श्री सुहास सोहोनी
कवितेचा उत्सव
☆ ती म्हणाली… ☆ श्री सुहास सोहोनी ☆
🏵️
नियतीनं हाताचं बोट धरून
जगाच्या या उघड्या मैदानांत आणून सोडलं …
आणि बोट सोडून ती म्हणाली,
आता तुझं तूच खेळायचं !!
😓
खेळता खेळता जायचं नाही
खूप दूर दूर —
पाय दुखले तरी करायची
नाही कुरकर —
धावता धावता होणारच की
खूपच दमणूक —
दमणुकीचं दुसरं नांव
असतं करमणुक —
हसता हसता खेळायचं
खेळता खेळता म्हणायचं
खोल खोल आकाशात
मारावा कां सूर —
कावळा पण भुर्रर्रर्र
आणि चिमणी पण भुर्रर्रर्र —॥
🏵️
जीव सारा झोकुन देत
खेळात घेतली उडी —
लपाछपी अन् आट्यापाट्या
पळापळी लंगडी —
प्यादे राजा वजीर घोडा
हत्ती सांगे मंत्र —
खेळांनी या खूप शिकवले
जगण्याचे तंत्र —
खेळ खेळता गाणे गावे
गाता गाता सूर धरावे
सूर तरंगत मनवेगाने
जावे दूर दूर —
कावळा पण भुर्रर्रर्र
आणि चिमणी पण भुर्रर्रर्र — ॥
🏵️
खेळता खेळता हसता फिरता
भेटला सवंगडी —
आयुष्याच्या खेळासाठी
जमून गेली जोडी —
एकमेकांच्या साथीनं कधी
काढली सेंचुरी —
कधी शून्याचा भोपळाही
पडला की पदरी —
एक गोष्ट मात्र खरोखर खरी
बाद होण्याची वेळ कधी आली जरी
रडीचा डाव कधी खेळलो नाही
खोटं अपील कधी केलं नाही
हरलो तरी केली नाही कधी कुरकुर
खोल पाण्यात मारत राहिलो सुरावरती सूर
जिंकलो तेव्हा कंठी आला
आनंदाचा नूर
कावळा पण भुर्रर्रर्र
आणि चिमणी पण भुर्रर्रर्र — ॥
🏵️
दिवस खूप चांगले गेले
पुढचेही जातील —
खेळ अजून बाकी आहेत
संपता संपता उरतील —
बोट सोडुन गेलेल्या नियतिस
आता एकच सांगावं —
आठवणींच्या खेळात आता
रमून जाणं द्यावं —
क्रिकेट नको फुटबॉल नको
हजार मीटर्सची शर्यत नको
उडी नको बुडी नको
मॅरॉथॉनचा विचार नको
हसत हसत जगायचं
जुन्या आठवणीत हरवायचं
हा खेळ खेळत रहायचं
खेळता खेळता संपून जायचं —
मनमंदिराच्या गर्भी गाभारा तृप्तीचा
आपुलीच व्हावी मूर्ती खेळ हा मुक्तीचा
खेळता खेळता संपायचं
नि संपता संपता म्हणायचं
तृप्तीच्या सरितेला आलासे पूर —
आता —
कावळा पण भुर्रर्रर्र
आणि चिमणी पण भुर्रर्रर्र— ॥
🏵️
© श्री सुहास सोहोनी
रत्नागिरी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈