श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

पावसाच्या धारा… ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

“काय रे,काय करतोयस ?”

“काही नाही रे,बसलोय निवांत,”

“निवांत”?

“होय,खिडकीपाशी बसलोय पाऊस बघत!”

“पाऊस बघतोयस? काय लहान आहेस काय?”

“लहान नाहीय रे,पण लहान झालोय”

“आता शहाणा की खुळा?”

” म्हण  खुळा हवं तर.पण मी झालोय लहान.तू बसला असशील मोबाईल घेऊन बोटं बडवत.पण इथं खिडकीपाशी बसून पाऊस बघताना,रस्त्याच्या कडून वाहणारं पाणी बघताना,वाहून गेलेलं सगळं आठवतं बघ.पावसाच्या पाण्यानं खिडकीच्या काचा पण झाल्यात स्वच्छ!म्हणून की काय,सगळं स्वच्छ दिसतय बघ.आठवतंय तुला,आपल्या वेळेला पाऊस आणि शाळा एकदमच सुरू व्हायचं.जणू काही पावसाचीपण उन्हाळ्याची सुट्टी संपायची आणि त्याची जाणीव झाली की तो  एकदम धावत यायचा.ज्या आठवड्यात शाळा सुरू,त्याच आठवड्यात पाऊस सुरू.मग आपले नवे कोरे युनिफॉर्म,दप्तर आणि वह्यापुस्तकं जपत,सांभाळत,रेनकोट घालून अवघडत चालत चालत शाळा गाठायची.शाळाही सगळी ओलीचिंब! बाहेरून आणि बरीचशी आतूनही.पण बरेचसे शिक्षक मात्र आतून कोरडेच असायचे.पावसात सुद्धा थोडासा उशीर झाला तरी पट्टीचा एक फटका बसणारच हे नक्की.

फटका आठवला आणि भानावर आलो बघ.ते बघ,ती चिखल तुडवणारी पोरं.एकमेकांच्या अंगावर पाणी उडवणारी पोरं.ते बघ,तिकडून आली  ती दोघं, कागदाच्या होड्या घेऊन.आता या मोठ्या पावसात काय टिकणार या होड्या?पण केव्हा एकदा होडी सोडतोय पाण्यात असं झालंय त्यांना.ते बघ तिकडं रंगीत पट्टयापट्टयाची छत्री घेऊन कोण आलय.सुटलं वारं आणि झाली छत्री उलटी.आता काय,नुसती रडारड.पावसाच्या मा-यापेक्षा   घरच्या माराचीच भीती जास्त.ती बघ अंगणातली छोट्यांची फौज.गोल गोल फिरत सुरू झालीत गाणी पावसाची.”पावसाच्या धारा,येती झरझरा…”पलिकडे बघ   जरा.शेजारच्या काकू आल्या धावत आणि पडल्या धबक्कन चिखलात.सगळी पोरं हसताहेत

फिदीफिदी. आता वाळत टाकलेले कपडे एवढ्या पावसात भिजल्याशिवाय राहणार आहेत का? कशाला घाई करायची? जाऊ दे,आपल्याला तर मजा बघायला मिळाली की नाही !अशा सगळ्या गमतीजमती डोळ्यासमोर उभ्या राहतात चित्र बनून असा पाऊस बघायला लागल्यावर.म्हणून थोडा वेळ तरी लहान व्हायचं असतं.नाहीतर उद्या पेपर आहेच की ,कुठं झाडं पडली,कुठं नुकसान झालं,कुठं दुर्घटना घडली हे सगळं वाचायला.हे सगळं घडू नये असं वाटतं पण तरीही घडत असतंच.मग असं थोडं मागचं आठवाव,मनाच्या पुस्तकाची पानं फडफडावीत आणि जरा ताजं तवान व्हावं.हे सगळं आठवता आठवता पावसाचा जोर ओसरला बघ.चला,आता जरा गरमागरम चहा मिळतोय का बघूया.सारखं खिडकीत बसून कसं चालेल?येतोयस का चहाला?तू कशाला येशील म्हणा?तिकडे भजावर   ताव मारत असशील,होय ना?

चला, दुसरी सर यायच्या आत चहाची एक फेरी होऊन जाऊ द्या !

©  श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments