सौ राधिका भांडारकर
✈️ प्रवासवर्णन ✈️
☆ चला आसाम मेघालयाला… भाग – 2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆
या प्रवासातील अविस्मरणीय भेट म्हणजे भारत-बांगलादेश मैत्री गेट. मेघालय मध्ये भारत-बांगलादेश सीमारेषा ४४३ किलोमीटर (२७५ मैल) इतकी आहे. या मैत्री द्वाराजवळ, अलीकडे पलीकडे दोन्ही देशांचे झेंडे फडकत असतात आणि संध्याकाळी ते खाली उतरवले जातात. झेंडे उतरवणे म्हणजेच, कुठल्याही प्रकारचे वैमनस्य दोन्ही देशांमध्ये नसणे हेच अध्याहृत आहे. मेघालया मधून बांगलादेश मध्ये दगडांची निर्यात प्रचंड प्रमाणात होते. रस्त्यावरून जात असताना हे उंच उंच डोंगर ओरबाडले दिसतच होते.हे दगडही अनेक रंगी आहेत. लाल, जांभळे, पिवळे, स्वच्छ पांढरे. इथल्या लोकांचा दगडफोडी हा मुख्य व्यवसाय आहे व हे सर्व दगड बांगलादेशात पाठवले जातात. या मैत्री गेटावर ही दगड वाहतुक आम्ही प्रत्यक्ष पाहिली .अत्यंत सुरक्षित पद्धतीने ही निर्यात, येथील सैनिकांच्या देखरेखीखाली होत असते.. सीमेचे रक्षण करणारे हे नैसर्गिक पहाड आणि हे सैनिक दोन्हीही मला महान वाटले.
उमंगोट नदीच्या किनाऱ्यावर चे डावकी हे सीमावर्ती शहर आहे. यापूर्वी अमृतसरला वाघा बॉर्डर ला भेट दिली होती भारत-बांगलादेश मैत्री द्वाराची ही भेट तशीच संवेदनशील होती. उमंगोट नदी ही दोन्ही देशातून वाहते सहज मनात आले नदीला कुठले आहे सीमेचे बंधन !!या भिंती या मर्यादा मानवाने उभ्या केल्या. आणि त्याबदल्यात मिळवली ती कायमची अशांती!
उमंगोट नदीचं पाणी अगदी स्फटिकासारखे स्वच्छ आहे. संथ वाहणारे पाणी, चौफेर हिरवाईने नटलेले उंच पहाड ,मावळतीच्या वेळी या नदीतून केलेला नौकाविहार अत्यंत सुखद होता. पाण्याचा तळ नजरेला भिडत होता. ते पाहताना वाटले की माणसाचं मन या नदी सारखच नितळ का नाही असू शकत ?
क्रमश:…
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈