सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ मी प्रवासिनी क्रमांक २२ – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
जॉर्डन – लाल डोंगर, निळा सागर
इथून जेराश इथे गेलो. साधारण सहा हजार वर्षांपूर्वीच्या मनुष्यवस्तीच्या खुणा जेराश इथे सापडल्या आहेत. रोमन साम्राज्यात हे शहर वैभवाच्या शिखरावर होते. या शहराचे बरेचसे अवशेष सुस्थितीत आहेत. शेकडो वर्षे हे शहर वाळूच्या आवरणाखाली गाडलं गेलं होतं. सत्तर वर्षांपूर्वीच्या उत्खननात या सुंदर शहराची जगाला पुन्हा ओळख झाली. या शहराचं प्रवेशद्वार लाइम स्टोनचे चार उंच, भव्य खांब व कमानी यांनी बनलेले आहे. त्यावरील चक्रं, पानं, फुलं यांचे डिझाईन बघण्यासारखं आहे. रस्त्यांवर मोठ्या चौकोनी लाद्या तिरक्या बसविलेल्या आहेत. रथाच्या घोड्यांचे पाय घसरू नयेत म्हणून ही व्यवस्था होती. एका बाजूला टेकडीवर चर्च आहे तर एका टेकडीवर डायना या रोमन देवतेचे देऊळ आहे. डायना ही समृद्धीची निसर्गदेवता समजली जाते.थिएटर्स, खूप मोठे चौक, सार्वजनिक स्नानगृहे, कारंजी, आरोबा म्हणजे फ्लेश मार्केट, तिथली शेळ्या- मेंढ्या मारण्याची जागा, विक्रीची जागा, पाण्याची सोय अशा अनेक सोयी व बांधकामे तिथे बघायला मिळाली. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने सारं अतिशय प्रमाणबद्ध व प्रगत संस्कृतीचं द्योतक आहे. ग्रीक, रोमन आणि अरब यांच्या कला व संस्कृतीचा सुंदर संगम इथे पहायला मिळतो .
(जेराश,मृत समुद्र)
‘मृत समुद्र’ (डेड सी ) म्हणजे जॉर्डनमधील एक मोठं आकर्षण आहे. उत्तरेकडून वाहत येणारी जॉर्डन नदी या मृत समुद्राला मिळते. याला समुद्र असं म्हटलं तरी हे एक ५० किलोमीटर लांब व १५ किलोमीटर रुंदीचं खाऱ्या पाण्याचं तळं आहे. याच्या चहूबाजूंनी जमीन असल्यामुळे यात लाटा येत नाहीत. याचं वैशिष्ट्य म्हणजे मृत समुद्र व व त्याच्या परिसरातील जमीन ही पृथ्वीवरील सर्वात खोलवरची म्हणजे समुद्रसपाटीपेक्षा ४१० मीटर्स ( १३३८ फूट ) खोल आहे. पाण्याचा निचरा फक्त बाष्पीभवनामुळे होतो व त्यातले क्षार तसेच शिल्लक राहतात. त्यामुळे या समुद्राच्या पाण्याची क्षारता नेहमीच्या समुद्राच्या पाण्यापेक्षा दसपटीने जास्त आहे. हे क्षार मॅंगनीज, पोटॅशिअम, मीठ, ब्रोमीन, सोडियम या खनिजांनी समृद्ध आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात क्षार असल्यामुळे या पाण्यात जलचर जिवंत राहू शकत नाही म्हणून याचं नाव ‘मृत समुद्र’ असं पडलं.
या समुद्राच्या पाण्यामध्ये व त्यातील खनिजसमृद्ध माती, वाळूमध्ये त्वचारोग बरे करण्याचे, त्वचा सतेज करण्याचे गुणधर्म आहेत. तसेच सांधेदुखी, अस्थमा यावरही त्याचा उपयोग होतो. इसवी सन पूर्व पहिल्या शतकापासून या पाण्याचे औषधी गुणधर्म माहित होते. प्राचीनकाळी इजिप्तमध्ये मृत शरीराची ‘ममी’ तयार करताना जी रसायने वापरीत त्यातले प्रमुख रसायन मृत समुद्रातली माती हे असे. इजिप्तची राणी क्लिओपात्रा व राणी शिबा या त्यांच्या सौंदर्यप्रसाधनासाठी मृत समुद्रातली माती मागवून घेत.नेबेटिअन्सना या मातीचे गुणधर्म माहीत होते.प्रिझर्व्हेटिव्ह व जंतुनाशक म्हणून त्याचा वापर केला जात असे. तसेच त्यांनी या औषधी मातीचा व्यापारासाठीही उपयोग केला. आजही जॉर्डनमध्ये या मातीची पाकीटे, मातीपासून बनवलेली सौंदर्यप्रसाधने, क्रीम, लोशन विक्रीसाठी असतात.
नेहमीच्या समुद्राच्या पाण्याहून मृत समुद्राचं पाणी दसपट क्षारयुक्त व जड असल्यामुळे या पाण्यात कुणालाही तरंगता येतं. बुडण्याची धास्तीच नाही. अनेक प्रवासी मजा म्हणून या पाण्यावर पहूडून मासिकं,पेपर वाचतात. मृत समुद्रात तरंगण्याचा अनुभव जॉर्डनहून इस्त्रायलला गेल्यावर घ्यायचा असे आम्ही ठरविले होते. या समुद्राचा एक भाग इस्त्रायलमध्ये येतो.
जॉर्डनमध्ये खनिजतेल मिळत नाही पण इजिप्त वगैरे देशांकडून खनिजतेल घेऊन त्याचं शुद्धीकरण करणाऱ्या रिफायनरीज आहेत. चुनखडीचा दगड असल्याने सिमेंटच्या दोन फॅक्टरीज आहेत. सिमेंट व रेड सी भोवतालच्या डोंगरातील रॉक फॉस्फेट, पोटॅश निर्यात केलं जातं. ऑलिव्हची लागवड खूप मोठ्या प्रमाणावर आहे. ऑलिव्ह प्रॉडक्स व फळे निर्यात केली जातात.
मध्यपूर्वेतील ख्रिश्चन, मुस्लीम व ज्यू धर्मियांमध्ये सलोखा व्हावा, शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी ख्रिस्ती धर्माचे सर्वोच्च गुरू पोप फ्रान्सिस यांनी २०१४ मध्ये जॉर्डनला भेट दिली.आधीचे राजे किंग हुसेन व सध्याचे राजे किंग अब्दुल्ला (द्वितीय ) यांनी नेहमीच सामंजस्याची भूमिका घेऊन जॉर्डनची प्रगती साधली आहे.
सध्या सर्व जगामध्येच अस्वस्थता व अशांतता आहे. विज्ञानाचा उपयोग विनाशासाठी होतो आहे. गुंतागुंतीच्या राजकारणात सामान्य लोकांचे बळी जात आहेत. ही परिस्थिती सुधारून वेगवेगळ्या देशांमध्ये, धर्मामध्ये सौहार्दाचे संबंध प्रस्थापित व्हावेत अशी प्रार्थना करणं एवढेच आपल्या हातात आहे.
जॉर्डन भाग–३ समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈