सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ९ मे – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

टिळक, नारायण वामन – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती

रेव्ह. नारायण वामन टिळक

 (6डिसेंबर 1861 – 9 मे 1919) हे कवी, लेखक, शिक्षक व समाजसुधारक होते.

त्या काळात पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रियांना सोसाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा व समाजाला लागलेल्या जातिभेदाच्या किडीमुळे शुद्रांवर होणारे अत्याचार यामुळे त्यांच्या मनात खूप खळबळ माजली. त्यांनी बौद्ध, इस्लाम, ख्रिस्ती धर्माचा अभ्यास केला.प्रार्थना समाज व आर्य समाजाशीही ते संलग्न होते. त्याचप्रमाणे त्यांच्यावर महात्मा फुलेंचाही प्रभाव होता.

नंतर त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. सर्वांचा विरोध स्वीकारून तो अंमलात आणला.

टिळकांनी आपली पत्नी लक्ष्मीबाई यांना त्या काळात लिहावाचायला शिकवले. लक्ष्मीबाईंनीही त्याचे चीज केले. त्यांनी साध्यासोप्या भाषेत लिहिलेले ‘स्मृतिचित्रे’ हे आत्मचरित्र हे आजही सडेतोड व उत्कृष्ट आत्मचरित्राचा एक उत्तम नमुना म्हणून लोकप्रिय आहे.

कालांतराने लक्ष्मीबाईंनीही ख्रिस्ती धर्म स्वीकारला.

महादेव रानडे, ज्योतिबा फुले इत्यादी मोजक्या समाजसुधारकांप्रमाणे टिळकांनाही आपल्या पत्नीची उत्तम साथ लाभली.

टिळक कॉलेजमध्ये गेले नाहीत. पण इंग्रजी डिक्शनरीतील असंख्य शब्द पाठ करून त्यांनी इंग्रजी भाषा आत्मसात केली.

ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यापूर्वी, टिळकांनी काही काळ हिंदू धर्माचा व त्यातील कर्मकांडांचा अन्वयार्थ सांगणाऱ्या ‘ऋषि’ या मासिकाचे संपादन केले. त्यांना हिंदू धर्माचा अभिमान होता. पण सामाजिक व धार्मिक सुधारणांकडे त्यांचा कल होता.

ते उत्तम कीर्तनकार होते. प्रथम हिंदू व नंतर ख्रिस्ती धर्माच्या संदर्भातही त्यांनी कीर्तने केली.लक्ष्मीबाई यांच्यासह अनेक हिंदू व नंतर ख्रिस्ती कीर्तनकारांना त्यांनी कीर्तन करण्याचे प्रशिक्षण दिले. त्यासाठी मार्गदर्शनपर ‘कीर्तन कलाप’ ही पुस्तिका त्यांनी लिहिली.

मुलांसाठीच्या ‘बालबोधमेवा’ या ज्ञान-मनोरंजनपर मासिकात त्यांनी अनेक लेख-कविता लिहिल्या.

त्यांनी भरपूर साहित्यनिर्मिती केली.   त्यांना ‘महाराष्ट्राचा ख्रिश्चन वर्ड्सवर्थ’ म्हटले जाई. तर त्यांनी चर्चसाठी लिहिलेल्या असंख्य स्तोत्रे व कवितांमुळे त्यांना ‘पश्चिम भारतातले टागोर’ म्हणून ओळखले जाई.

त्यांचे ‘अभंगांजली’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

त्यांनी ‘ख्रिस्तायन’ हे महाकाव्य लिहायला सुरुवात केली. पण 10 अध्याय लिहून झाल्यानंतर दुर्दैवाने त्यांच्यावर मृत्यूने झडप घातली. लक्ष्मीबाईंनी पुढचे 64अध्याय लिहून ते कार्य पूर्ण केले.

याशिवाय त्यांच्या ‘वनवासी फूल’, ‘सुशीला’, ‘माझी भार्या’, ‘बापाचे अश्रू’, ‘प्रियकर हिंदीस्तान’ वगैरे 2100 कविता प्रसिद्ध आहेत.

त्यांना त्यांच्या कवितांसाठी व वक्तृत्वासाठी अनेक पारितोषिके मिळाली होती. यांत सुवर्णपदकाचाही समावेश आहे.

त्यांचा नातू अशोक देवदत्त टिळक याने टिळकांवर ‘चालता बोलता चमत्कार’ ही चरित्रपर कादंबरी लिहिली.

☆☆☆☆☆

डॉ. केशव नारायण वाटवे

डॉ. केशव नारायण वाटवे (19 एप्रिल 1895 – 9 मे 1981)हे मराठीचे प्राध्यापक व लेखक होते.

त्यांचे प्राथमिक शिक्षण औंध (सातारा) येथे व नंतर एम. ए. पर्यंतचे शिक्षण  पुणे येथे झाले.

वाटवे संस्कृत व मराठी साहित्याचे अभ्यासक होते. त्या साहित्याची सूक्ष्म व रसिक परीक्षणे करून त्यांनी अनेक पुस्तके लिहिली.

त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांत ‘नलदमयंती काव्य’ (छंदोबद्ध काव्य), ‘पंडिती काव्य’, ‘प्राचीन मराठी पंडिती काव्य’, ‘रसविमर्ष’, ‘संस्कृत नाट्यसौंदर्य’, ‘संस्कृत साहित्यातील विनोद’, ‘माझी वाटचाल’ (आत्मचरित्र) वगैरे पुस्तकांचा समावेश आहे.

त्यांच्या ‘रसविमर्ष’ या ग्रंथाला मुंबई विद्यापीठाचे दादोबा पांडुरंग   तर्खडकर पारितोषिक, भोर येथील शंकराजी नारायण पारितोषिक, डेक्कन सोसायटीचे इचलकरंजी पारितोषिक हे पुरस्कार मिळाले. हा ग्रंथ मुंबई, पुणे, नागपूर, कर्नाटक, गुजरात येथील विद्यापीठांनी बी. ए. व एम. ए. ला लावला.

ते शरद तळवलकरांचे सासरे लागत.

रेव्ह. नारायण वामन टिळक व डॉ. केशव नारायण वाटवे यांच्या स्मृतिदिनी त्यांना आदरांजली.🙏

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विवेक महाराष्ट्र नायक, लेखक :वि. ग. जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments