श्री प्रमोद वामन वर्तक
कवितेचा उत्सव
त्रा ता !
श्री प्रमोद वामन वर्तक
ताप वैशाख वणव्याचा
साहवेना मजला आता,
बोले येऊन काकुळतीस
काळी भेगाळली माता !
जीव सुखला तुजवीण
रुक्ष लाव्हारुपी झळांनी,
अंग अंग पेटून उठले
मागू लागले सतत पाणी !
बीज कोवळे पेरणीचे
मज गर्भात आसुसलेले,
कधी होईल जन्म माझा
सारखे विचारू लागले !
चार थेंब पडता तुझे
तप्त साऱ्या अंगावरती,
हवा हवासा मृद् गंध
पसरेल साऱ्या आसमंती !
नांव सार्थ करण्या माझे
सकलांची धरणी माता,
नाही तुझ्याविना जगात
मज दुसरा कुणी त्राता !
© श्री प्रमोद वामन वर्तक
२३-०५-२०२२
ठाणे.
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈