श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(प्रस्तुत है श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी की एक अतिसुन्दर शृंगारिक भावप्रवण कविता । )
तिच्या नाजूक ओठांवर तिळाने स्वार का व्हावे ?
दिसाया कृष्णवर्णी तो तरी हे भाग्य लाभावे
मलाही वाटतो आता नकोसा जन्म हा माझा
मनी या एवढी इच्छा तिच्या ओठीच जन्मावे
सखा होण्यातही आता कुठे स्वारस्य हे मजला
उभा हा जन्मही माझा करावा मी तिच्या नावे
कळेना सूर मी कुठला तिच्या गाण्यातला आहे
मला तर एवढे कळते तिचे मी शब्द झेलावे
तिच्या कोशात मी इतका असा बंदिस्त का झालो ?
मुलायम रेशमी धागे कसे हे पाश तोडावे
तिच्या नजरेतली भाषा कळे नजरेस या माझ्या
तिच्या एकेक शब्दांचे किती मी अर्थ लावावे
किती बरसात प्रीतीची नदीला पूर आलेला
मिळालेली मने दोन्ही कशाला पूल बांधावे
© अशोक भांबुरे, धनकवडी
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८