श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ गुलामी ☆
गुलामी मी तुझी केली मला सांभाळ आयुष्या
छळाया गाठतो कायम तुझा वेताळ आयुष्या
मिळाला जन्म भूवरती किती आनंदलो होतो
इथे तर स्वर्ग नाही रे इथे पाताळ आयुष्या
तनावर मारला आहे फवारा अत्तराचा मी
मनाच्या सागरी आहे तरीही गाळ आयुष्या
दिले ना पंख तू मजला गगन मी भेदले नाही
जुळेना ही तुझी माझी कशी रे नाळ आयुष्या ?
शमवण्या आग पोटाची करावे लागते सारे
सुखाने घातले पायी कुठे मी चाळ आयुष्या
जिथे जावे तिथे अडचण उभी ही ठाकते आहे
कशी ही नांगरावी मी भुई खडकाळ आयुष्या
किती सोसायची दुःखे सुखाचे दिवस हे काही
दिवाळी ईदच्या सोबत असे नाताळ आयुष्या
तख़ल्लुस मागते आहे मला मक्त्यात ही कायम
समजती लोक तर येथे मला नाठाळ आयुष्या
हरावे मी कशासाठी तुझ्या पाहून ह्या ज्वाळा
सुवर्णाचीच ही काया कितीही जाळ आयुष्या
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈