श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ तुझा उन्माद ☆
अशी ओकताना आग, सूर्य पाहिला नव्हता
पारा चढलाय त्याचा, जरी होता उगवता
मुक्या झाल्या होत्या वेली, तुझा संताप पाहता
नको ओकू अशी आग, सुकतील साऱ्या लता
रस्त्यावर नाही आता, रोज सारखा राबता
धाक तुझा एवढा की, त्याचमुळे ही शांतता
बिना कष्टाचा हा घाम, मला येईना टाळता
होत आनंदही नाही, आज घामाने भिजता
होते देहाची या लाही, वस्त्रे मोहाची त्यागता
शांत झोपही येईना, तुझा उन्माद झेलता
शांत मनाला वाटते, जलतरण करता
मिठी पाण्याची भक्कम, आता येईना सोडता
अंग आहे पेटलेले, ये ग राणी न सांगता
मन शांत हे होईल, वर्षा राणीला भेटता
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈