कवितेचा उत्सव
☆ आता थोडं जगून घे… ☆ सुश्री जयश्री कुलकर्णी ☆
किती दिवस उरलेत आता
थोडं तरी जगून घे
येत नसेल कविता करता
तीही थोडी शिकून घे
आता थोडं जगून घे
हातात हात घे तिचा
म्हण थोडं फिरायला जाऊ
सुंदर आहे विश्व सारं
त्यातलं सौंदर्य बघून घे
थोडं तरी जगून घे
सतत आपल्या कपाळाला आठ्या
घालून सांग का बसतोस?
अरे कधीतरी ,केव्हातरी ,
मनापासून हसून घे
थोडा तरी जगून घे
प्रश्न कधी संपत नाहीत
पण त्यात गुंतून बसू नकोस
विश्वासाने कोणाच्या खांद्यावर
मान ठेवून रडून घे
थोडं तरी जगून घे
आला क्षण थांबत नाही
ठाऊक आहे सारं तुला
पुढे चाललेल्या क्षणाबरोबर
थोडा आनंद भोगून घे
थोडं तरी जगून घे
© सुश्री जयश्री कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈