श्री रवींद्र सोनावणी
कवितेचा उत्सव
☆ पारीजात… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆
आज अचानक, मनात फुलला, वृक्ष पारीजात,
गुपित कानी सांगून जाता, सुगंधित वात ||धृ.||
तृषार्त या धरणीवर पडता, पाऊल मेंदीचे,
मनात माझ्या मळे उमलले, ते निशिगंधाचे,
कसा पोहचला? कळले नाही, ताऱ्यांनाही हात ||१||
काळे काळे खडक प्रसवले, निर्झर मोत्यांचे,
निनादले कानांशी अवचित, कुजन सरीतेचे,
गंधर्वाचे थवे उतरले, प्रणयगीत गात ||२||
आज उराशी घट्ट बिलगले, ते स्वप्नांचे ससे,
माध्यांनीला चंद्र नभीचा, मन पंखावर बसे,
सलज्ज वदना अहा! प्रगटली, संध्या ऋतुस्नात ||३||
© श्री रवींद्र सोनावणी
निवास : G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५
मो. क्र.८८५०४६२९९३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈