सुश्री तृप्ती कुलकर्णी
विविधा
☆ ऐसे दास्यत्व पत्करावे ! ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆
ऐसे दास्यत्व पत्करावे !
हनुमान म्हणजे रामरायाचा दास! प्रभुरामाच्या चरणी अगदी लीनतेनं बसणारा… आज्ञाधारक, बुद्धिमान, चपळ, साहसी अशी अनेक विशेषणं ल्यायलेला… याच हनुमानाची एक गोष्ट ऐकली जिनं त्याचं महत्त्व माझ्या मनावर बिंबवलं, त्याच्या उपासनेसाठी प्रवृत्त केलं. कीर्तनकार बुवा म्हणाले … हनुमानचं कर्तृत्व इतकं मोठं की त्यानं लक्ष्मणाप्रमाणेच रामाच्या शेजारी असायला हवं. तरीही तो पायाशीच… का… तर दास म्हणून नव्हे; प्रभुश्रीराम म्हणतात की जो कुणी माझ्याकडे मागणं किंवा गाऱ्हाणं सांगताना नतमस्तक होईल. त्याची नजर आधी माझ्या पायाशी असणाऱ्या या धर्मवीर, कर्तव्यदक्ष हनुमंताकडे जाईल. त्यानं हनुमंताची आराधना करावी. तोच तुमचं मागणं मनोवेगे माझ्यापर्यंत पोहोचवेल. दुसऱ्याच्या दुखाःशी समरस होण्यासाठीची भावोत्कटता हनुमानाजवळ प्रचंड आहे. त्यामुळे शक्य झालं तर तोच तुमचं मागणं पूर्ण करेल.’ हे ऐकताच मन हनुमाच्या विचारांत गुरफटलं… खुद्द रामानेच असं म्हणल्यावर हनुमानाशी जरा जास्तच गट्टी झाली.
दास्यत्व पत्करणं या शब्दाला आपल्याकडे एका संकुचित दृष्टीकोनातूनच पाहिलं जातं. पण मनुष्याच्या प्रगतीसाठी दास्यत्व किती महत्त्वाचं आहे हे जाणून घ्यायचं असेल तर हनुमानासारखं अद्वितीय उदाहरण नाही.
पुढे कळतेपणी या सगळ्याबद्दल वेगळीच जाणीव झाली. हेच राम आणि हनुमंत वेगवेगळ्या रूपांत दिसू लागले. ‘मन’ म्हणजे हनुमंत आणि ‘बुद्धी’ म्हणजे राम. थोडक्यात बुद्धीपुढं मनानं नतमस्तक व्हावं. कुणीही कितीही नाकारलं तरी आपल्या मनाचे आपण दास असतो हे शंभर टक्के खरं. बुद्धी नेहमी योग्य-अयोग्य जाणून आपल्याला तसा सल्ला देते पण मन… वाहवत जातं… बुद्धीला आततायीपणानं प्रत्युत्तर देतं आणि पस्तावतं. या पस्तावणाऱ्या मनानं हनुमानाचा आदर्श ठेवावा. बुद्धीरुपी रामाचं वेळीच महात्म्य जाणावं. मन चंचल पण सामर्थ्यवान… तर बुद्धी सखोल पण अविचल… आणि जेव्हा या दोन्ही परस्परपूरक गोष्टी एकत्र येऊन काही कार्य घडतं तेव्हा हमखास यश मिळतंच.
अलीकडे तर मन आणि बुद्धी यांची फारच ताटातूट होत आहे. भवताल अस्वस्थ… अनपेक्षित घटनांनी भरलेला… त्यावर कसं व्यक्त व्हावं, त्याच्याशी कसा सामना करावा हे कळणं आकलनापलीकडलं. त्यामुळे मनाची चंचलता इतकी वाढली की बुद्धीलाही भ्रम व्हावा. अशावेळी मनानं दास्यत्व पत्करावं. स्वतःच्या विवेकबुद्धीवर विश्वास ठेवून तिला सहकार्य करावं. कारण संकट येतं ते मनाच्या कमकुवतपणामुळे आणि परतवलं जातं तेही मन कणखर झाल्यावरच. जिथं राम आणि हनुमान एक होऊन लढतात तिथं संकट एकटं असो की दशमुखी त्याचा नाश होणारच. म्हणूनच या भवतालातून तारून जाण्यासाठी हनुमानाची उपासना करावी. कारण जिथं रावण नसेल तिथं प्रभूराम असेलच असं नाही पण जिथं भक्त हनुमान असेल तिथं प्रभूराम असणारच.
मनोजवं मारुततुल्यवेगं । जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् ।
वातात्मजं वानरयुथमुख्यं । श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ।
© सुश्री तृप्ती कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈