श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ ठिणगी ☆
येउनी स्वप्नात माझ्या, रोज ती छळतेच आहे
जखम भरु ती देत नाही, दुःख माझे हेच आहे
ऊल झालो शाल झालो, हे तिला कळलेच नाही
ती मला पत्थर म्हणाली, काळजाला ठेच आहे
सागराच्या मी किनारी, रोज घरटे बांधणारा
छेडणारी लाट येते, अन् मला भिडतेच आहे
आंधळ्या प्रेमास माझ्या, सापडेना मार्ग काही
ती निघाली हात सोडुन, शल्य मज इतकेच आहे
कान डोळे बंद करने, हे मला जमलेच नाही
टोमण्यांची धूळ येथे, रोज तर उडतेच आहे
ही पुराणातील वांगी, आजही पिकतात येथे
नारदा तू टाक ठिणगी, रान मग जळतेच आहे
रोज देहातून पाझर, वाढतो आहे उन्हाळा
भाकरीचे पीठ कायम, त्यात ती मळतेच आहे
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈