सौ राधिका भांडारकर
कवितेचा उत्सव
☆ महामानव… ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(14 एप्रिल 1891 – 6 डिसेंबर 1956)
धम्मम शरणं गच्छामी….!!
तूच महामानव।तूच महानायक।
तू असे क्रांतीसूर्य। बहिष्कृतांचा उद्धारक।
तू ज्ञानवंत मनोज्ञ। स्त्रियांचा मुक्तीदाता।
मानवतेचा कैवारी। कनिष्ठांचा ऊद्गाता।
भासली मनुस्मृती ।असमानतेची धुळवड।
करुनी तिचे दहन।भरली स्त्रीमुक्तीची कावड।
केली धडपड। क्षणभर नसे विराम
जागा करावया।हिंदुह्रदयीचा राम।
लढा समतेचा। लढा मानव्याचा
सत्याग्रह चवदार। हक्क पाण्याचा।
दुराग्रही इमारतीला। विचारांचा सुरुंग
धडधडलाआणि।फोडला धर्माचा तुरुंग।
काढली कवचे । हिंदु धर्माची
स्वीकारला धम्म। जिथे चाड शूद्राची।
ओळख भीमाची। घटनेचा शिल्पकार
वंदन महामानवा। तूच समतेचा चित्रकार।।
© सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७
मो. ९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈