सौ राधिका भांडारकर

✈️ प्रवासवर्णन ✈️

☆ चला आसाम मेघालयाला… भाग – 6 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

आज स्वच्छ ऊन पडलं होतं. पाऊस नव्हता. पण सकाळचा गारवा जाणवत होता. काल हुकलेली रोप वे सफर आज केली. खाली संथ  वाहणारी ब्रह्मपुत्रा आणि डोक्यावर अथांग आकाश. केवळ मनोरम !!

गुवाहाटी पासून दहा किलोमीटर अंतरावर कामाख्या देवीचे मंदिर आहे. हे शक्तीदेवता सतीचे मंदिर आहे. व आसामी लोकांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. नीलाचल पर्वत श्रेणीत हे मंदिर स्थित आहे. भारतात देवींची ५१ शक्तीपीठे आहेत. यामध्ये आसाम राज्यातील कामाख्या मंदिर हे मोठे जागृत देवस्थान मानले जाते. महत्त्वाचे म्हणजे जिथे स्त्रियांची योनी किंवा मासिक पाळी  या विषयावर बोलणे ही टाळले जाते तिथे या मंदिरात देवीच्या योनीची आणि मासिक पाळीचा उत्सव साजरा केला जातो. सती देवीने स्वत्याग  केल्यानंतर शंकराने क्रोधित होऊन तांडवनृत्य सुरू केले. हे पाहून विष्णूने सतीच्या शरीराचे एकावन्न तुकडे केले.नीलाचल पर्वतावर सतीचा योनीभाग पडला. तिथेच आज हे कामाख्या मंदिर आहे. हे मंदिर पाहताना आणि ही कथा ऐकताना एक जाणवले की, स्त्रीच्या योनीला जीवनाचे प्रवेशद्वार मानले जाते. म्हणूनच सर्व सृष्टीनिर्मीतीचे  केंद्रही  स्त्रीलाच मानले जाते. एक प्रकारे स्त्रीचं महात्म्य या मंदिरात पूजले जाते.

आमच्या या प्रवासातले आणखी एक आकर्षण म्हणजे इथल्या सिल्क बनवणाऱ्या केंद्राला दिलेली भेट. रेशमाच्या किड्याचा न मारता बनवलेले हे आसामी सिल्क जगप्रसिद्ध आहे. तिथे अजूनही घरोघरी हातमागावर विणणारे  विणकर आहेत आणि त्यांची कारागिरी,कलाकुसर ही जगप्रसिद्ध आहे. आसामची मुंगा सिल्क साडी अतिशय प्रसिद्ध आहे  विशेषतः ती हाताने विणली जाते. आणि एका साडीस १५ ते ४५ दिवस तयार होण्यास लागू शकतात. या हातमाग केंद्रावरचे  विणकर अतिशय तन्मयतेने आपले काम करताना दिसले. खरोखरच बारीक कलाकुसरीचे आणि मेहनतीचे काम आहे हे!त्यांच्या कलेला मी मनोमन सलाम केला!

आजूबाजूला असलेल्या दुकानात मात्र पर्यटकांची खरेदीसाठी छान धावपळ चालू होती. अर्थात हे स्वाभाविकच आहे ना ?बहुतेकांनी साड्या, कुर्ते, स्कार्फ यांची खरेदी केली.

तर मंडळी! आसाममध्ये हा आमचा शेवटचा दिवस होता. आता पुन्हा बॅगा भरायच्या. परतीच्या प्रवासाचे बॅगा भरणे हा एक विलक्षण भावनेचा खेळ असतो.आणलेले सामान विस्कटलेले असते. शॉपिंग चे सामान ठेवायचे. पुन्हा विमानाचा प्रवास म्हणून वजनाचे दडपण असते. या कोंबाकोंबीत अर्थातच घराकड ची ही ओढ असतेच. आणि आता पुन्हा आपले रुटीन सुरू…… याचा काहीसा खेद भावही  असतो.

इंडिगो च्या फ्लाईट नंबर ६४३५ ने आम्ही मुंबईला आलो. आणि समूहातील लोकांची पांगापांग झाली. बाय बाय,नक्की भेटू, पुन्हा एकत्र जाऊ,वगैरेंची आश्वासने दिली घेतली.

या परतीच्या प्रवासात होत्या, दाटलेल्या आठवणी! अठवडाभर वेचलेल्या आनंद क्षणांची एक नशा!! एका वेगळ्याच प्रांताच्या, भौगोलिक सांस्कृतिक ऐतिहासिक निसर्गरम्य आठवणी मनात खोलवर  साठवून निघालो. अभिमानाने विचार आला, खरोखरच आपली भारत भूमी महान आहे!! किती वैविध्य आहे आपल्या देशात! तरीही संस्कृतीचा एक धागा या विविधतेला ही कसा जुळवून धरतो!! वेश,भाषा, वर्ण, धर्म यापलीकडे असतो तो फक्त माणूस!! हाडामासाचा आणि भावनेचा एकसंध!!पर्यटनात ही भावना मनात रुजते.एखादा आसामी माणूस जेव्हां, “नमस्कार !”असे म्हणून आपले स्वागत करतो तेव्हाच तो आपला होऊन जातो.

शिवाय एक जाणवलं, किती संपन्न आहे आपला देश! या मातीत काय आणि किती उगवतं !किती उत्पादकता आहे या भूमीत! खरोखरच सुजलाम् सुफलाम् मलयज

शीतलाम् !!निसर्गदेवता अनेक अंगांनी अलंकार घालून, नटून-थटून आपल्यासमोर उभी आहे! या निसर्गाची आपण खरोखरच मनापासून जपणूक केली पाहिजे, या विचाराला बळकटी येते.

तसेच काहीसे मागासलेपण, गरिबी  पाहूनही मन कळवळतं.  पर्यटनाचा विकास होत आहे परंतु तो अधिक वेगाने झाला पाहिजे व जगात भारत देशाची प्रतिमा उजळली पाहिजे असं प्रकर्षाने वाटत रहातं.अमेरिकेत एखाद्या नैसर्गिक धारेचाही कॅस्केड म्हणून गाजावाजा करून देशोदेशीच्या पर्यटकांना तिथे अत्यंत सुविधापूर्ण रितीने आकर्षित करुन घेतले जाते. एक धार ते नायगारा साठी तितकेच पर्यटक गर्दी करतात. आणि आपल्याकडे डोंगराडोंगरातून वाहणारं हे सौंदर्य टिपण्यासाठी काही मूठभर लोकच दिसतात!! याचा विषाद वाटतो!

जे पाहिलं,अनुभवलं,वेचलं ते तुम्हालाही द्यावं असं वाटलं म्हणून हा सारा लेखनप्रपंच!!

केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार मनुजा ज्ञान येत असे फार।। हेच खरे.

 बाय-बाय!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments