सुश्री अरूणा मुल्हेरकर
कवितेचा उत्सव
☆ वासंतिक मास… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
(अष्टाक्षरी)
वासंतिक मास आला
सृष्टी संपन्न जाहली
प्रतिपदा शुभ दिन
गुढ्या तोरणे सजली॥१॥
गुढी पाडवा म्हणती
सीता राम आले घरा
अंगणात रंगावली
होतो आनंद साजरा ॥२॥
मांगल्याची गुढी उभी
बांधुनिया वस्त्र जरी
साखरेची शोभे माळ
लांब अशा काठीवरी ॥३॥
वाद्ये मंगल वाजती
वर्षारंभ मराठ्यांचा
सुमुहूर्त शुभकार्या
घास श्रीखंड पुरीचा ॥४॥
नव वर्षाची प्रतिज्ञा
करू आपण सर्वांनी
नको राग नको द्वेष
प्रेमे राहू उल्हासानी ॥५॥
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈