जीवनरंग
☆ खार….भाग 2 ☆ मेहबूब जमादार ☆
एखदा एका नागानं तिचा हा चक्रव्युह भेदण्याचा प्रयत्नं केला होता,पण मोरांने त्याला रक्तबंबाळ केलं होतं. त्याला पळताभूई थोडी झाली होती. अगदी शर्थीने निसटून त्यानं त्याचा जीव वाचवला होता. जवळच्या घळीत तो अदृष्य झाला होता. तिनं निवडलेले घर निश्चितच धोकादायक नव्हतं.
सूर्य मावळतीकडे झूकू लागला होता.
ती झाडाच्या शेंड्यावर बसून वन पहात होती. तिच्या कानांवर फांद्यांचा मोठा आवाज येवू लागला. तिला कळून चूकलं वानरं जवळ येत असल्याचं. ती पंधरा ते वीस वानरांची टोळी होती. झाडांच्या फांदंयानां ते हलवून सोडत. ख्यॅ. . . ख्यॅ…. . करत तिच्याही अंगावर येत. ती झरकन आपलं घरटं जवळ करी. कांही वेळांतच हा कळप पुढच्या झाडावर सरके. या वानरांच्या मर्कट लीलानां अंत नसे. जणू काय वन आपलंच आहे असं ते वागत. छोट्या कै-या,जांभळ,पेरू, अशा अनेक झाडावरची फळे तोडत. त्यातली थोडीसीच खात. उरलेली अर्धी खाली भिरकावून देत. एखादा गरजू ते खाईल हे त्यांच्या डोक्यातच नसे. खचितच ही टोळी झाडावरून खाली उतरे. ओढ्याच्या काठावर जावून बसे. ते इकडेतिकडे पहात. कानोसा घेवून मगच पाणी पित. क्षणात झाडावरती पसार होत.
दिवस पुढे जात होते. पण आज तिला कांहीस उदास वाटू लागलं होतं. तिची समागमाची इच्छा तिचं मन सैरभैर करून सोडी. ती नराच्या शोधात फांदीवर बसून राहीली. ती चिर्र…. असा आवाज काढे,शेपटी इकडून तिकडे नाचवे. नराला बोलविणेचे हे संकेत होते. दोन जोडीदार तिच्याकडे आले. पैकी एक लगट करू लागला. तिला तो कांही वेळ धरू पाहे,पण लगेच अंगावरून ऊठे. ती ऊटली तिनं तिचं तोंड त्याच्या तोंडाजवळ नेलं. बहूधा ती म्हणाली असेल,अरे आवरनां,मी कितीवेळ अशी बसून आहे’. जोडीदाराला ती काय म्हणतेय ते कळलं असावं. त्यानं पुढच्या दोन्ही हातानीं तिला मागून उचललं. तिनं शेपूट बाजूला केलं. तीनचार मिनीटं दोघांच्या तोंडातून चित्कारण्याचा आवाज येत राहीला. दोघं अलग झाले. ती खूशीत घरट्याकडे वळली.
असं त्या आडवड्यात दोन चारवेळा घडलं. निसर्ग नियमांनूसार सारं कांही घडत होतं. त्याला ती अपवाद नव्हती.
महिन्याभरातच ती गरोदर असल्याचे तिला कळून चूकले. थोडंस आता सांभाळायला हवं हे तिला पटलं.
कांहीच दिवस उलटले. तिचं अंग आताशा जड होवू लागलं होतं. पहिल्यासारखं तिला झाडावर सरसर चढता येत नव्हतं. या फांदीवरून दुस-या फांदीवर तिला ऊड्या मारता येत नव्हत्या.
आज ती कांहीशा विचारात होती. घरटं सोडून शेजारच्या फांदीवर निवांत पहूडली होती. फांदीवर तिनं पुढचे दोन्ही हात व मागचे दोन्ही पाय दोन्ही बाजूस टाकले होते. ती सगळीकडे लक्ष ठेवून होती. खाली पहाताच तिच्या लक्षात आलं,एक साळूंखी ती राहतेल्या झाडाच्या बुंध्यापाशी कांही जमीन उकरत होती. तिच्या लगेच लक्षात आलं,तिनं मागच्या आठवडय़ात कांही बिया तिथं पूरून ठेवल्या होत्या. ती गरोदर असलेने पुढच्या अन्नाची तिला गरज होती. ती लगेच खाली आली. तिला पहाताच साळूंखी भूर्रकन उडून गेली.
साळूंखीनं उकरलेल्या बिया तिनं पुन्हा उकरून खाली घातल्या. परत त्यावर माती टाकली.
प्राण्यांत दुस-यांच चोरून खाणं हे सर्रास घडे. आता या सगळ्यांची काळजी घेणं ही तिची जबाबदारी होती. तिचा जोडीदार कामांपुरता आला होता. पुढचं सारं तिलाचं कराव लागणार होतं.
परत ती फांदीवर त्याच परीस्थितीत जावून पहूडली. तिचा डोळा केंव्हा लगला हे तिलाच कळलं नाही.
पक्षांच्या आवाजानं ती ऊटली. सारं झाड पक्षानीं भरून गेलवतं. हळूहळू अंधार वनाला लपेटू लागला होता. जसा पूर्ण अंधार वनांवर दाटलां तसा पक्षांचा आवाज बंद झाला. सगळीकडं सामसूम झाली. ती घरट्यात जावून शांतपणे झोपी गेली.
सकाळ ऊजांडली. तिनं घरट्यांतून पाहिलं. तिचे सारे सहकारी फांद्यांवर इकडेतिकडे झेप घेत होते. चिर्र. . चिर्र. . . असा चित्कार सगळीकडं ऐकू येत होता.
ती घरट्यांतून बाहेर आली. तिनं शेपटीचा झुबका दोन तीनदा हलवला. ती सगळ्या सहका-यामध्ये सामील झाली.
क्रमश:…
© मेहबूब जमादार
मु- कासमवाडी, पो-पेठ, ता-वाळवा
जि-सांगली.मो-९९७०९००२४३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈