सौ राधिका भांडारकर
जीवनरंग
☆ वाळा….भाग 2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(सुरांवरची ताईची पकड मूळातच पक्की होती, ऊपजत होती. आता पुढे..)
एक दिवस पपांचे एक मित्र घरी आले होते. जिन्यातच त्यांनी पेटीवरचे सूर ऐकले अन् ते थबकलेच.
“वाजव वाजव बेटा! खरं म्हणजे भूपात निषाद नसतो.पण तू सहजपणे घेतलेला हा कोमल निषाद कानाला मात्र गोड वाटला.
नंतर ते पपांना म्हणाले ,”हिला पाठव माझ्या क्लासमध्ये.रियाज हवा. सराव हवा. मग कला विस्तारते. शिवाय शास्त्रशुद्ध प्रशिक्षणही मिळेल हिला. “
ताई जायचीही त्यांच्या क्लासला . पहाटे उठावं लागतं म्हणून कुरकुरायची. पपा तिला सतत विचारायचे.
“आज काय शिकलीस? दाखव की वाजवून. “
मित्रालाही विचारायचे.
“कशी चालली आहे साधना बाबीची? “
ते म्हणायचे , “ठीक आहे. “
एक दिवस मात्र ते म्हणाले.
“तिच्यात कलाकार आहे पण तो झोपलाय. कुठल्याही साधनेला एक अंत:स्फूर्ती लागते. एक धार लागते मित्रा. “
पपांना फार वाटायचं,घराच्या अंगणातलं हे कलाबीज का रुजत नाही ? कां उमलत नाही ?
पपांनी तिला इ. एन. टी. तज्ञांकडेही नेले होते. डाॅक्टरांनी तिची सखोल तपासणी केली. स्वरयंत्राचे ग्राफ्स काढले. तसे रीपोर्ट्स पाहता सर्व काही नाॅरमल होते. काही ऊपाय करता येईल अशी स्थिती नव्हतीच मुळी.
आजी म्हणायची,”लहानपणी घसा फुटेपर्यंत ही रडायची. रडून रडून हिचा आवाज असा झाला. “
डाॅक्टर मात्र म्हणाले, असं काही नसतं आजी. ” मग हातऊंचावून आकाशाकडे बघत म्हणायचे, “शेवटी डाॅक्टर म्हणजे काही देव नव्हे,विज्ञानाच्याही काही मर्यादा आहेतच की. चमत्कार होतातही. पण शास्त्रात त्याची ऊत्तरे नाहीत. तशी थिअरी नाही.
एक दिवस ताई चिडूनच पपांना म्हणाली, “हे बघा , उगीच मी गायिका वगैरे बनण्याचं स्वप्न तुम्ही बघू नका. आणि माझ्यावरही ते लादू नका. गाणं मला आवडतं. संगीतात मी रमते. माझ्या पद्धतीने मी त्याचा आनंद घेतच असते. हाय पीचवर माझा आवाज फाटतो. चिरतो. क्लासमधली मुलं मला हसतात. मला नाही जमत पपा.नका अशक्यातली स्वप्नं पाहू! “
त्यादिवशी मात्र ताईच्या डोळ्यात तुडुंब भरलेली विहीर होती.
मनात प्रचंड निगेटीव्हीटी होती. न्यूनगंड होता.
तसे पपाही समंजस होते.त्यांनाही जबरदस्तीचा रामराम नकोच होता. शिवाय अति महत्वाकांक्षा नैराश्य निर्माण करते याच मताचे ते होते.
त्यांनी नाद सोडून दिला असेही नव्हते. संगीताची अनेक पुस्तके त्यांनी आणली. भीमसेन,गंगुबाई हन्गल, शोभा गुर्टु , किशोरी आमोणकर अशा अनेक दिग्गजांच्या ध्वनीमुद्रिकांचा भलामोठा संग्रह गोळा केला. शिवाय रेडियो होताच.
क्रमश:..
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
- ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈