वाचताना वेचलेले
☆ विहीर – ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆
परसदारी विहीरीवर
दर रात्री दिवा ठेवताना
अजूनही हात थरथरतो….
विहिरीतून छिन्न आठवणी
बाहेर सांडतात….
काही ठळक तर काही अगदी पुसट….
निथळतं लाल आलवण
अन् भुंडा हात..
मनावर अधोरेखित झालेला
बघ्यांचा खोल निःश्वास……..
एक परकरी काया
घुसमटलेला श्वास
हातात चिंधीची बाहुली
भिजून तट्ट फुगलेली…..
कमुआत्याचं लग्न मोडलं,
त्याच्या दुस-याच दिवशी
विहिरीवर घुमलेला आवाज “धप्प”…….
दादा परागंदा झाल्यावर
खुळावलेल्या वहिनीचं
तासन् तास विहीरीवर बसणं
अन् कधीतरी खोल झेपावणं…..
एक अतिक्षीण आक्रोश ही ऐकू येतो…
खोल गर्भातून आल्यासारखा….
अज्ञात भ्रूणाचा…..
त्याचं नातं चौघीपैकी कोणाशी?
आई, आजी मूग गिळतात….
“ही विहीर बुजवत कां नाही ?”
आईला विचारलं,
तर विहीरीच्या काठावर आपला
खडबडीत हात फिरवत म्हणाली,
“बाईला विहीर लागतेच गं”
— अनामिका
संग्राहक : – श्री सुनीत मुळे