श्री प्रमोद वामन वर्तक
विविधा
जागतिक हास्य दिन 🤡 विनोद आणि आपण !🤡 श्री प्रमोद वामन वर्तक
‘टवाळा आवडे विनोद’ हे विनोदाच्या बाबतीत खुद्द रामदास स्वामींनी साधारण सतराव्या शतकातच म्हणून ठेवले आहे, हे आपल्याला ज्ञात असेलच ! आणि जर ते तसं ज्ञात नसेल, तर आपला विनोदाचा पाया अजून कच्चा आहे, असं मी छातीठोकपणे म्हणू शकतो ! अर्थात जेव्हा त्यांच्या लेखणीतून हे वचन उतरले तो काळ, सामाजिक परिस्थिती आणि तेंव्हाची त्यांनी केलेली टवाळाची व्याख्या ही त्याच काळाला लागू होती, ह्या माझ्या वेगळ्याच संशोधनाशी आपण नक्कीच सहमत व्हाल !
मी असे म्हणतो आहे त्याचे कारण हे आहे, की टवाळ हा शब्द आजकाल कोणी वापरताना दिसतच नाही ! किंबहुना हा शब्द आताच्या काळी अस्तंगत झाल्यातच जमा आहे ! आत्ताचे जे काही विनोद आपण ऐकतो, बघतो अथवा एकमेकांस सांगतो, त्यांची जर पातळी बघीतली तर, टवाळ हा शब्द त्याच्या पुढे फार म्हणजे फारच मवाळ ठरावा !
विनोदाला एक पातळी असावी, तो कुठे, कधी, कोणा समोर आणि कसा सादर करावा हे एक शास्त्र आहे ! हे माझ्या प्रमाणे अनेकांचे मत असले, तरी या मता बद्दल दुमत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर अशा त्या हट्टी लोकांचा असा दावा असतो, की विनोद हा विनोद असतो, त्याला कसली आलीयं पातळी ? विनोदाला पातळीचे परिमाण लावून कसे चालेल ? मग त्यात गंमत ती काय ? वगैरे वगैरे. असो. ज्याला त्याला त्याची पातळी लखलाभ ! आपण उगाच कशाला आपली पातळी सोडून त्यांच्या सारखे खालच्या पातळीवर जा ?
फार पूर्वी कुठे तरी पुसटसे वाचल्याचे आठवतंय, की अलम दुनियेत कित्येक शतकांपूर्वी, म्हणजे मानवाला लिहिता वाचता यायला लागल्यावर, फक्त सतरा विनोद त्यांच्या मूळ स्वरूपात अस्तित्वात होते, एकमेकास सांगितले जात होते ! त्या नंतर जस जशी मानवाची विनोदबुद्धी बहरत गेली, फुलत गेली तसं तशी प्रत्येकाने आपापल्या परिने त्यात भर घातली अँड रेस्ट इज द हिस्टरी ! माझ्या विनोदाचा प्रकाश फार दूरवर पोहोचत नसल्यामुळे, या माझ्या वाचिक माहितीवर विनोदाचे जाणकारच जास्त प्रकाश टाकू शकतील !
टीव्हीवर सध्या ‘ईनोदी’ म्हणून ज्याचा गाजावाजा केला जातो अशा अनेक कार्यक्रमांनी, मालिकांनी नुसतं धुमशान घातले आहे ! डॉक्टरकी चालत नसल्याने, आपल्या एकट्याच्याच जीवावर एखादे चॅनल चालते, अशी ‘हवा’ ज्याच्या डोक्यात गेली आहे, त्याचा प्रोग्रॅम जरी चालू असला, तरी मी चॅनेल बदलतो आणि चक्क बातम्या बघणे पसंत करतो ! त्यात बातम्या देणाऱ्याची बातमी सांगण्याची पद्धत, बोलतांना कानावर पडणारे त्यांचे किंवा तिचे शुद्ध उच्चार किंवा स्क्रीनवरच शुद्ध मराठी वाचून माझी जास्त चांगली निखळ करमणूक होते ! हॊ, उगाच खोटं कशाला बोला !
विनोद आणि माणूस यांचे एक अतूट नातं आहे !
आपल्याला वरचं वाक्य थोडं खटकलं का ? तुमचं बरोबर आहे, नेहमी आपल्याला विनोद आणि मराठी माणूस यांचे एक अतूट नाते आहे, असे वाचण्याची सवय झाली आहे ! त्यात मी थोडा बदल केला इतकच ! कारण सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा विनोदबुद्धी असतेच असते, फक्त एखादा विनोद आकलन करायची कुवत कमी जास्त असल्यामुळे, त्याला एखादा विनोद कळण्यास वेळ लागतो, त्यामुळे त्याची हसण्याची प्रतिक्रीया त्याच्या आकलनशक्ती प्रमाणे उशिरा किंवा अजिबातच येत नाही ! याचा अनुभव आपण कधीतरी घेतला असेलच, बघा आठवून !
आपल्या मराठीत अनेकानेक दिग्गज विनोदी लेखक होऊन गेले, पण विनोद आणि पु.ल. आणि पु.ल. म्हणजेच विनोद, हे समीकरण माझ्या पिढीच्या एव्हढे डोक्यात गेले आहे, की ती जागा माझ्या मते, दुसऱ्या कोणास घेण्यासाठी किती काळ जावा लागेल, हे सांगणे कठीणच आहे ! पु.लंचे विनोदी लिखाण हे खरोखरच अजरामर आहे आणि हल्लीची काही तरुण मंडळीसुद्धा त्यांच्या लिखाणाच्या प्रेमात पडली आहेत, पडत आहेत हे पाहून पु.लं. बद्दलचे आमच्या पिढीचे प्रेम सार्थकी लागले असंच म्हणावंसं वाटतं !
कुठल्याही मानसिक दुःखावर एखादी विनोदी कथा, कविता वाचणे, ऐकणे या सारखा रामबाण ऊपाय नाही, अस हल्लीच वैद्यक शास्त्र सुद्धा सांगत ! इतका विनोदाचा सकारात्मक परिणाम माणसाच्या मनावर होतो ही निखळ विनोदाची जादूच म्हणायची !
आज काल प्रत्येकालाच रोज कुठल्या ना कुठल्या विवंचना भेडसावत असतात, त्यामुळे सकारत्मक विचार करणारी माणसे रोजच्या जीवनात वावरतांना, घडणाऱ्या प्रत्येक घटनेत विनोद शोधात असतात ! अशा लोकांच्या बाबतीत इतर सामान्य लोक त्याला, “याला कुठल्याच गोष्टीचे गांभिर्य नाही, हा सगळ्या गोष्टी हसण्यावारीच नेतो” असे म्हणून नावं ठेवत असतात ! पण माझ्या मते अशा तऱ्हेने जगणारे लोकच, वरकरणी तरी इतरांना कायम आनंदी अथवा सुखी वाटतात, हीच तर खरी अशा लोकांच्या स्वभावातली मेख आहे !
आपणा सर्वांना सुद्धा असाच विनोदाचा सुंदर नजरिया, आपल्या रोजच्या जीवनात लाभो आणि आपले उर्वरीत आयुष्य सुद्धा हसत खेळत व्यतीत होवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो !
© प्रमोद वामन वर्तक
०१-०५-२०२२
ठाणे.
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈