सौ. सुचित्रा पवार
कवितेचा उत्सव
☆ दूर दूर … ☆ सौ. सुचित्रा पवार ☆
दूर दूर माळरानात
पेटत्या उन्हाच्या ज्वालेत
गर्द झाडाच्या छायेत
तन-मन करावे शांत शांत
हिरव्या हिरव्या डोंगरात
मधूर झरे खळाळत
एकांत क्षणी जावे
पिऊन जलास होण्या तृप्त
दूर दूर वेळूच्या बनात
शीळ घुमते कानात
हरवूनी वेळूच्या बेटात
नाद साठवावा अंतरंगात
अथांग निळ्या सागरात
लाटांच्या संथ हेलकाव्यात
व्हावे मन पीस पीस
तरंगावे खुशाल जलाशयात
उंच उंच किल्ल्यावर
जावे चढणी चढत
पराक्रम आठवून शिवबांचा
स्फुल्लिंग पेटावे रोमरोमात
© सौ.सुचित्रा पवार
तासगाव, सांगली
8055690240
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈