श्री अरविंद लिमये
विविधा
☆ फाटकी झोळी… ☆ श्री अरविंद लिमये ☆
आजवरच्या इतिहासात अनेक समाजसुधारकांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजातील अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी जनजागृतीचे व्रत स्वीकारले.सामान्य माणसावर नकळत होणारे अन्याय नाहीसे होऊन त्याचे जगणे अधिक डोळस आणि सुखकर व्हावे यासाठी त्यांचा अविरत संघर्ष सुरू असायचा.
संत ज्ञानेश्वर ते संत तुकाराम ही सलग चार शतकांच्या प्रदीर्घ काळात महाराष्ट्राला लाभलेली संतपरंपरा ! या मांदियाळीतील प्रत्येक संतमहात्म्याचे आयुष्य प्रचंड विरोध, त्याग आणि संघर्ष यांनी व्यापलेले होते. सकल जनांना निखळ समाधानाचा मार्ग प्राप्त व्हावा यासाठी ते सातत्याने जनजागृती करीत राहिले.
भारतीय संस्कृतीला अपेक्षित असणाऱ्या मूल्यांचे रोपण समाजमनात करीत, त्यांच्या उन्नतीसाठी जनजागृती करीत या थोर व्यक्तींनी आपली उभी आयुष्यं खर्ची घातलेली आहेत. तरीही ‘खऱ्या अर्थाने जागृती झाली आहे असे म्हणता येईल का?’ हा प्रश्न पडावा अशीच परिस्थिती आजही सभोवताली दिसून येते. अंधाराचे स्वरूप बदलले तरी भोवताली मिट्ट काळोखच असावा अशीच परिस्थिती आजही भोवताली दिसून येतेच.
तेराव्या शतकापासून आजच्या बाविसाव्या शतकापर्यंत प्रदीर्घ काळ उलटून गेल्यानंतरही सर्व संतमहात्म्यांच्या जनजागृती करणाऱ्या अभंग-रचना आणि मौलिक ग्रंथ भांडार अनेक पिढ्या प्राणपणाने जपणारे आपण खऱ्या अर्थाने जागृत झालेलो आहोत कां?की अजूनही आर्थिक न् भौतिक स्तर उंचावूनही समाजमन सुप्तावस्थेतच राहिले आहे ? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे उत्साहवर्धक असणे शक्यच नाही ही वस्तुस्थिती आहे.यात दोष नेमका कुणाचा? जनजागृतीचं अखंड व्रत प्राणपणाने जपत भरभरुन देणाऱ्या संतमहात्म्यांचा की ते दान घेणारी आपली झोळीच फाटकी असणाऱ्या समाजमनाचा ??
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈