विविधा
☆ हरवलेलं आजोळ… ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆
आजोळी जायचा विषय निघाला आणि माझ्या मुलांच प्लॅनिंग सुरू झालं. किती दिवस जायचे गाडीत, पुढच्या सीटवर कोणी बसायचे, कोणता सिनेमा पहायचा, कोणत्या ट्रेकींगला जायचे, मोबाईल मधे कोणते गेम लोड करायचे, domino’s चा pizza, अमूलच ice-cream, डॅशिंग कार कुठे जाऊन खेळायचे, मॉल कोणता पहायचा, शॉपिंग कुठे करायचे, बापरे बाप भली मोठी यादी ती…..
आमच्या लहानपणी आजोळी जायचे म्हटले की नुसती धमाल असायची.
आगगाडीत बसून धुरांचे ढग पहात जाण्यात एक अनोखा आनंद असायचा.
आम्ही भावंडं प्रत्येक वळणावर इंजिन पहायला मिळावे म्हणून खिडकीत बसण्यासाठी धडपडत असू.
जायच्या आधी चार- पाच दिवस आमचा बॅग भरण्याचा कार्यक्रम सुरू व्हायचा. आत्ता सारख्या चाकांच्या बॅगा नव्हत्या त्यावेळी. त्यावेळी होत्या पत्र्याच्या ट्रंका जड च्या जड. कोणते कपडे घ्यायचे, तिथे गेल्या वर कायकाय करायचे ह्याचे नियोजन आम्हा भावंडांचे चांगले पाचसहा दिवस आधी सुरू होई. आमच्या मामाला दर मंगळवारी सुट्टी असायची. त्यादिवशी तर नुसती धमाल असायची.
मला चांगले चार मामा आणि दोन मावश्या आहेत त्यामुळे सगळे एकत्र जमलो की धमाल यायची. मला आता कौतुक वाटते ते माझ्या मामींचे एवढं सगळ्यांचे करतांना एकही आठी नाही कपाळावर. उलट प्रेमाने सगळ्यांना आग्रह करून करून वाढायच्या.
माझी आजी मात्र कडक शिस्तीची पण तेवढीच प्रेमळ. जेवण झाल्यावर सगळ्यांनी आपापली ताट धुऊन टाकायची हा तिचा नियम होता. आजी प्रमाणेच आजोबा पण कडक होते. त्यांना शिस्त आवडायची. आणखीन एक त्यांचा कटाक्ष होता तो म्हणजे प्रत्येक मुलींनी कपाळावर कुंकू लावायचेच.
त्यावेळी रोज आजोबा सगळयांना काहीना काही खाऊ आणायचे. आत्ता सारखे कॅडबरी, कुरकुरे, वेफर्स, pizza, burger असं काही नसायचे बरं का त्यावेळी. त्यावेळी आम्हाला मिळायचे ते करवंद, जांभळं, बोरं, श्रीखंडाच्या गोळ्या, गरे एकूण काय रानमेवा. आणि एक गंमत म्हणजे ते सगळ्यांना ओळीत उभं रहायला सांगत आणि स्वतः प्रत्येकाला ते वाटत.
त्यावेळी त्यांच्या चेहर्यावरचा आनंद आणि समाधान टिपण्या जोगा असायचा.
आत्ता सारखे हॉटेलिंग असं काही नसायचे त्यावेळी. बागेत डबे घेऊन जाऊन जेवायचे म्हणजेच हॉटेलिंग. काय मजा असायची सांगू त्यात !! खूप धमाल यायची. भाकरी, झुणका, वांग्याची भाजी, मसाले भात, पापड, तळलेल्या कुटाच्या मिरच्या आणि कांदा असा फक्कड ठरलेला बेत असायचा.
जेवणं झाली की मोठी मंडळी झाडाखाली चटई टाकून ताणून देत असत. आम्ही बच्चे कंपनी मात्र पत्यांचा डाव रंगवत असू. थोडसं उन उतरले की परत पकडापकडी, विटी दांडू असा खेळ रंगात येई. संध्याकाळी मात्र तिथली गाड्या वरची भेळ ठरलेली. आणि एक एक बर्फाचा गोळा.
आईस्क्रीमची सुद्धा एक धमाल असायची. मामा स्वतः ते पॉट मधे बनवायचा. खूप मेहनत घ्यावी लागते त्याला, आणि खूप वेळ लागतो, पण आजिबात तक्रार न करता आनंदाने आणि अगदी मनसोक्त ice-cream तो आम्हाला खाऊ घालायचा.
माझ्या आजोळी अंगणात छान मोठा जाई चा वेल होता. माझ्या मावसबहीणी सकाळी सकाळी त्या फुलांचे सुंदर गजरे बनवायच्या , मला काही बनवता येत नव्हता पण त्या कशा बनवतात ते पाहण्यातच खूप आनंद मिळायचा. दुपारच्या वेळी सगळे झोपले की आम्ही पत्र्यावर चढून जांभळे आणि पेरू तोडायचो. कधी सापडलोच तर एक धपाटा मिळायचा पण त्याचा काही फारसा परिणाम न होता वानरसेना दुसरे दिवशी परत पत्र्यावर हजर…
माझ्या एका मामाचे कार्यालय होते. त्यामुळे रात्री झोपायला दोन्ही बाजूला दहा दहा गाद्या घातलेल्या असायच्या. एकीकडे मुली आणि दुसरीकडे मुलं. साहजिकच आहे आम्ही सगळे मावस, मामे, आत्ते भाऊ बहीण जमलो की पंचवीस जण तर व्हायचो. मग काय रात्री पत्ते खेळणे, चिडवा चिडवी,चेष्टा मस्करी आणि गाण्याच्या भेंड्यांची मैफिल जमायची. शेवटी जेव्हा मामा चा ओरडा बसे तेव्हा शांतता पसरे.
आताना, कुठेतरी हरवली आहे ती अंगणातील जाई, जुई ,ती अमराईची मेजवानी , हरवला तो बर्फाचा गोळा, आणि तो पत्यांचा एक डाव, खरचं परत लहान व्हावं असं वाटतं परत बसावं आगगाडीत आणि परत धुरांच्या लोटांचा आनंद घेत मामाच्या गावी जावं, परत मनसोक्त दंगा करावा आणि लावावी पुरणपोळी ची पैज. रात्र रात्र जागून परत खिदळावे आणि जोरात मामाची हाक ऐकू यावी अरे झोपारे आता.
© सौ. श्रेया सुनील दिवेकर
मो 9423566278
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈