श्रीमती उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ सुनू मामी… – भाग-3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण पाहिले – निगुतीनं खाणं-पिणं होत असल्याने मामाची कांती आणखीनच उजळलीय.)
पुढे आणखी काही दिवसांनी आणखी काही बातम्या आल्या. याच्या विपरितशा. मामाला दारूचं व्यसन लागलय. पैसे हाती आले, की नशापाणी करतो. पैसे नाही मिळाले, तर घरातल्या हाताला लागतील त्या वस्तू विकतो. तिने आपला कोल्हापूरी साज विकून नांगर आणला, तर मामाने पुन्हा तो नांगर विकून टाकला. कारण विचारलं, तर बाळंतपणाचा खर्च कुठून करायचा म्हणाला.
तिला मुलगा झाला. तिच्यासारखा नव्हे. मामासारखा गव्हाळी वर्णाचा. गोंडस. तो तिचा आनंद होता. तिचं सुखनिधान होतं. तिने मुलाचं नाव आनंद ठेवलं. मामाला असं झालं होतं, की ती कधी एकदा बाळंतिणीच्या खोलीतून बाहेर येते आणि नेहमीसारखी विहिरीवरून पाणी आणणं, शेतात खपणं वगैरे कामे करते. रोजच्या रोज विहिरीतून कोण पाणी ओढणार? आपल्याच्यानं नाही होणार!
दहा दिवस सरले आणि तिने बाळंतिणीची खोली सोडली. ती पुन्हा कामाला लागली. घरात-शेतात राबू लागली. काटकी काटकी जोडून संसार बांधू लागली. शेतात पीक उभं राहिलं. लोक मामालाम्हणाले, ‘सगळं बायको करतेय. तू निदान राखण तरी कर. ‘ तो रात्रीचा राखणीला गेला. दारूचा अंमल जरा जास्तच झाला होता. मचाणावर आडवा पडला. रात्री चोरांनी उभं पीक कापून नेलं. याला जाग आली नाही. नंतर एकदा कोहाळे काढून ढीग लावून ठेवला होता. रात्री रानांजरं आली. कोहाळ्यांचा सत्यानाश झाला. हा दारूच्या नशेत.
मामाचं दारूचं व्यसन आता खूपच वाढलं होतं. ती काटकी काटकी जोडत होती. तो मोडून खात होता. अशातच तिचा आनंद वाढत होता. आता तो रांगायला लागला होता. ती एकदा विहिरवर धुणं धुवयला गेली. तिथेच असलेल्या सदाला त्याच्याकडे लक्ष ठेवा, म्हणून सांगून गेली. ती धुणं धुवून येते, तर आनंदाने रांगत जाऊन चुलीतल्या गरम राखेत हात घातला. चटका बसताच रडायला लागला. सदा तिथेच, पण दारूच्या अमलाखाली. आनंदला जाऊन उचलणं, त्याला सुधारलं नाही. पुढे त्याला शहरातल्या दवाखान्यात नेऊन औषधपाणी करावं लागलं. आता तिने आनंदच्या बाबतीत त्याच्यावर विसंबणं सोडून दिलं.
दिवसामागून दिवस, रात्रीमागून रात्री, दिवस, महिने, वर्षं सरत होती. आमच्या घरातली मुलेही कुणी शिकण्यासाठी, कुणी नोकरीधंद्यासाठी शहरगावी जाऊन स्थिरावली. इथे आम्ही चार-सहा जणच उरलो. सगळ्या गावची अशीच तर्हार.
एक दिवस सुनुमामी आपल्या सहा वर्षाच्या मुलाला हाताशी धरून माझ्या दारात उभी राहिली.
‘सुनुमामी तू?… आणि मामा कुठाय?’ तिने गल्लीच्या तोडाशी उभ्या असलेल्या हातगाडीकडे बोट दाखवलं. त्यावर मामाचं प्रेत बांधलं होतं. तिथे आणखी दोघे-तिघे उभे होते.
‘म्हणजे मामा…’ मी न बोललेले शब्द जसे तिने ऐकले.
‘तो जिवंत होता कधी?’ प्रश्नाचं उत्तर तिच्या डोळ्यात होतं.
इथपर्यंत याला घेऊन आले. इथून पुढे नेणं काही शक्य नाही. आनंदाला इथे ठेवते. मला यायला दोन-तीन तास तरी लागतील.’
‘तुला आणखी काही माणसे देते बरोबर!’
‘नको. गावाकडची दोघे-तिघे आहेत.’
क्रमश:…
© श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈