श्रीमती उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ एक (अ) विस्मरणीय प्रकाशन समारंभ – भाग-5 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण पहिलं-, सगळं अस्ताव्यस्त झालं. कुणी टाळ्या वाजवत होतं. कुणी स्टेजवर काही ना काही फेकत होतं. कुणी फेकण्याचा नुसताच आविर्भाव करत होते. कदाचित त्यांनी आणलेली सामग्री संपली असावी. आता इथून पुढे )
मी माझ्या कादंबरीच्या निर्मितीविषयी माझं मनोगत प्रगट करणार होतो. परंतु बोलण्यासाठी मी तोंड उघडल्यापासून ज्या टाळ्या वाजायला सुरुवात झाली, त्या थांबेचनात. मी खुर्चीवर जाऊन बसेपर्यंत टाळ्या वाजतच राहिल्या. सुबोध माझ्या कानाशी कुजबुजत म्हणाला, ‘‘घाबरू नको! मी पोलिसांना फोन करून येतो.” समारंभाचं हे सगळं वातावरण बघून अध्यक्षांनी अध्यक्षीय समारोप न करताच समारंभ संपल्याचं जाहीर केलं.
दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रातही प्रेक्षक मंडपातलं वातावरण असंच राहिलं. नाव होणं दूरच… आता साहित्यिकांमध्ये एवढी बदनामी आणि अप्रतिष्ठा होईल, की विचारायला नको. सगळ्या समारंभाची चित्तरकथाच झाली.
दुसऱ्या दिवशी झाल्या गोष्टीचा जाब विचारायला हेल्पलाईन फर्ममध्ये मी दरवाजापर्यंत पोचतोय, तोच नकुल तिथून गडबडीने बाहेर पडताना दिसला. त्याचं बहुधा माझ्याकडे लक्ष नसावं. आता हा इथे? म्हणजे… हाही त्याचा कविता संग्रह छापून बसलाय की काय? हातात निमंत्रण पत्रिकाच देऊन आम्हाला आश्चर्याचा धक्का देणार की काय? बिचाऱ्याने माझा प्रकाशन समारंभ व्यवस्थित पार पाडावा, म्हणून केवढी खटपट केली होती. एक दोन टोमॅटो, त्याच्या नि सुबोधच्या अंगावरही फुटले होते. ठीक आहे. त्याच्या कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या वेळी मी त्याने केलेल्या मदतीची जरूर भरपाई करीन.
आत गेलो, तर समोर तीच… दगडी सुशीलाजी… मला पाहताच तिने सुरू केलं,
‘‘आपले साडे सात हजार रुपये झाले. उरलेले अडीच हजार अकरा वाजता आमची अकाउंटंट येईल, तिच्याकडून घेऊन जा.”
मला इतका राग आला होता, की माझ्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता. कसं तरी रागावर नियंत्रणा मिळवत मी म्हटलं,
‘‘कसले साडे सात हजार? तुम्ही माझे सगळे पैसे परत दिले पाहिजेत. इतकंच नाही, तर अब्रू नुकसानीबद्दल मला काही रक्कम मिळाली पाहिजे. नाही तर मी ग्राहक न्यायालयात जाईन.”
‘‘तसं तुम्ही करू शकणार नाही.” ती दगडी आवाजात म्हणाली.
‘‘का करू शकणार नाही? आम्ही माल एका प्रकारचा मागवला, पण तुम्ही दुसराच पाठवलात. आम्ही मागवले, खास श्रोते नि तुम्ही मात्र पाठवलेत अद्वितीय म्हणजे विध्वंसक श्रोते. माझ्या सगळ्या समारंभाचा बट्ट्याबोळ झाला. विध्वंस झाला. मी पोलिसात जाईन. फिर्याद करेन.”
‘‘महाशय थांबा जरा ! आपला काही तरी गैरसमज होतोय!” तिने रॅकवरून एक फाईल काढली. माझ्यापुढे ती फाईल ठेवली. कागदावर लिहीलं होतं, नूतन सभागृहात खालील लोकांनी जायचे आहे. त्याच्याखाली शंभर नावे व त्यांच्या सह्या होत्या. कार्यक्रमाची वेळ लिहिलेली होती आणि ती मंडळी परतल्यानंतरची वेळ घातलेली होती. ती म्हणाली, ‘‘बघा! नीट बघा! या हिरव्या फाईली आम्ही खास श्रोत्यांसाठी बनवलेल्या आहेत.”
‘‘तरीही आपण काही तरी चूक केलीय. माझ्या समारंभात अद्वितीय श्रोते आले होते.”
‘‘पन्नास अद्वितीय श्रोत्यांचीही ऑर्डर होतीच! हे बघा ना!” तिने एक लाल रंगाची फाईल काढली आणि उघडून माझ्यापुढे धरली. स्थळ – नूतन सभागृह. कार्यक्रमाची वेळ मी दिलेलीच होती. त्याखाली पन्नास नावे आणि सह्या होत्या. येण्या-जाण्याच्या वेळेच्या नोंदीसकट.
‘‘माझा समारंभ उधळून लावायची ऑर्डर? कुणी दिली ऑर्डर?”
‘‘आता आताच ते महाशय इथून गेले.”
‘‘पण तुम्ही ही ऑर्डर स्वीकारलीच कशी?”
‘‘आमची ही फर्म म्हणजे एक प्रकारचं दुकानच आहे, असं समजा ना! ज्या गि-हाईकाला, जेव्हा, जसा माल हवा असेल, तसा आम्ही पाठव्तो. दुकानात नाही, दोन-तीन कितीही गि-हाईकं अनेक प्रकारचा माल मागतात आणि दुकानदारही ज्याला जो माल हवा, त्याला तो देतो.”
‘‘अहो, पण एकाच समारंभार असे भिन्न प्रकारचे श्रोते म्हणजे…”
‘‘दुकानदार नाही, एकाच घरात साखर आणि डी.डी.टी.ची पावडर देत?”
या दगडापुढे डोकं आपटण्यात काही अर्थ नव्हता. चालता चालता एकेक गोष्ट स्पष्ट होत गेली. दंगा झाला तो नकुलच्या प्रास्ताविकानंतर. मगाशी नकुलचं माझ्याकडे लक्ष गेलं नाही, असं नसणार. त्याने तसं दाखवलं असणार. पण… पण… हे असं कसं झालं? नकुल तर माझा जीवश्च कंठश्च मित्र! लहानपणी आम्ही शाळेत असताना जीवश्च कंठश्चची व्याख्या गमतीने, कंठ दाबून जीव घेणारा अशी करायचो. त्याचा आता प्रत्यक्ष प्रत्यत घेतला. असाही एक अनुभव. पुढे मागे लेखनात वापरूयात म्हणा!
नंतर मला कळलं, त्या फर्ममध्ये सुबोधच नकुलला घेऊन गेला होता. त्यानंतर असंही कळलं, की सुबोधकडून कंपनीला जेवढ्या ऑर्डर्स मिळतील त्या प्रमाणात त्याचं कमीशन सुबोधला मिळतं. तर असे माझे जान घेणारे जानी दोस्त. त्यांनी माझं केलेलं शोषण माझ्या ‘‘मातीच्या चुली” मधील पात्रांच्या शोषणापेक्षा कमी आहे का हो? वाचकहो, तुम्हीच निर्णय करा! अर्थात त्यासाठी कादंबरी वाचायला हवी. शऱ्याने मुखपृष्ठ बदललं नसेल, तर मूळ पुस्तकाला कव्हर घालून वाचतोय असं समजा.
अजूनही आमची पंचकडी आहे तशीच आहे. म्हणजे… जीवश्च.. कंठश्च. मला काही झाल्याचे मी काही कुणाला दाखवले नाही. तरी पण कधी तरी मी याचा बदला घ्यायचा ठरवलाय. पण कसा? तेच अजून सुचत नाहीये. तुम्ही सुचवाल? एका लेखकाला साहित्यिक बदला घेण्याचा उपाय… सुचवाल कुणी उपाय?
– समाप्त –
© श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈