सौ राधिका भांडारकर
जीवनरंग
☆ वाळा….भाग 5 ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(ताईला वाटलं मी कात टाकली..आता पुढे)
हा धक्का होता की चमत्कार?
काय होतं हे? नक्की कुठून आलं की जे होतंच आपल्याजवळच. झोपलेलं ते जागं झालं का? तिला तिच्या लहानपणाच्या क्लासच्या सरांची आठवण झाली. ते पपांना म्हणाले होते, “हिच्यातला कलाकार झोपलाय.”
पपा एकदा म्हणाले होते, “आकाशातून पाणी तेव्हांच बरसतं जेव्हा मेघ दाटून येतात.”
मग ताईची प्रवास वाट बदललीच जणू! शंका होत्याच. मनात प्रश्नही होतेच. आता हे काय वय आहे का नव्याने काही सुरु करण्याचे? शिकण्याचे?
किती आयुष्य मागे गेलं. प्रवाहात जागोजागी खडक होतेच.
पण पात्रे सर म्हणाले, “कलेला वय नसतं. ती सदाबहार, चिरतरुण असते. साधनेलाही वयाची चौकट नसते. तुम्ही कलेची सुरवात केव्हाही करू शकता. हं एकच. तळमळ असावी. जिद्द असावी. ईर्षा असावी पण स्पर्धा नको. तुलना नको.किनारा गाठण्याची घाई नको. नावेत बसावं. संथ विहरत रहावं. लाटांबरोबर तरंगत राहण्याचा आनंद घ्यावा.
ताईलाही वाटलं,एका वेदनेनं, डोहात रुतलेल्या, कुठल्याशा बोचर्या भावनेनं धक्का दिला. अचानक एक खांदा दिला. त्यावर विसावून आतलं काहीतरी शांत होतय्. अन् काहीतरी परततय्. साद घालतय्.
मग अभ्यासही सुरु झाला.शास्त्रोक्त पद्धतीने विश्व आकारायला लागलं. गाळलेल्या जागा भरु लागल्या. एक नवी झळाळी ,लकाकी आली. अन् आत्मविश्वास बळावू लागला..एक मनातला बंध वितळू लागला.
विशारदच्या मौखीक चाचणीच्या तपासक ताईला सहज म्हणाल्या,”तुमचा आवाज जाड, थोडासा बसका असला तरी सूरांची परिपक्वता तुम्ही गाताना जाणवते. खरं सांगू का ताल, लय. सूरअचूक असला ना की आवाजाकडे नाही लक्ष जात. उलट तोच आवाज व्यक्तीची प्रतिमा ठरते. तुमच्या आवाजात घनता आणि भाव आहेत. महणून गाणंही मधुर वाटतं.
ध्रुपद गायकी जमेल तुम्हाला. हो! आणि तुम्ही पास झाला अहात. अभिनंदन!!
संगीत विशारदच्या पदवीने ताई अत्यंत आनंदली. अशक्याकडून शक्याकडे तिने एक पाउल ऊचलले होते.
वेळोवेळी पपांची तिला आठवण यायचीच. मनोमन अपराधीही वाटायचं. रुखरुख जाणवायची.
मन हुरहुरायचं. ‘तेव्हांच ऐकलं असतं तर? ‘पण प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. असंही पपाच म्हणायचे.
गीत रामायणाचे घरगुती स्तरांवर कार्यक्रम करण्याची कल्पना अंजोरचीच. ताईने जवळजवळ गीत रामायणातील सगळी गाणी अभ्यासून सराव करुन बसवली. निवेदन अंजोरच करायची.
‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.’ या गाण्याला तर श्रोते अक्षरश: भारावून जायचे. एका शांत स्तब्धतेत अंगावर सरसरुन काटा ऊभा रहायचा.
‘सियावर रामचंद्रकी जय! सेतु बांधारे..या गीतावर श्रोते उत्स्फूर्तपणे ठेका धरायचे.
एका कार्यक्रमात तर एका व्यक्तीने ताईला पद नमस्कार करुन म्हटले, “अक्षरश: श्रीराम भेटवलात”
ताईसाठी हे खूप नवलाचे नक्कीच होते.
क्रमश:..
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
- ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈