे हे स्त्रीशिक्षणाचे पुरस्कर्ते होते. त्यांनी  त्यांच्या पत्नीलाही शिक्षित केले. आणि रमाबाईंना विवाह बंधनात न अडकवता तिच्यासाठी शिक्षणाचे दार ऊघडले. त्यांचा संस्कृत या भाषेचा पाया मजबूत करुन घेतला. मातृभाषेइतकेच संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते.

रमाबाईंच्या डोळ्यासमोर अनेक स्वप्ने होती. त्यांचे गगन अफाट अथांग होते. पण त्यांच्या वैयक्तिक जीवनात त्यांच्यावर दुर्दैवाचे अनपेक्षित आघात झाले. सोळाव्या वर्षीच त्यांचे प्रिय माता पिता, बहीण यांचे निधन झाले. मात्र तरीही त्यांनी स्वत:ला सावरलंं. त्यानंतर त्या भारतभर हिंडल्या.

जिथे जातील तिथे त्यांनी स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार केला.

स्त्रियांची परवशता,गुलामगिरी,विधवांची विदारक स्थिती त्यांनी जवळून पाहिली. त्यांच्या दु:खाने त्यांचे काळीज विदीर्ण झाले आणि या स्त्रियांसाठी काहीतरी ठोस  केलेच पाहिजे हेच त्यांचे जीवन ध्येय बनले. स्त्रीशिक्षण या मूळ मुद्याचाच विचार करताना, स्त्रियांसाठी विद्यालय काढण्याची प्रेरणा त्यांना मिळाली.

भावाच्या निधनानंतर त्या खूप एकट्या पडल्या. बंगालमधे असताना,बिपीन बिहारी मेघावी या तरुणाच्या प्रेमात त्या पडल्या. विवाहबद्धही झाल्या. मात्र हा युवक खालच्या जातीतला असल्यामुळे त्यांच्या विवाहाला प्रचंड विरोध झाला.

त्याकाळातला हा पहिला अंतर्जातीय, अंतर्प्रांतीय अंतर्भाषिक विवाह होता. संकुचित समाजाचा विचार न करता स्वत:च्या मनाचा कौलच त्यांनी मानला.

पतीबरोबर त्या आसामला आल्या. त्यांना एक कन्याही झाली. पण दैवयोग निराळेच होते. सुखाचे दिवस फार काळ थांबले नाहीत. जोडीदाराच्या स्वर्गवासाने त्या पुन्हा एकट्या पडल्या. आणि पुन्हा महाराष्ट्रातच आल्या.

स्त्रीशिक्षणाचा सतत पाठपुरावा करत त्या व्याख्यानांच्या माध्यमातून प्रबोधन करु लागल्या. महात्मा ज्योतिबा फुल्यांप्रमाणेच त्यांनी १८८२ साली हंटर कमीशन समोर स्त्रीशिक्षणाच्या बाजूने साक्ष दिली. त्यांच्या भाषणाने स्वत: हंटर हेही प्रभावित झाले. इंग्लंडला परतल्यावर ते रमाबाई. . एक विलक्षण स्त्री व्यक्तीमत्व यावरच बोलले. सभागृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. सर्वांनी ऊभे राहून रमाबाईंना मानाचा मुजरा दिला.

त्यांना वैद्यकीय शिक्षण घ्यायचे होते. त्यावेळी मद्रास मेडीकल काॅलेजात स्त्रियांना प्रवेश मिळत असे. पण रमाबाईंना मात्र इथे प्रवेश नाकारला. मग त्या ‘द सिस्टर्स आॅफ द कम्युनिटी अॉफ सेंट मेरी द व्हर्जीन,वाँटेजया संस्थेच्या मदतीने त्या इंग्लंडला गेल्या. मात्र तिथेही त्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी त्यांना प्रवेश मिळाला नाही. कारण त्यांना कमी ऐकू येत होतं. भारतात प्रवास करत असताना ,अघोरी थंडीत त्यांचे श्रवणकेंद्र बाधित झाले होते.

पण इंग्लंडमधे त्यांचे वास्तव्य गाजले ते त्यांच्या धर्मांतरामुळे. त्यांनी ख्रिश्चन धर्माची दीक्षा घेतली. भारतात तेव्हां हाहाकार उडाला. धर्म बदलला तरी त्यांनी भारतीयत्वाचा त्याग केला नव्हता. त्यांच्या क्राॅसवरचे शब्दही संस्कृत भाषेत कोरले होते. त्या म्हणाल्या, “जुन्या आणि चांगल्या गोष्टी मला प्रिय आहेत. देशहिताला बाधक असणार्‍या गोष्टी माझ्या हातून कधीही घडणार नाही.”

स्वतंत्र बाण्याच्या, चिंतनशील वृत्तीच्या त्या होत्या.

सदैव त्यांनी मनाचा कौल स्विकारला. समाजाचे,परंपरेचे भय बाळगले नाही. त्यांचे विचार स्पष्ट होते. आत्मनिष्ठा जबरदस्त होती. कोणत्याही सत्तेला  ठणकावून जाब विचारण्याचा बंडखोरपणा असलेली ती एक तेजस्विनी होती.

पहिली भारतीय महिला डाॅक्टर आनंदीबाई जोशी या त्यांच्या समकालीन. रमाबाईंचा त्यांच्याशी स्नेह होता. त्यांच्यात समान विचारधारा होती. पीडीत, शोषित भगिनींचे पुनर्वसन हेच दोघींचे ध्येय होते. परंतु या समान विचारांच्या बुद्धीमान स्त्रियांना एकत्र काम करण्याची संधी मिळाली असती तर  नवसमाज घडला असता. डॉ. आनंदीबाईंचे अकाली निधन  झाल्यामुळे समाज एका क्रांतीस मुकला.  

रमाबाई म्हणजे एक वैचारिक तुफान होते. प्रश्नांच्या मुळांशी त्या जात. त्या अत्यंत जागरुक आणि तितक्याच संवेदनशील होत्या. ग्रंथवाचन, धर्मचिकीत्सा, चर्चा, भाषणे, प्रवास, पत्रलेखन हे त्यांचे आवडते कार्यक्रम. समाजाने त्यांच्या निष्ठेची ऊपेक्षा केली. निंदा केली.. पण तरीही, येशुच्या तत्वासमान त्यांनी त्यांना माफ केले. त्याच समाजासाठी त्या मनापासून झटल्या.

त्यांचे गडद तेजस्वी घारे डोळे,सरळ नाक, शुभ्र दंतपंक्ती, काळे दाट केस हे त्यांचे सुंदर रुप!  विलक्षण मोहमयी तेजस्विताच! बुद्धीमत्तेचं एक वेगळं वलय त्यांच्या भोवती होतं.

कलकत्ता ही राजाराम मोहन राय, ईश्वरचंद्र विद्यासागर, केशवचंद्र सेन यांसारख्या सुधारकांची भूमी. सन १८७८ मधे या भूमीने, रमाबाई डोंगरे या प्रज्ञावतीला पंडीता रमाबाई सरस्वती ही पदवी बहाल केली.

केशवचंद्रांनी त्यांना वेदांचा अभ्यास करायलाही लावला. जो त्या काळी स्त्रियांसाठी निषीद्ध होता.

अशी ही स्वयंसिद्धा! केडगाव ही त्यांची कर्मभूमी. तिथे त्यांनी विधवांच्या पुनर्वसनासाठी आश्रम उभारला. आज तिथे काही सामानसुमान आहे. रमाबाईंची काही पेंटींग्ज आहेत. त्यांचे थडगेही आहे.

पण वाईट याचेच वाटते की हे सारं मोडकळीस आलेलं असून दुर्लक्षित आहे. डाॅ. आनंदीबाईंचं  स्मृतीस्थळ अमेरिकेत जतन केलं गेलं मात्र पंडीता रमाबाई सरस्वती या, स्त्रियांच्या समस्येसाठी जाणीवपूर्वक लढा देणार्‍या तेजस्वितेचे स्मृतीस्थळ मात्र आज शोचनीय स्थितीत आहे!

त्याचा जीर्णोद्धार व्हावा ही आशा बाळगून,एक स्त्री म्हणून कृतज्ञतेने मी त्यांच्या स्मृतीदिनी त्यांना वंदन करते!!

 

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments