सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ मी प्रवासिनी क्रमांक २१ – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
✈️ कॅनडा ऽ ऽ राजा सौंदर्याचा ✈️
ओटावाहून दोनशे किलोमीटर्सवरील मॉन्ट्रियल इथे पोहोचलो. ही कॅनडाची औद्योगिक नगरी आहे. ब्रेकफास्ट करून बाहेर फेरफटका मारला.एका बागेमध्ये योध्यांचे, गरुडाचे पुतळे आहेत. रस्त्यावर एका कॉर्नरला जगप्रसिद्ध पियानिस्ट ऑस्कर पीटरसन यांचा दगडी बाकावर बसलेला पुतळा आहे. आपण पुतळ्याजवळ गेलो की सेन्सर्सच्या सहायाने पियानोची सुंदर सुरावट ऐकायला येते. जुन्या मॉन्ट्रियलमध्ये व्हिक्टोरियन काळातील, तांबूस दगडांचा वापर करून बांधलेली गॉथिक शैलीतली चर्चेस, म्युझियम्स, राहती घरे आहेत. विद्यार्थी आणि प्रवासी यांनी शहर गजबजले होते.१९१८ साली बांधलेली सन लाइफ बिल्डिंग ही दुसऱ्या महायुद्धामध्ये, अनेक युरोपियन राष्ट्रांनी सोने सुरक्षित ठेवण्यासाठी वापरली होती. रस्त्यांसाठी वापरलेले लांबट चौकोनी दगडी पेव्हरब्लॉक ३६० वर्षांपूर्वीचे पण अगदी सुस्थितीत आहेत.
नेत्रोदाम या भव्य चर्चच्या आत लाकडी कोरीवकाम व त्यावर सोन्याचा मुलामा दिलेले असे आहे. स्टेन्ड ग्लासच्या खिडक्यांवरील रंगीत चित्रे अप्रतिम आहेत. भव्य घंटा व अजूनही वापरात असलेला पोकळ खांबांचा ऑर्गन तिथे आहे. बार्बी म्युझियममध्ये सर्व देशातील वेगवेगळे ड्रेस घातलेल्या असंख्य बार्बी डॉल्स सुंदर सजवून मांडल्या आहेत. मॉन्ट्रियल इथे १९७६ मध्ये ऑलिंपिक गेम्स झाले होते. त्यावेळी उभारलेल्या मोठ्या आणि तिरक्या- तिरक्या जाणाऱ्या लिफ्टने जाऊन ऑलंपिक मनोर्याचे टोक गाठले. तिथून ऑलिंपिक ज्योत लेसर किरणांच्या साहाय्याने जिथे प्रज्वलित करण्यात आली होती तो उंच प्लॅटफॉर्म, निरनिराळ्या खेळांची स्वच्छ मैदाने दिसत होती. कुठे खेळांची प्रॅक्टीस चालू होती. त्यावेळी आपल्याकडे नुकत्याच सुरू झालेल्या टीव्हीमुळे ऑलिंपिक गेम्स पाहता आले होते. रुमानीयामधील ‘रबर गर्ल’ नादिया हिची आठवण झाली.
मॉन्ट्रियल इथून क्यूबेक इथे जायला चार तास लागले. कॅनडामधील ही पहिली कायमस्वरूपी वसाहत फ्रेंच प्रवासी, संशोधक सॅम्युएल चॅम्पलेन यांनी १६०५ मध्ये नोवा स्कॉटियाच्या किनाऱ्यावर उभारली. त्यानंतर दोन वर्षांनी ब्रिटिश आले. त्यांनी हडसन बे कंपनीची स्थापना केली. ब्रिटिश व फ्रेंच यांच्या आपापसात लढाया सुरू झाल्या. सात वर्षांनंतर ब्रिटिश जनरल जेम्स वुल्फ यांनी फ्रेंचांचा पराभव केला. तरीही क्यूबेकमध्ये ब्रिटिश व फ्रेंच संस्कृती, दोन्ही भाषा, विविध संस्था यांची हातात हात घालून वाढ झाली. आजही इथे कॅनडातील ८५% फ्रेंच राहतात. इथली अधिकृत भाषा फ्रेंच आहे व फ्रेंच सिव्हिल लॉ वापरण्यात येतो.
क्यूबेक हे ऐतिहासिक शहर सेंट लॉरेन्स या सागरासारख्या नदीकाठी आहे. पोपटी मखमली हिरवळ असलेल्या अवाढव्य बागा, भरदार वृक्ष, अनेक रंगांची फुले, गुलाबांचे ताटवे यांनी सारे शहर भरले आहे .बागांमधून अनेक कुटुंबे समर पिकनिक साठी आली होती. डोंगर उतरणीचा दगडी पायऱ्यांचा रस्ता उतरून खाली आलो.पंचवीस वर्षांपूर्वी तिथल्या चार मजली बिल्डिंगच्या संपूर्ण भिंतीवर जुन्या क्यूबेकचे चित्र रंगविले आहे. ब्रिटिश- फ्रेंच लढाया, चारचाकी घोडागाड्या, खेळणारी मुले, लपलेली मांजरे, प्रेमिकांची कुजबुज, बंदुका, लायब्ररी, मित्रांच्या बारमधील गप्पा असे सारे त्या चार मजली बिल्डिंगच्या पूर्ण भिंतीवर रंगविले आहे.
जुन्या क्यूबेक शहराभोवती संपूर्ण दगडी भिंत होती. त्याचे अवशेष दिसतात. सर्व वास्तुंची ब्रिटिश आणि फ्रेंच शैलीची जपणूक आज चारशे वर्षांनंतरही उठून दिसते. इथल्या थंड, कोरड्या हवेमध्ये सफरचंद, स्ट्रॉबेरी, चेरी अशी फळफळावळ विपुल प्रमाणात होते. उतरत्या छपरांची, लाल, राखाडी रंगांची घरे सभोवताली असलेल्या रंगीत फुलांच्या बागेमुळे शोभिवंत दिसतात. चार चाकांच्या घोडागाड्या प्रवाशांना घेऊन फिरत असतात. डोंगराच्या उंच कड्यावरून खाली येणारी फनीक्यूलर रेल्वे मजेशिर दिसते.क्यूबेक पासून मॉन्ट्रियलपर्यंत गेलेला रस्ता हा अठराव्या शतकातील व्यापारी व टपाल मार्ग होता. मॉन्ट्रियलला परत येताना मॉ॑टमोरेन्सी हा नायगाराहूनही अधिक उंचीवरून पडणारा धबधबा पहिला.झुलत्या अरूंद पुलावरून, डोंगराच्या या टोकावरून, धबधब्यावरून, दुसर्या डोंगरावर पोहोचण्याचा धाडसी खेळ तरुणाई तिथे खेळत होती. तसेच ट्रेकिंग व फिशिंगही चालू होते.
कॅनडा भाग ३ समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈