श्री आनंदहरी
जीवनरंग
☆ विटी-दाडू – भाग-3 ☆ श्री आनंदहरी ☆
रावसाहेब निवृत्त होऊन फंड-ग्रॅज्युईटीची रक्कम मिळून, निवृत्तिवेतन सुरू होईपर्यंत वर्ष कसे सरले हे समजलेच नाही. निवृत्तीनंतरही सारी कामे सुरळीत पार पडली तसे रावसाहेब, राधाबाई निवांत झाले. त्यांनी मुलाशी चर्चा करून एका चांगल्या यात्राकंपपनीची एक महिन्यानंतर निघणारी उत्तर भारताची सहल निवडली. त्याचे पैसे भरले. दोघेही रोज निवांत वेळी सहलीचीच चर्चा करू लागले. राधाबाईंनी तर सहलीची तयारीही सुरू करायला घेतली तसे रावसाहेब हसले.
” अगं, अजून जवळजवळ महिना आहे. आत्तापासून काय तयारी करतेस? आदल्यादिवशी बॅग भरायची आणि निघायचे. . “
” तुम्ही बॅग भरणार, ? उजेड. . अहो, एकदोन दिवसासाठी तुम्ही कुठं जाणार असला तरी अजूनही मला बॅग भरून हातात द्यावी लागते. . “
राधाबाई हसत म्हणाल्या,
” तू कधी काही करू दिलंयस का मला. . ? तू आल्यापासून सवयच नाही राहिलेली काही काम करायची…नुसता लाडाऊन ठेवले आहेस मला?”
” कशाला काय करू द्यायचे तुम्हांला? एक काम धड कराल तर शप्पथ ! तेच काम मला दुसऱ्यांदा करावे लागणार असेल तर मग तुम्हांला करायला सांगूनही काय फायदा. . त्यापेक्षा आधीच मी केलेलं बरे नाही का? “
खाली मान घालून काम करत करता राधाबाई म्हणाल्या आणि त्यांनी रावसाहेबांकडे पाहिले. . ते काहीसे गंभीर झाल्यासारखे दिसले तसे त्या हसत हसत म्हणाल्या, उगा माझ्या लाडोबाला कशाला त्रास? “
आणि रावसाहेबांकडे पाहून डोळे मिचकावत म्हणाल्या,
” हो की नाही रे लाडोबा. . ?”
रावसाहेबांच्या चेहऱ्यावर हसू तरळले. आपण बोलता बोलता नवऱ्याला एकेरी बोललो हे जाणवताच राधाबाईंनी जीभ चावली.
” हळूच. . नाहीतर मला आळणी खावे लागेल? “
” म्हणजे? “
मध्येच आळणी खाण्याचा विषय रावसाहेबांनी कुठून काढला? हे न समजून राधाबाईंनी विचारले.
” अगं, जीभ जोरात चावलीस तर तुझ्या तोंडाला तिखट लागू देणार नाही पण त्याची शिक्षा बिचाऱ्या माझ्या जिभेला नाही का मिळणार? “
आपण नकळत एकेरी बोलून गेलो ते रावसाहेबांच्याही लक्षात आलंय हे पाहून राधाबाईनी लाजून खाली मान घातली. त्यांचे लाजणे पाहून रावसाहेब सुखावले. . क्षणभर त्यांच्याकडे पहातच राहिले. . रावसाहेब गप्प झाल्याचे पाहून राधाबाईंनी चमकून वर पाहिले तर रावसाहेबांच्या डोळ्यांत मिश्किलता तरळत होती. . राधाबाई पाहतायत हे पाहून हसत हसत रावसाहेब म्हणाले,
” तशीही तुझी चव जिभेला आवडतेच माझ्या. . आता इतकी वर्षे झाली पण आवड काही कमी झालेली नाही. . . . “
रावसाहेबांचे बोलणे ऐकून काहीशा लटक्या रागाने राधाबाई म्हणाल्या,
” चावटपणा पुरे हं… !”
” अगं, चावटपणा काय केला मी. . . तुझ्या हातच्या जेवणाबद्दल म्हणतोय. “
” कळलं हं कळलं. . कहीपे निगाहे. . आणि तुम्हांला मी काही आज ओळखत नाही म्हणलं. बस झाल्या गप्पा. आता जावा बघू आत. काल वाचनालयातून आणलेलं पुस्तक तुमची वाट बघत असेल. मला माझी कामे करू देत जरा. . ”
रावसाहेब हसत हसत बाहेरच्या खोलीत गेले. पाठमोऱ्या रावसाहेबांकडे पाहत राधाबाईंच्या मनात आले. . ‘ अजूनही यांच्यात खोडकर, खेळकर बालक लपलेला आहे… असा नवरा मला मिळालाय ते माझे भाग्यच…’
सहलीला जायचा दिवस जवळ जवळ येऊ लागला तसे राधाबाईंच्या मनातील अवस्थता वाढत चालली होती. कधी अशा दूरच्या आणि इतक्या दिवसांच्या सहलीला त्या गेल्याच नव्हत्या. ‘सहल नीट पार पडेल ना?’ त्यांना उगाचच धाकधूक लागून राहिली होती. रावसाहेबांना ते जाणवले तसे ते म्हणाले,
” अगं, तुझी खूप इच्छा होती ना सहलीला जायची. आजवर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे जायला कधी जमलंच नाही. आता जमतंय, निघालोय तर त्याचा आनंद होण्याऐवजी तू तर काळजीच करत बसलीयस. . “
” तसे नव्हे हो. . “
” अगं, आपण दोघेच का निघालोय काळजी वाटायला. यात्रा कंपनीतून जातोय, खूप लोक असतात. . अगदी ऐंशीच्या घरातलेही असतात… उगा नको काही विचार करुस.. तिथे यात्रेकरूंची काळजी घेणारे कंपनीचे लोकही असतात. . काळजी सोड आणि आपल्याला जायला मिळतंय, आपण जातोय याचा आनंद घे. “
” तरी पण…”
” राधे, आता हे काय वय आहे का गं ‘पण’ लावायचं? जेव्हा ‘पण’ लावायचा तेंव्हा बिनबोभाट प्रेमाने माळ घातलीस. . . . हां पण तेव्हा तुझा कोणताही ‘पण ‘ असता तर मी जिंकलोच असतो बरं का?. . “
रावसाहेब हसत म्हणाले तसे राधाबाई काहीशा खुलल्या आणि निर्धास्त झाल्या. किती दिवसांनी त्यांनी ‘ राधे ‘ म्हणून संबोधले होते. त्यांचे ते’राधे’ ऐकून त्यांना पूर्वीचे दिवस आठवले आणि त्यांच्या चेहऱ्यावर मंदसे स्मित झळकले. राधाबाई खुललेल्या पाहून रावसाहेबांना बरे वाटले.
सहलीची सारी तयारी झाली होती. . चारपाच दिवसांनी पुण्याला जायचे आणि तिथून यात्राकंपनीसोबत उत्तर भारताची यात्रा. मन प्रसन्न झाले होते. कितीक दिवसांचे स्वप्न पूर्ण होणार होते. तशा काही दिवसांपासून कोरोनाच्या बातम्या यायला सुरुवात झाली होती पण भारतातील जनजीवन सुरळीत होते. शेजारचा बंडू दहावीच्या परीक्षेला बसला होता. रोज पेपरला जाण्याआधी तो नमस्कार करून आशीर्वाद घ्यायला यायचा. राधाबाई जाताना त्याच्या हातावर दहीसाखर ठेऊन आशीर्वाद द्यायच्या. त्याचा शेवटचा भूगोलाचा पेपर. राधाबाईंनी वाटीत दहीसाखर तयारच ठेवले होते. रावसाहेब त्याची हॉल मध्ये वाटच पाहत होते. बंडूची येण्याची रोजची वेळ टळून गेली तसे दोघेही अस्वस्थ झाले. ‘ का आला नाही बंडू अजून? ‘ दोघांच्याही मनाला काळजी पोखरू लागली.
” अहो, बंडू का आला नाही अजून? त्याचा आज शेवटचा पेपर आहे. जरा हाक मारून बघता का? “
रावसाहेबांनी बंडूला हाक मारली तसे त्याचे बाबाच बाहेर आले. रावसाहेबांनी बंडू न आल्याबद्दल विचारताच ते म्हणाले,
” अहो काका, त्याचा पेपर रद्द झालाय. संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर झालंय. बातम्या ऐकल्या नाहीत वाटते तुम्ही? अहो सगळेच बंद. बाहेर पडायचेच नाही घरातून. कोरोनाचे पेशंट वाढायला लागलेत. “
बराच वेळ बंडूचे बाबा माहिती सांगत होते. रावसाहेब, राधाबाई अस्वस्थ होऊन सारे ऐकत होते.
नेमकं काय झालंय? नेमकं काय घडतंय? काहीच समजत नव्हते. एक प्रकारची अस्थिरता, स्तब्धता, अनिश्चितता आणि अनामिक भय जगण्याला ग्रासून गेले होते. संपूर्ण महाराष्ट्रात निर्बंध लागू झाले. सारेच व्यवहार, व्यापार बंद होते. अत्यावश्यक कारण वगळता घरातून बाहेर पडायला बंदी होती. सारे जनजीवनच ठप्प झाले होते.
क्रमशः…
© श्री आनंदहरी
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈