सौ.ज्योत्स्ना तानवडे
मनमंजुषेतून
☆ गीतरामायण.. एक सुखद अनुभव… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
आयुष्यातील एक सुखद अनुभव. गीतरामायण.
आधुनिक वाल्मिकी कविवर्य ग. दि.माडगूळकर आणि संगीतकार सुधीर फडके यांचे गीत रामायण माझ्या विशेष जिव्हाळ्याचे आहे. एप्रिल १९५५ मध्ये या गीतरामायणाचे पहिले गीत प्रसारित झाले आणि १९५५ मध्ये माझा जन्म झाला. नकळत त्या गीतांशी नाळ जोडली गेली असणारच. मला आठवते बारा तेरा वर्षांची असताना पुन्हा ही सर्व गाणी वर्षभर आकाशवाणीवर सादर होत होती. तेव्हा रेडिओ वरून ऐकत ऐकत सर्व गाणी लिहून घेतली होती. पुढे त्याचे पुस्तक घेतले.बहुतेक सर्व गाणी मला पाठ होती.
बाबुजी सुधीर फडकेंचे गीतरामायण मैफिलीत अगदी त्यांच्या गादीसमोर बसून ऐकलेले आहे.त्यांची सही जपून ठेवली आहे.
सुधीर फडके, पुरुषोत्तम जोशी यांचे निवेदन मनाला भुरळ घालत होते. वयाबरोबर या गीतरामायणाची ओढ वाढतच गेली, जी आजही टिकून आहे. शहरापासून लांब राहत असल्याने कधी संधीच मिळाली नव्हती. पण कधीतरी या गीतरामायणाच्या सादरीकरणाचा भाग होण्याची तीव्र इच्छा होती.गीतरामायणाला पन्नास वर्ष पूर्ण होताना ही इच्छापूर्ती झाली.
२००५ साली सुवर्णमहोत्सवी वर्ष होते.सांगलीत श्री. फडणीस सर आणि त्यांचे सहकारी सुवर्णमहोत्सवानिमित्त मोठा कार्यक्रम करणार होते. मला त्याचे निवेदन करण्यासाठी विचारणा झाली. अनपेक्षितपणे हे सुवर्णदान माझ्या झोळीत पडले.
दोन दिवस कार्यक्रम करून ३६ गाण्यांचे सादरीकरण आम्ही केले. खूप मोठा बहारदार कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. दोन्ही दिवशी नाट्यगृह तुडुंब भरून आवारात गर्दी झाली होती. कार्यक्रम अप्रतिम झाला. लोकांकडून कौतुकाची पसंती भरभरून मिळाली. अतिशय आनंद झाला. एका वेगळ्याच तृप्तीने मन भरून गेले.
आणखीन तीन चार ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही सादर केला.माझी इच्छा रामरायानेच अतिशय सुंदर पद्धतीने पूर्ण केली होती. माझ्या वयाची पन्नाशी गीतरामायणाच्या सुवर्णमहोत्सवाबरोबर अशी दणक्यात साजरी झाली. ही गोष्ट माझ्या मर्मबंधातली ठेव बनून राहिली आहे.
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈