विविधा
☆ जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्यदिनानिमित्त लेख – वृत्तपत्र स्वातंत्र्य … ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆
भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. भारतीय संविधान हे एक श्रेष्ठ संविधान आहे. या संविधानानुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला आचार, विचार, संचार यांचे स्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य,भाषा स्वातंत्र्य वगैरे वेगवेगळ्या प्रकारची स्वातंत्र्ये मिळाली आहेत. तो आता प्रत्येकाचा हक्क झाला आहे.
त्यात लेखन स्वातंत्र्यामध्ये वृत्तपत्रातील लेखन हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. कारण देशातील सर्वच भागात वृत्तसेवा सुरू आहे. सगळीकडे वृत्तपत्रे प्रकाशित होतात. ती देशात तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे त्या त्या वृत्तपत्रातील विचारही तिथे पोहोचतात. वृत्तपत्रे हा भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. त्यासाठी वृत्तपत्रात लेखन करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आवश्यक आहे.
पण हे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे! हेही लक्षात घेतले पाहिजे. त्यावरही कायद्याची काही बंधने आहेत. तसे वृत्तपत्र स्वातंत्र्याचे रक्षण आणि नियंत्रण करणारे कायदे संविधानात अस्तित्वात आहेत. शिवाय बंधने घालणारे कायदेही आहेत. प्रत्येक व्यक्तीला ते लागू आहेत.
वृत्तपत्रे छापणे व वितरित करणे हा केवळ धंदा नाही तर ते लोकांपर्यंत व्यवस्थितपणे विचार पोहोचविणे ,त्यांचे विचार जाणून घेणे यांचे एक उत्तम माध्यम आहे.त्यासाठीही कायद्याने संरक्षण आहे पण त्याचा अनिर्बंध वापर गेल्या काही वर्षांपासून होत आहे.
छापलेली वृत्तपत्रे लोकांपर्यंत वितरित करण्याचा ही वृत्तपत्र काढणाऱ्या लोकांना हक्क आहे. तरीही न्यायालयाचा अवमान होईल,कुणाची अब्रूनुकसानी होईल,असे काहीही करण्यास पुरता मज्जाव आहे.अश्लीलता विरोध,गोपनीयता हे सरकारचे तसेच लोकांचे अधिकार आहेत.त्याविरूद्ध आक्षेपार्ह मजकूर छापणे हा कायद्याने गुन्हा ठरू शकतो.
आणीबाणी जाहीर झाली होती तेव्हा एकदा सारी बंधने झुगारून देऊन वृत्तपत्र स्वातंत्र्यावर गदा आली होती. आता सुद्धा काही राजकारण्याचा हस्तक्षेप म्हणा किंवा वरदहस्त म्हणा या काही वृत्तपत्रांना मिळालेला आहे. त्या काही वृत्तपत्रांमधून अगदीच एकतर्फी बातम्या छापल्या जातात. हे अत्यंत चुकीचे आहे. असे न करता वृत्तपत्रांनी सर्वच प्रकारच्या विचारांना प्राधान्य दिले पाहिजे.
लोकशाहीचा चौथा महत्वाचा हा स्तंभ या दृष्टीने त्यांनी हक्कांबरोबर कर्तव्याचेही पालन करायला हवे. कायदेशीर बंधने पाळलीच पाहिजेत.
बाकी वृत्तपत्रांचा खप वाढविण्यासाठी समाजाचा कल पाहून ती छापली गेली पाहिजेत. तिथे निरपेक्षपणा अपेक्षित आहे.
त्यानुसार वृत्तपत्रे छापणे, वितरण करणे, आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवणे हे भारतीय लोकशाही मध्ये कायद्याने दिलेले स्वातंत्र्य आहे. ते गैर मार्गाने वापरले जाऊ नये आणि विपरीत गोष्टी पसरविण्यासाठी उपयोगात येऊ नये.हीच इच्छा !!
© सुश्री प्रज्ञा मिरासदार
पुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈