श्री उदय गोपीनाथ पोवळे

??

☆ अदृश्य लेबल – भाग – 2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

 माझ्याकडे बघून एक लहानसे पण छानसे स्माईल दिले. ………) – आता पुढे 

 त्या एका प्रसंगाने माझ्या गाडीने नाही तर माझ्या डोक्यातल्या  विचारांनी आता प्रचंड वेग घेतला होता. खरं तर मी घरून उशिरा निघून दुकानांत वेळेवर पोचायचा अट्टाहास करत होतो. जरा उशीर झाला असता म्हणून खूप काही मोठे नुकसान किंवा कोणाला दिलेला शब्द मोडणार नव्हता. घरातून उशिरा निघणे ही माझी चूक होती. पण कारण नसतांना मी त्याचे उट्टे, हे त्या पुढच्या गाडीवर काढत होतो आणि महत्वाचे म्हणजे पुढचा गाडीवाला गाडी हळू  चालवत असेल तर प्रत्येकानी त्याचे कारण गाडीच्या मागे लिहिणे खरंच गरजेचे आहे का ? का मी माझा सोशिकपणा दाखवून जरा धीराने विचार करू शकत नाही ?  आजच्या घडीला घरातून बाहेर पडणारा, कामाला जाणारा, रोज कमाईला निघणारा प्रत्येक माणूस काही ना काही दडपणाखाली असतो. प्रत्येकाच्या मनात असंख्य विचार घोळत असतात. कोणाची नोकरी गेलेली असते, तर कोणीतरी कॅन्सरसारख्या महाआजाराशी लढत असतात. कोणीतरी कोर्टातल्या भावनिक अशा घटस्फोटाच्या विचारात अडकलेला असतो, तर कोणीतरी आपला जवळचा प्रेमाचा माणूस गमावलेला असतो. कोणीतरी  त्याच्या धंद्यातल्या मोठ्या नुकसानाशी लढत असतो, तर कोणीतरी विजेच्या बिलाचे पैसे आजच्या शेवटच्या तारखेला कुठून आणू ह्या विचारात असतो. प्रत्येकजण आज आपल्या आव्हानात्मक आयुष्याबरोबर लढत असतो. कोणाच्याही चेहऱ्यावर त्याच्या मनात काय चाललंय, तो आज परिस्थितीशी कसा लढतोय, सुखाने सोडा पण समाधानाने जगण्यासाठी तो कुठच्या मनस्थितीत आहे ह्याचे लेबल लावलेले नसते, तसे त्याच्या कपाळावर लिहिलेले नसते. अशा वेळेला आज प्रत्येकाने एकमेकांना सोशिकतेने, धीराने बघितले पाहिजे. आज प्रत्येकाने फक्त आपल्याच समस्या, आपल्याच अडचणींचा विचार न करता समोरचाही काही अडचणीत आणि समस्येला सामोरे जात असेल हा विचार करून त्याचा आदर केला पाहिजे. माझीच समस्या मोठी आणि माझ्यापेक्षा मोठी समस्या दुसऱ्या कोणालाच नाही असा समज करून घेणे योग्य नाही.

प्रत्येकाने दुसऱ्याचा विचार करून धीराने थोडी सहनशीलता, सोशिकपणा आणि सबुरीने घेतले पाहिजे. महत्वाचे म्हणजे प्रत्येकाने आपल्यासमोर आलेल्या व्यक्तीच्या कपाळावर लिहिलेल्या अदृश्य लेबलचा मान राखला पाहिजे. प्रत्येकाने ते अदृश्य लेबल वाचायची आपली क्षमता वाढवली पाहिजे, तरच आपल्याही कपाळावर लिहिलेल्या अदृश्य लेबलचा दुसरे मान  राखतील.

चांगल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दोन अदृश्य लेबल नेहमीच असतात. एक सहनशीलता आणि दुसरे हास्य. हास्य त्याचे प्रश्न दुसऱ्यांना दिसून देत नाही आणि सहनशीलता त्याचे प्रश्न कमी करते.

चला प्रत्येकाच्या कपाळावरील अदृश्य लेबल वाचायचा प्रयत्न तरी करूया आणि त्याचा आदरही करूया.

समाप्त

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

०१-०५-२०२२

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments