श्री सुहास रघुनाथ पंडित
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १३ मे -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
विनायक महादेव कुलकर्णी :
विनायक महादेव तथा वि.म.कुलकर्णी यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील मणेराजुरी या गावात झाला.त्यांनी पुणे विद्यापीठात बी.ए.केले. तेव्हा तर्खडकर सुवर्णपदक प्राप्त केले. मुंबई विद्यापीठातून एम.ए.केले तेही चिपळूणकर पुरस्कार प्राप्त करून. त्यानंतर नाटककार खाडीलकर या विषयात डाॅक्टरेट संपादन केली. त्यांनी काही काळ बेळगाव येथे लिंगराज महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले. नंतर सोलापूर येथील दयानंद महविद्यालयात प्रदीर्घ काळ अध्यापन करून तेथूनच निवृत्त झाले. अशी त्यांची जीवनाची वाटचाल होती.
या वाटचालीत त्यांनी शब्दांची साथ सोडली नाही. गद्य, पद्य आणि बालसाहित्य यात ते रमून गेले. विशेषतः काव्य प्रांतातील त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. भाषेतील सौम्यता आणि अनुभवांची प्रामाणिकपणाने मांडणी ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. निसर्ग, प्रेमभावना आणि पारंपारिक संस्कृतीचे दर्शनही त्यांच्या काव्यातून दिसून येते. त्यामुळेच त्यांच्या कविता पाठ्यपुस्तकातून शिकायला मिळाल्या आहेत. आठवणीसाठी काही कविता अशा :
गाडी आली गाडी आली झुक झुक झुक, माझ्या मराठीची गोडी, लमाणांचा तांडा, ते अमर हुतात्मे झाले, आम्ही जवान देशाचे, माझा उजळ उंबरा, एक दिवस असा येतो … इत्यादी
प्रकाशित साहित्य
बालसाहित्य—
अंगतपंगत, गाडी आली गाडी आली, चंद्राची गाडी, छान छान गाणी, नवी स्फूर्तीगीते, फुलवेल इ.
काव्यसंग्रह
अश्विनी, कमळवेल, प्रसाद रामायण, भाववीणा, मृगधारा, पाउलखुणा,विसर्जन इ.
अन्य साहित्य
मला जगायचय..कादंबरी
न्याहरी..कथासंग्रह
गरिबांचे राज्य..चित्रपट कथा
पेशवे बखर,मराठी सुनीत,रामजोशी कृत लावण्या…संपादित…..इत्यादी
प्राप्त पुरस्कार
गदिमा पुरस्कार, भा.रा.तांबे पुरस्कार, दिनकर लोखंडे बालसाहित्य पुरस्कार, उत्कृष्ट प्राध्यापक…राज्य शासन पुरस्कार
शब्दांची कमळवेल फुलवून भाववीणा छेडीत जाणारा हा कवी कवितांच्या पाऊलखूणा मागे सोडत तेरा मे दोन हजार दहा ला निधन पावला.त्यांच्या साहित्य प्रतिभेस आदरांजली.
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया, आधुनिक मराठी काव्यसंपदा.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈