श्री अरविंद लिमये
जीवनरंग
☆ ‘झुळूक’ – भाग-१ ☆ श्री अरविंद लिमये☆
सेकंड ए. सी. चा मुंबईपर्यंतचा प्रवासही मला नकोसा वाटला होता. मनाविरुध्द काही करावं लागलं की असं होतंच. आॅफीसच्या या अनपेक्षित असाईनमेंटमुळे मुंबईतलं सलग आठ दिवसांचं हे वास्तव्य टाळता येणं शक्यच नव्हतं. एरवी कोणतंही काम मी उत्साहानं करायचोच, पण यावेळच्या किरकोळ आजारपणामुळे माझा उत्साह मरगळून गेला होता. अखेर आॅफीसतर्फे सगळी सोय असूनही घरचं वातावरण ही माझीच त्यावेळची गरज असल्यामुळे मी डोंबिवलीला मावसभावाकडेच उतरायचं ठरवलं. किरकोळ आजारपण म्हणजे काय, तर आठ दिवसांपासून ठाण मांडून बसलेला खोकला. आधी थोडं दुर्लक्ष, मग घरगुती उपचार, आणि नंतर फॅमिली डाॅक्टर यात आठ दिवस गेलेच. औषधं लिहून देताना डाॅक्टरानी थाॅयराईडची शंका व्यक्त करुन टेस्टही करुन घेऊ असं सुचवलं, पण या मुंबईट्रीपच्या घाईत ते राहूनच गेलं होतं.
नाईलाजाने बॅग भरली. त्या जड बॅगेबरोबर दुखरा घसा, ठाण मांडून बसलेला खोकला, डाॅक्टरानी सांगितलेली औषधं, आणि थाॅयराईडची भिती या सगळ्याचं ओझं होतंच.
याच थकल्या मनानं भावाच्या दाराची बेल वाजवली. तो वाट पहात होताच. तो आणि वहिनी मला पाहून दचकलेच.
“का रे?असा का दिसतोयस?”भावानं विचारलं.
“किती खराब झालायस?काय होतंय?” माझ्या हातातली बॅग घेत भाऊ म्हणाला.
“बरं नाहीय थोडं”
“थोडं ?वेडा आहेस का तू?ताप आहे तुझ्या अंगात. ” बॅग घेताना झालेल्या ओझरत्या स्पर्शाने तापाची वर्दी त्याच्यापर्यंत
पोचवली होती. मी फ्रेश होईपर्यंत भावाच्या सांगण्यावरुन वहिनीनी डाॅक्टरना फोनसुध्दा केला.
“डाॅ. मिस्त्रींची अपाॅईंटमेंट घेतलीय. तुम्हाला तिथं सोडून हे परस्पर आॅफीसला जातील. “वहिनीनी फर्मान सोडलं. “मी मऊ भात करते. तोवर चहा घेऊन थोडा आराम करा. “म्हणत ती आत गेली. भाऊ त्याचं आवरु लागला.
“तू ऐक माझं. आमच्या डाॅ. नी दिलेली औषधं बरोबर आणलीयत अरे. ती घेतली की बरं वाटेल. “मी ठामपणे सांगितलं. कारण मिस्त्री हे नाव ऐकलं तेव्हा हे आपल्यापैकी नाहीत हाच विचार माझ्या मनात डोकावला होता. एरवीही हातचं सोडून पळत्याच्या मागं कशाला लागायचं?
“हे बघ, आता मी सांगतो ते ऐक. तुझ्याजवळची औषधं बरोबर घे. ती डाॅ. मिस्त्री एकदा नजरेखालून घालू देत. मगच मी निश्चिंत होईन. “तो माझं काही ऐकून घ्यायच्या मन:स्थितीत नव्हताच. डाॅ. मिस्त्री जसे कांही देवच होते त्याच्यासाठी.
“कोण हे डाॅ. मिस्त्री?”
“आमचे फॅमिली डाॅक्टर”
“स्पेशलायझेशन?” तो हसला. “MBBS आहेत. “माझा चेहराच पडला. “गेल्या पस्तीस वर्षांची प्रॅक्टीस आहे त्यांची. चल, आवर आता लवकर. “
माझा अंदाज बरोबरच होता. डाॅ. म्हणून ते प्रथमदर्शनी आवडले नाहीतच. केवळ नाईलाजाने पेशंटसच्या त्या भाऊगर्दीत मी माझा नंबर यायची वाट पहात ताटकळत बसून राहीलो.
‘चांगला डाॅक्टर’ म्हणजे आपल्या प्रत्येकाच्याच मनात रुढ झालेली एक कल्पना असते. रुबाबदार, हसतमुख, खूप मोजकं बोलणारा, खूप वेळ तपासणारा, तत्परतेने सगळ्या टेस्टस करुन घेणारा, तो चांगला डाॅक्टर. . !त्याचं रहाणीमान, त्याची लवकर अपाॅईंटमेंट न मिळणं,
त्याचं स्पेशलायझेशन, न परवडणारे व्यावसायिक दर हे त्याचे अत्यावश्यक स्टेटस सिंबाॅल्स. . !डाॅ. मिस्त्री या सगळ्याला छेद देणारेच. चारचौघांसारखं व्यक्तिमत्व. गर्दीत उभे राहीले तर गर्दीतलेच एक वाटतील असे. सर्वात खटकणारी गोष्ट म्हणजे त्यांचं ते क्लीनिक. एक मध्यम आकाराचा हॉल. पस्तीस वर्षांची प्रॅक्टीस आणि स्वतःची केबिनही नसावी? पेशंटच्या गर्दी पुढेच थोडं अंतर सोडून एक टेबल. एक साधी खुर्ची. पेशंट तपासणीसाठी मागे पडदा लावून केलेला एका आडोसा. हे सगळं मुंबईतल्या डॉक्टरला शोभणारं नक्कीच नव्हतं. आणि तरीही यांच्यासाठी माझ्या भावाचा हट्टी आग्रह ?
क्रमशः…
©️ अरविंद लिमये
सांगली
(९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈