सुश्री साधना प्रफुल्ल सराफ
अल्प परिचय
शिक्षण – B.Sc. (1st class with Hons) पुणे विश्वविद्यालय
सम्प्रति – 1995 पासून फ्री लान्स ट्रान्सलेटर म्हणून कार्यरत.
यातील विशेष कामगिरी:
- समकालीन ब्रिटिश कवयित्री ही पाच भागांची मालिका स्त्री मासिकातून प्रकाशित.यामध्ये कवयित्रींचा परिचय व त्यांच्या दोन कवितांचा अनुवाद सादर करण्यात आला.
- अॅडव्हरटारझिंग बेसिक्स हे अनुवादीत पुस्तक डायमंड प्रकाशन तर्फे प्रकाशित.
- ‘मेडन व्हाॅयेजेस’ धाडसी महिलां नी एकट्याने केलेल्या साहसी प्रवासाची प्रवासवर्णने ‘मस्त भटकंती’ मधून प्रसिद्ध.
- ‘प्रतिमा पैलतिरीच्या’ या चरित्रात्मक लेखांचे पुस्तक प्रकाशित..2016मध्ये.
- ‘तुमचे आयुष्य तुमच्या हाती’ अनुवादीत,प्रकाशन 2018.
याशिवाय शेती व्यवस्थापन,जल व्यवस्थापन व पाणलोट विकास,आयुर्वेदिक वनस्पती विषयी माहिती,लहान मुलांसाठी प्रयोग विज्ञान मालिका अशा विविध प्रकारच्या साहित्याचे भाषांतर केले आहे.
या व्यतिरीक्त स्वतंत्रपणे कथालेखन,ललितलेखन चालू आहे.
विविधा
☆ मनातलं कागदावर ☆ सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆
इथे नाशिकला आल्यापासून सकाळच्या वेळी बाहेरून पक्ष्यांचा सतत कलकलाट ऐकू येत होता. बाहेर बाल्कनीत येऊन नजर टाकली, तर शेवग्याच्या झाडावर इवल्याशा, मूठभर आकाराच्या सनबर्डस् ची नुसती झुंबड उडालेली दिसत होती. इतके सुरेख रंग त्यांचे, सूर्यप्रकाशात नुसते झळाळत होते. कोणी गडद निळ्या रंगामधे मधूनच झळाळणारी मोरपिशी छटा मिरवत होतं, आणि त्या मोरपिशी रंगाच्या पिसांवर ऊन पडल्यावर त्याच्यावर जी चमक येत होती, त्यावर नजर ठरत नव्हती! तर कोणाचा शेवाळी रंग मेंदीची आठवण करून देत होता. आणि काय ते त्यांचे विभ्रम! ते छोटुसं शरीर पूर्ण उलटं करून चोचीने त्या फुलांमधला मध ओढून घेऊन भुर्रदिशी उडून कुठेसे नाहीसे व्हायचे, बहुतेक त्यांच्या पिल्लांना तो मध भरवायला जात असावेत. काहीजण फक्त हाच उद्योग करत होते, तर काही उडाणटप्पू आपल्या जोडीदारांबरोबर मुक्तपणे विहरत होते. विलक्षण मोहक हालचाली होत्या त्यांच्या! त्या झाडामधून वरच्या दिशेला सूर मारून थोडसं वर आभाळात जाऊन ज्या काही सुरेख गिरक्या ते घेत होते, त्यानं माझी नजरबंदीच करून टाकली. परत वरून खाली सूर मारून त्या झाडाच्या फांद्यांमधूनही सफाईदार गिरक्या घेत थोडं खाली जाऊन उसळी मारून परत वर आभाळात! आणि या सगळ्या खेळात सूर्यप्रकाशाचीही मोठी भूमिका होती बरं! या सगळ्या गिरक्या आणि परन्यास, हो! पदन्यास नव्हे, परन्यासच! चालू असताना, आकाशातून, झाडाच्या फांद्यांमधून पाझरणाऱ्या सूर्यकिरणांनी त्या नृत्याला एक विलक्षण अशी रंगभूषा पुरवलेली होती! एखाद्या गिरकीच्या वेळी फक्त गडद निळा रंग चमकलेला दिसायचा, तर वरच्या दिशेने सूर मारताना मोरपिशी छटा झळाळून उठलेली दिसायची. पटाईत नृत्यांगनांनी लाजून मान खाली घालावी अशा हालचाली होत्या त्या चिटुकल्या पक्ष्यांच्या! आणि दोघांची प्रत्येक हालचाल इतकी विलक्षणपणे सारखी, की हल्लीचं सिंक्रोनाईज्ड स्विमिंग किंवा डान्सिंग यांच्याकडून प्रेरणा घेऊनच रचत असावेत, याची खात्रीच पटली माझी!
आणखी एक गम्मत माझ्या लक्षात आली, ती ही, की त्या झाडावर मध गोळा करणारे फक्त हे छोटेसे सनबर्डच दिसत होते. काही काळे भुंगे येत जात होते अधून मधून, पण आम्ही तिथे होतो, त्या पंधरा दिवसात एकही मोठा पक्षी त्या झाडावर आलेला दिसला नाही मला. म्हणजे, आपण माणसं स्वतःला फार बुद्धिमान आणि सुसंस्कृत समजतो, पण पक्ष्यांमधे असलेली ही सुसंस्कृत जाणीव उरलेली आहे का आपल्यात? दुर्बल गटांसाठी असलेल्या योजनांमधील कितीसा वाटा प्रत्यक्षात मिळतो, त्यांना? त्याच्यावर डल्ला मारणारे गब्बर अधिकारीच जास्त असतात! पण या छोट्या पक्ष्यांना त्रास द्यायला, त्या शेवग्याच्या फुलांमधला मध त्यांना मिळू न देता, स्वतः हडप करायला एकही मोठा पक्षी तिथे आलेला एकदाही मला दिसला नाही! कशी आणि कोण, ही जाणीव त्या एवढ्याशा पाखरांच्या एवढ्याशा मेंदूमधे जागृत ठेवत असेल? इथे देवाचा अदृश्य हात जाणवतो मला तरी! आणि आपल्या मेंदूमधेही असतेच ना, ही जाणीव, ‘त्याने’ दिलेली? पण आपण स्वार्थापोटी ती जाणीव पुसून टाकून आपल्यापेक्षा दुर्बल गटातील माणसांना आणखी दुर्बल बनवत असतो. हा आपल्या अधिक बुद्धिमत्तेचा उपयोग, की दुरुपयोग?
नेहमी आपण ऐकत आलोय, की निसर्गाकडून चांगल्या गोष्टी शिकायला पाहिजेत, पण पंधरा दिवसात या पक्ष्यांकडे बघून काय शिकायला हवं, त्याची लख्ख जाणीव मनात जागी झाली! आता या जाणीवेचा प्रसार व्हायला हवा, म्हणून हा लेखनप्रपंच!
© सुश्री साधना प्रफुल्ल सराफ
संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈