सौ. वंदना अशोक हुळबत्ते
पुस्तकावर बोलू काही
☆ हिरव्या हास्याचा कोलाज… श्रीमती उज्वला केळकर ☆ परिचय – सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆
पुस्तक परिचय :
पुस्तक–“हिरव्या हास्याचा कोलाज”
मूळ लेखक — गौतम राजऋषि
अनुवाद– उज्ज्वला केळकर
प्रकाशक–श्री नवदुर्गा प्रकाशन
“हिरव्या हास्याचा कोलाज”हे शीर्षक वेगळे आणि आकर्षक वाटले.नावावरून पुस्तक वाचण्याची उत्सुकता वाढली. हिरवा रंग समृध्दी सांगणारा, सुरक्षितता देणारा,हास्य म्हणजे आनंद, सुख या भावना दर्शवणारा,कोलाज म्हणजे अनेक क्षणांचे,अनेक भावनांचे,अनेक तुकडे एकत्र असून ही एकसंध असणे. शीर्षकावरून तर हा कथासंग्रह सकारात्मक उर्जा देणारा वाटला.
कथासंग्रहाच्या मुखपृष्ठावर चार जवान आपला सगळा जोर लावून मोठ्या शर्थीने आपला तिरंगा आसमंतात फडकवण्यासाठी झटत आहेत असे दिसते.या कथासंग्रहाचे मूळ लेखक गौतम राजऋषि हे भारतीय सेनेत कर्नल आहेत.त्यांचं पोस्टिंग बऱ्याच वेळा काश्मीरच्या दहशतवादी भागात आणि सरहद्दीवरील बर्फाळ, उंच पहाडी भागात झाले आहे.सैनिकी जीवनातील आव्हाने त्यांनी जवळून बघितली आहेत, पेलली आहेत. हेच अनुभव त्यांनी ” हरी मुस्कुराहटोंवाला कोलाज” या कथासंग्रहात मांडले आहेत.या कथासंग्रहाचा भावानुवाद जेष्ठ साहित्यिका उज्ज्वला केळकर यांनी केला आहे.
प्रत्येक भाषेचे सौंदर्य वेगळे असते, नजाकत वेगळी असते,भाव वेगळे असतात.अनुवाद करताना या साऱ्याचा विचार करून लेखन करावे लागते.लेखिकेचे दोन्ही भाषांवर प्रभुत्व चांगले आहे.हा कथासंग्रह वाचताना कुठेही या कथा अनुवादित आहेत असे वाटत नाही.लेखनाची भाषा प्रवाही आहे.प्रत्येक कथा लेखिकेची आहे असे वाटते.कथा चित्रमय आहेत, प्रवाही आहेत, उत्सुकता वाढवणाऱ्या आहेत.
काश्मीर घाटी, बर्फाच्छादित शिखरे, सैन्याची ठाणे,चौक्या, काश्मीर खोऱ्यातील लोकजीवन,तिथले सौंदर्य,चीड,देवदार वृक्षांची जंगले,चिनार वृक्ष,झेलम नदी, या साऱ्यांचे दर्शन या कथातून घडते. त्यांना प्रत्यक्ष बघण्याची इच्छा निर्माण होते.
भारतीय जवानांचे भावविश्व,त्यांचे जीवन,त्यांची दिनचर्या,त्यांचे कर्तव्य, कर्तृत्व,त्यांची संवेदना,त्यांचे शौर्य, धैर्य या सगळ्याचे एक कोलाज म्हणजे हा कथासंग्रह आहे.मुख्य म्हणजे हिरव्या वर्दीतील भारतीय जवानांन बदल आदर भावना वाढवणाऱ्या या कथा आहेत.
या कथासंग्रहात एकूण वीस कथा आहेत.या कथेतील नायक मेजर विकास,मेजर मोहित,मेजर गौरव इ. हे कर्तव्यदक्ष असून संवेदनशील आहेत.त्यांच्या भावनांचे कोलाज कथेतून जागोजागी दिसते.
सामान्य माणसाला सिनेमातील हिरोचे आकर्षक असते.त्यांचे गुणगान सगळे गात असतात.पण खरे हीरो हिरव्या वर्दीतील जवान आहेत.आपल्या जिवाची पर्वा न करता येणाऱ्या संकटाला ते धैर्याने सामोरे जातात.पण हे हीरो दुर्दैवाने जनमानसात तेवढ्या तीव्रतेने दिसत नाहीत.या बाबत या कथेत भाष्य केलेले आढळते.
दुसरे हौतात्म्य,मी सांगू इच्छितो,इक तो साजन मेरे पास नही रे,त्या दिवशी असं झालं,हॅशटॅग इ. कथा मनात घर करून राहतात.प्रत्येक कथेवर सविस्तर लिहिता येईल.पण इथं शीर्षक कथेचे चार ओळीत सार सांगते.उंच बर्फाळ पहाडावरील दुर्गम सरहद्दीवर पाहरा देणाऱ्या जवानांवर मेजर मोहित नजर ठेवून असतात.त्यांच्या कडक शिस्तमुळे “कसाई मोहित” अशी त्यांची ओळख असते.दुर्बिणीतून बघताना एका जवानाच्या पाहऱ्यात जराशी ढिलाई दिसते.त्याला जाब विचारण्यासाठी ते तडक तिथे जातात.पण त्याचे खरे कारण समजल्या नंतर ते मवाळ होतात.कामात दक्ष राहायची सूचना देवून तिथून बाहेर पडतात. तेव्हा त्या जवानाच्या चेहऱ्यावर हसू पसरते.माणूस किती ही कर्तव्य कठोर असला तरी भावना शून्य होवू शकत नाही.कर्तव्य जपताना संवेदना विसरून चालत नाही.आधीच मरणाच्या दारात उभं असताना आपुलकीचा एक शब्द ही आनंद पेरून जातो. हेच या कथेतून अधोरेखित होते.
बिकट प्रसंगांना ,घटनांना सामोरे जाताना हिरव्या वर्दीतील जवान नेहमी मरणाला समोरा जातो.तेव्हा कुठे सामान्य माणसाच्या चेहऱ्यावर हास्य फुलते!
आपल्या लाल जखमांचे प्रदर्शन न करता स्वतःच्या आणि सामान्य नागरिकांच्या आयुष्यात हास्याचा हिरवा कोलाज चितारणा-या जवानांच्या या कथा वाचल्यावर एकच शब्द ओठावर येतो तो म्हणजे’जय जवान’! आणि या कथा आपल्यापर्यंत पोहोचवणा-या लेखकाच्या लेखणीलाही सलाम!
© सौ.वंदना अशोक हुळबत्ते
संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६ ४१६
मो.९६५७४९०८९२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈