सौ राधिका भांडारकर
जीवनरंग
☆ वाळा….भाग 1 ☆ सौ राधिका भांडारकर ☆
आज ताईच्या ‘भक्तीचाच ठेवा’ या संगीत कार्यक्रमाचा शंभरावा प्रयोग होता. त्या निमीत्ताने पात्रेसरांनी ताईच्या सत्काराप्रती एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. सभागृह प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. अलीकडे हा अनुभव प्रत्येकच प्रयोगाच्या वेळी येतोच.
आज या कार्यक्रमाची भूमिका , संकल्पंना, प्रेरणा याविषयी ताईच्या संगीत गृपमधील मान्यवर बोलणार होते. ताईही तिचे मनोगत व्यक्त करणार होतीच.
मंचावर सुंदर सजावट केलेली होती. फुलांची आकर्षक आरास होती. ऊदबत्त्यांचा दरवळ होता. समयांचा मंद,मंगल प्रकाश होता. वाद्यांचा जुळलेला मेळ होता. खरोखरच सारं वातावरण संगीतमय, मंगल, पवित्र वाटत होतं. वातावरणात मंद यमन रागाची धून वाजत होती. सुरावटीतील कोमल शांत सूर मनावर तरंगत होते.
ताईच्या मनातआनंद, समाधान, होतच पण पपांची खूप आठवण येत होती.
आज पपा हवे होते..!!
त्यांच्या बाबीचा हा सोहळा बघून ते खूप भरुन पावले असते. त्यांचे तेज:पूंज डोळे पाणावले असते. त्यांच्या अश्रुंच्या थेंबांतून अनेक आशीर्वाद झरले असते.
शाळेतच होती ताई. लहान होती. तसं गाणारं घरात कुणीच नव्हतं. मात्र पपांना संगीताची उत्तम जाण होती.त्याहूनही भारतीय शास्रीय संगीताची मनापासून आवड होती. सुरेल होता त्यांचा आवाज. पहाटे पहाटे ते अभंग, ओव्या गात. ते ऐकत रहावेसे वाटे. शिवाय रात्री झोपताना आकाशवाणीवरची संगीत सभा ऐकतच निद्राधीन व्हायचं, हा शिरस्ता.
एक दिवस ताई सकाळी ऊठली आणि सहजच भूप रागातीलसरगम गाऊन गेली.आणि पपा म्हणाले, “वाह! बाबी, कमाल संगीत आहे तुझ्यात. “
“काहीतरीच काय पपा? मी आपलं सहजच गुणगुणले.बाकी माझा हा जाडा आवाज,मी काय गाणार?”
“अग! मग पेटी वाजवायला शिक.सतार वाजव.”
ताई ठासून म्हणाली ,
“पपा ,भलती सलती स्वप्ने पाहू नका. आणि मला वाद्य संगीतापेक्षा गायककीच आवडते. पण माझा हा घोगरा आवाज…?जाऊदे! गाणं ऐकण्याची मजा मला पुरेशी आहे.स्वत: गायलाच कशाला हवं.?”
पपांना फार वाईट वाटायचं. ताईमध्ये असलेला न्यूनगंड कसा दूर होईल याचा ते सदैव विचार करायचे.
नकोनको म्हणत असतानाही पपांनी एक छान पेटी तिच्यासाठी आणली.पण ताईने त्या पेटीला कधी हातही लावला नाही. एक दिवस पपांनीच एक अभंग पेटीचा सूर धरून गायला.
चाले हे शरीर कोणाचिये सत्ते
कोण बोलाविते हरीविण।।
।देखवी दाखवी एक नारायण।
।तयाचे भजन चुको नका।।
पुढचा एक अभंग ताईने उत्स्फूर्तपणे सूरात सूर पकडून गायला. घरात जणू एक छोटीशी भक्तीमैफलच रंगली.
मग ताईने हळूहळू पेटीला जवळ केले.पपांनी काही नोटेशन्सची अगदी प्राथमिक पुस्तकेही आणली. त्या नोटेशन्सवरुन तिने भूप,काफी ,दुर्गा रागाच्या काही बंदीशी ही बसवल्या. सुरांवरची तिची पकड मूळातच पक्की होती. ऊपजत होती.
क्रमश:..
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
- ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈