जीवनरंग
☆ ते दहा तास… – भाग -1 ☆ श्री दीपक तांबोळी ☆
(मी चुपच झालो.बाई मोठी धीट दिसत होती.) इथून पुढे —-
मग आमच्या गप्पा रंगल्या. मला वाटत होतं ती एक साधी गृहिणी असावी। पण फँक्टरीच्या कामातही तिचा सक्रिय सहभाग असतो हे तिने मला सांगितलं. फँक्टरीच्या प्राँडक्ट्सची ,त्यांच्या प्रक्रियेची आणि मार्केंटिंगबद्ल तिला खडानखडा माहिती होती. नवऱ्यासोबत ती अनेक देशात जाऊन आली होती.
जसजसा मी तिच्याशी बोलत होतो तसतशी माझी नजर स्वच्छ होत होती. तिच्या सौंदर्याचा माझ्यावरचा परिणाम कमी झाला होता.त्याची जागा आता आदराने घेतली होती. इतकी धनाढ्य आणि कमालीची सुंदर असुनही तिच्यातला नम्रपणा, साधेपणा,तिच्यापुढे मी अगदीच क्षुल्लक असतांनाही माझ्याशी बोलण्यातली तिची आपुलकी, हे सर्व पाहून मी खूप भारावून गेलो होतो.
“थोडंसं याच्याकडे बघता का? मी जरा डिश धुऊन येते”.
मी होकारार्थी मान हलवली.
ती बेसिनपर्यंत पोहचत नाही तर तिचा मुलगा रडू लागला.मी त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो थांबेना. म्हणून मग मी त्याला उचलून घेतलं आणि पँसेजमध्ये फेऱ्या मारु लागलो. काय गोड होता तो पोरगा ! अगदी आईसारखा सुंदर, गोरापान, गुटगुटीत, चमकदार डोळे आणि लालचुटूक ओठांचा.एकदा जवळ घेतलं की सोडावसं न वाटणारा. रडतांनासुध्दा तो गोड वाटत होता.मी त्याला थोपटलं तसा तो झोपून गेला. तेवढ्यात ती आली.
“रडत होता वाटतं!” तिनं जवळ येऊन त्याला घेतलं आणि बर्थवर झोपवलं.
थोड्यावेळाने आम्ही दोघंही झोपलो. पण झोप आमच्या नशिबातच नसावी. रात्रीतून चार वेळा तिच्या मुलाच्या रडण्याने आम्हाला जागवलं. चारही वेळा मी त्याला घेऊन पॅसेजमध्ये फेऱ्या मारल्या. गंमत म्हणजे तोही माझ्याकडे लगेच येत होता आणि थोडं फिरवलं की खांद्यावर पटकन झोपत होता.
“मागच्या आठवड्यात आम्ही स्वित्झर्लंडला होतो.तिथली थंडी त्याला मानवली नाही म्हणून सर्दीमुळे सारखा किरकिर करतोय” तिनं स्पष्टीकरण दिलं.
सकाळ झाली. आख्खी रात्र जागरणात गेली होती. प्रत्येक आईच्या रात्री अशाच जागरणात जात असतील का? या विचाराने मी अस्वस्थ झालो.
एक तासाने नागपूर येणार होतं. आम्ही दोघंही बसून खिडकीबाहेर पहात होतो. रात्रभर जागूनही ती तशीच फ्रेश आणि सुंदर दिसत होती.
“घरी कोणकोण असतं?” तिनं अचानक प्रश्न केला.
” मी, आईवडील, दोन लहान भाऊ आणि एक बहिण. वडिलांनी तब्येतीच्या कारणास्तव स्वेच्छानिवृत्ती घेतलीय”
“म्हणजे तुम्हाला नोकरीची खरी गरज आहे”.
“हो तर! वडिलांच्या पेन्शनवर किती दिवस काढणार?”
तिनं पर्समधून मोबाईल काढला. कोणाशीतरी बोलली.बोलणं झाल्यावर मला म्हणाली “तुम्ही ज्या कंपनीत जाताय तिथं माझे काका मँनेजिंग डायरेक्टर आहेत. इंटरव्ह्यू तेच घेणार आहेत. मी आताच त्यांच्याशी बोलले. तुमचं नाव सांगा मी त्यांना एसएमएस करते”.
मी नाव सांगितलं। तिनं एसएमएस केला.
“तुम्ही भेटलात की त्यांना सांगा संजनाने पाठवलंय म्हणून”
“संजना कोण?” मी विचारलं
"मीच। माझंच नांव संजना” ती हसून उत्तरली.
” थँक्यू व्हेरी मच अँड सॉरी”
” सॉरी ?कशाबद्दल?” तिनं आश्चर्याने विचारलं
“काल मी तुमच्याकडे वेड्यासारखा बघत होतो.मी विसरुन गेलो होतो की तुम्ही विवाहीत आहात ,एका मुलाची आई आहात.माझी चूक झाली.आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर देट”
तीनं हलकसं स्मित केलं. म्हणाली.” फरगेट इट.अशा नजरांची मला सवय आहे.स्वतःची बायको सुंदर असतांना दुसऱ्या बायकांकडे पहाणारे अनेक पुरुष असतातच की. तुम्ही तर अनमँरीड आहात. आणि सुंदरतेकडे बघणं वाईट नाही पण त्यात वासना नसावी. तुमच्या नजरेत ती नव्हती. नाहीतर मी तुमच्याशी बोललेच नसते”
थोडं थांबून ती म्हणाली, “आणि काय हो रात्रभर कटकट न करता आपुलकीने तुम्ही माझ्या मुलासाठी जागताय त्याबद्दल मीही तुमचे आभार मानले पाहिजेत. खरं ना?”
” नाही नाही” मी घाईघाईने म्हणालो. ” अहो तुमचा मुलगा इतका गोड आहे की मी एक रात्र काय दहा रात्री जागून काढेन”. तिनं स्मित केलं आणि प्रेमाने मुलाच्या अंगावरून हात फिरवला.
नागपूर आलं. मी खाली उतरलो.तीही माझ्यामागे मुलाला घेऊन खाली उतरली.निघण्यापूर्वी मी तिच्या मुलाकडे हात पसरले.तो लगेच माझ्याकडे झेपावला.मी त्याला जवळ घेऊन त्याचे मुके घेतले.मग त्याला तिच्याकडे दिलं.रात्रभरात या पोराने मला चांगलाच लळा लावला होता.
“बेस्ट आँफ लक फाँर युवर इंटरव्ह्यू” ती म्हणाली.
“थँक्स”
जड अंतःकरणाने मी त्यांचा निरोप घेतला.
इंटरव्ह्यूमध्ये अगदी जुजबी टेक्निकल प्रश्न विचारुन एकशे साठ उमेदवारातून माझी निवड करण्यात आली.त्यामागे संजनाचा तो फोनच होता हे नक्की.
संजना त्यानंतर मला कधीही भेटली नाही.पण नाशिक ते नागपूरच्या त्या दहा तासात ती माझं जन्मभराचं कल्याण तर करुन गेलीच. पण आंतरबाह्य सौंदर्य कसं असतं याची खूप चांगली शिकवणही देऊन गेली.
समाप्त
© श्री दीपक तांबोळी
9503011250
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈