इंद्रधनुष्य
☆ भलत्याच निघाल्या आजीबाई… ☆ संग्रहिका – सौ.स्वाती घैसास ☆
बऱ्याच वर्षांपासून बागेत एक आजी भेटतात. प्रत्येक वेळी माझा व्यवसाय बदलत राहतात. कधी मला विचारतात, ‘ काय गं कसा चालू आहे तुझा नकली दागिन्यांचा व्यवसाय?’
कधी विचारतात- आमच्या शेजारचा यश तुझ्याच पाळणाघरात येतो का गं?
त्यांच्या चौकशीनुसार मी आतापर्यंत भाजी, पनीर, कपडे असं बरंच काही विकलेलं आहे.
शिवाय सरकारी नोकरी, बँकेत नोकरी, प्रायव्हेट नोकरी अशा नोकऱ्यादेखील केलेल्या आहेत.
हे आणि असं बरंच काही.
पहिले एक दोन वेळा मी त्यांचा गैरसमज दूर करायचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी वेगळं काम मला दिलेलं बघून मनात म्हटलं, कदाचित आजींना स्मृतिभ्रंश वगैरे असेल, आपण कशाला उगीच नकारघंटा लावून त्यांना त्रास द्यायचा.
काही महिन्यांपूर्वी भेटल्या तर मला म्हणाल्या, ‘ बरी आहे का गं तुझी तब्येत?’
मी काय म्हणणार, बरी आहे म्हटलं.
आज पुन्हा खाली भेटल्या.
बाकावर मैत्रिणीबरोबर बसलेल्या होत्या. मला म्हणाल्या, ‘ शाळेला सुट्टी लागली का गं तुझ्या?’
मी म्हटलं, ‘ हो लागली.’
माझ्याबरोबर पण माझी मैत्रीण होती, तिने पुढे गेल्यावर विचारलं, ‘ काय गं, कसली शाळा?’
मी- अगं आजी काहीही विचारतात. बहुतेक स्मृतिभ्रंश आहे त्यांना, म्हणून मी पण हो ला हो करते.
तितक्यात मागून आजींचा त्यांच्या मैत्रिणीला बोलताना आवाज आला, ‘ बघ, मी तुला म्हटलं होतं ना, ती थोडी वेडी आहे अगं. प्रत्येकवेळी मी तिला वेगळंच काहीतरी विचारते आणि तीदेखील सगळ्याला हो म्हणते. थोडा परिणामच झालेला आहे तिच्या डोक्यावर. आजपण बघ कशी शाळेला सुट्टी लागली का विचारलं तर हो म्हणाली’
भलत्याच निघाल्या आजीबाई
🤭😂😝
संग्रहिका – सौ. स्वाती घैसास
९८२२८४६७६२.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈