सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ मी प्रवासिनी क्रमांक २२ – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
जॉर्डन – लाल डोंगर, निळा सागर
जॉर्डनवर बाबीलोनियन, पर्शियन यांच्यानंतर इसवी.सन ६३ पर्यंत नेबेटिअन्सनी राज्य केलं.इ. स. पूर्व दुसऱ्या शतकापासून पेट्रा ही नेबेटिअन्स राज्यकर्त्यांची राजधानी होती. हिंदुस्थान ,चीन, युरोप यांना जोडणारा व्यापारी मार्ग पेट्रावरून जात असे.नेबेटिअन्सनी या व्यापारी मार्गावरून जाणाऱ्या उंटांच्या कबिल्यांना, व्यापार्यांना संरक्षण दिलं व त्यांच्याकडून करवसुली केली. त्याकाळी हिंदुस्थानातून मसाल्याचे पदार्थ,रेशीम, अरबस्तानातून सुगंधी धूप व ऊद, आफ्रिकेतून हस्तीदंत व जनावरांची कातडी यांचा व्यापार होत असे. नेबेटिअन्सकडून राज्य घेण्याचा प्रयत्न ग्रीकांनी केला. नंतर रोमन जनरल पॉ॑म्पे याने सिरिया व जॉर्डन जिंकून घेतलं . रोमन्सनी शहराचं पुनर्निर्माण केलं. मोठ्या रुंद रस्त्यांच्या कडेने उंच कलाकुसरीचे दगडी खांब उभारले. सार्वजनिक बाथस्,ॲ॑फी थिएटर्स, सुंदर इमारती, कारंजी उभारली. व्यापारी मार्ग ताब्यात घेतला. नंतर रोमन साम्राज्यात ख्रिश्चन हा अधिकृत धर्म ठरविण्यात आला. दोन चर्चेस बांधण्यात आली. पुढे सातव्या शतकात इस्लामचा प्रसार झाला. इसवी सन ७३७ मध्ये भयानक भूकंप झाला आणि पेट्रा गाडलं गेलं, नाहीसं झालं व नंतर विस्मृतीत गेलं. इसवी सन १८१२ मध्ये स्विस प्रवासी जोहान बर्कहार्ड यांनी प्रयत्नपूर्वक पेट्रा शोधून काढलं व पेट्राचं पुनरुज्जीवन झालं.
आज मदाबा व माउंट नेबो इथे जायचं होतं. माउंट नेबो हा दोन हजार पाचशे फूट उंचीचा डोंगर आहे .डोंगरावर जायला चांगला रस्ता बांधून काढलेला आहे. दोन्ही बाजूला छोट्या बागा, फुलझाडं, ऑलिव्ह वृक्ष आहेत. सुरुवातीला पुस्तकाच्या पानासारखं उंच, आधुनिक शिल्प आहे. त्यावर तिथे भेट दिलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींची नावे कोरली आहेत. माउंट नेबो इथे मोझेसचं दफन केलं असं समजलं जातं. म्हणून ही जागा धार्मिक, पवित्र मानली जाते. या डोंगराच्या माथ्यावर उभं राहिलं की जॉर्डन रिव्हर व्हॅलीचं दृश्य दिसतं. तसंच इथून मृत समुद्र (डेड सी ) व जेरूसलेमचे डोंगर दिसतात . चौथ्या शतकातील एका भग्नावस्थेतील चर्चच्या पुनर्बांधणीचे काम चालू होतं. मूळ चर्चमध्ये सापडलेल्या मोझॅक टाइल्स व्यवस्थित मांडून त्यांची सफाई करण्याचं, रंग देण्याचं काम चालू होतं. या मांडलेल्या टाइल्समध्ये आपल्या बारा राशींची चित्र – मेंढा, विंचू, मासा वगैरे- होती. जिथून जॉर्डन रिव्हर व्हॅली दिसते त्याठिकाणी ब्रांझचे एक आधुनिक शिल्प उभारलेलं आहे. काठीसारख्या उभ्या खांबाभोवती अनेक सर्पाकृतींनी विळखा घातला आहे असे ते शिल्प आहे. मोझेसने स्वसंरक्षणार्थ काठीपासून साप तयार केले अशी गोष्ट गाईडने सांगितली. या सर्पाकृतीच्या डोक्यावर क्रॉसचं चिन्हआहे.
तिथून एक मोझॅक टाइल्सची फॅक्टरी बघायला गेलो. एका तरुण स्त्रीने अस्खलित इंग्रजीमध्ये मोझॅक टाइल्सच्या छोट्या- छोट्या तुकड्यांपासून सुंदर चित्रं कशी बनविली जातात ते सांगितलं.जॉर्डनमध्ये स्त्रिया शिकलेल्या आहेत. बुरख्याची पद्धत नाही.पण केस झाकलेले असतात. तरुण मुली जीन्स-टॉप वगैरे पाश्चात्य वेशात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करतात. शिक्षिका म्हणून अनेक जणी नोकरी करतात. तसेच त्या पोलीस व सैन्यदलातही काम करतात. फॅक्टरीमध्ये स्त्रिया कापडावर तऱ्हेतऱ्हेची पानं-फुलं,मोर, धार्मिक चित्रे यांची डिझाईन्स शाईने काढून त्यावर रंगीत मोझॅक टाइल्सचे छोटे तुकडे फेव्हिकॉलने ( पूर्वी यासाठी वेगळा विशिष्ट झाडाचा डिंक वापरत असत ) चिकटवीत होत्या. यातून भित्तिचित्र, टेबल टॉप, फ्रेम्स बनवत होत्या. शिवाय तिथे सिरॅमिक डिशेस, उंची फर्निचर विक्रीसाठी ठेवलं होतं.
तिथून मदाबा इथे गेलो. सेंट जॉन चर्चकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला अनेक विक्रेते स्थानिक व धार्मिक कलाकृतींची विक्री करत होते. दिल्लीहून एक खूप मोठा ख्रिश्चन ग्रुप आला होता. या सेंट जॉन चर्चमध्ये ६ व्या शतकातला,मोझॅक टाइल्सचा होली लँड दाखविणारा नकाशा आहे. चर्चच्या अंतर्भागातील जमिनीवर हा नकाशा मोझॅक टाइल्सच्या वीस लाख रंगीत तुकड्यांनी बनविलेला आहे. यात डोंगर-दऱ्या, नाईल नदीचा त्रिभुज प्रदेश, पॅलेस्टाईनमधील गावे,बेझेंटाईन काळातील जेरुसलेम म्हणजे ‘होली लॅ॑ड’ असे सारे दाखविले आहे. आधी बाहेरच्या हॉलमध्ये प्रोजेक्टरच्या सहाय्याने गाईडने हे नकाशा चित्र समजावून सांगितले. नंतर चर्चच्या अंतर्भागातील थोड्या काळोखात असलेला, जमिनीवरील हा मोझॅक टाइल्सचा नकाशा आम्ही बॅटरी…
जॉर्डन भाग– २ समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈