वाचताना वेचलेले
☆ साहेब, ही बाई हरवली आहे… ☆ प्रस्तुती – सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆
काय चेष्टा करता ताई,
हा फोटो तुमचाच आहे,
वीस वर्षांपूर्वीचा.
हो साहेब
वीस वर्षांत मीच हरवले आहे.
नात्यांच्या घोळक्यात
मुलांच्या गलक्यात
सासरच्या धाकात
अखंड स्वयंपाकात
मी हरवले आहे
स्वत:च्या घरात
प्रपंचाच्या चाकात
प्रेमहीन संसारात
वासनेच्या अंधारात
मी हरवले आहे
मृगजळाच्या फंदात
हव्यासाच्या नादात
सुखाच्या शोधात
नशिबाच्या सौंद्यात
मी हरवले आहे
नवऱ्याच्या मर्जीत
मागण्यांच्या गर्दीत
अपेक्षांच्या झुंडीत
उपेक्षेच्या गंजीत
मी हरवले आहे
साहेब
ती सागरगोटे खेळणारी मुलगी शोधा
ती स्वप्न पाहणारी मुग्धा शोधा
ते उगाचच फुटणारे हास्य शोधा
ती हृदयाची धडधड
ती पापण्यांची फडफड
ती अर्थहीन बडबड
कुठे गेली शोधून काढा साहेब
ती शृंगाराची ओढ शोधा
ती समर्पणाची उर्मी शोधा
तो स्वच्छंद पक्षी
निळ्या नभावरील केशरी नक्षी
सात पावलांची अग्निसाक्षी
कुठे गेली ते शोधून काढा साहेब?
🌺 (Forwarded)
संग्रहिका – सौ. मेधा सहस्रबुद्धे
पुणे
मो 9420861468
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈