जीवनरंग
My father is the best mother… भाग – 1 – सुश्री ज्ञानदा कुलकर्णी☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆
“ My Father is the Best Mother on Earth !! ” —-हे वाक्य उच्चारल्या बरोबर टाळ्यांचा कडकडाट झाला आणि आजूबाजूला पाहिलं तर अख्ख ऑडिटोरियम टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून गेलं होतं .त्या टाळ्यांच्या Rhythm मध्ये मीही सहभागी झाले होते.
पण त्याचबरोबर आणखी एक गोष्ट आढळली ती म्हणजे अनेकांचे पाणावलेले डोळे….माझ्यासह…।।
प्रसंग होता एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेत साजरा होणारा….MOTHERS DAY CELEBRATION चा..
इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून असे कार्यक्रम घेतले जातात.
आंतरराष्ट्रीय दर्ज्याच्या शाळेतल्या हिरवाईनं सजलेल्या, विविध वृक्षसंपदा असलेल्या बगिच्यातील झाडांना उन,धूळ याची पर्वा न करता “तो” पाणी देत होता…..तेवढ्यात शाळेच्या शिपायाने त्याला सांगितले..
“ गंगादास..प्राचार्य मँडमनी तुला बोलवलयं…आत्ता लगेचच.. “
शेवटल्या दोन शब्दावरचा जोर निरोपाची तीव्रता अधोरेखित करत होता.
हात स्वच्छ करुन गंगा निघाला मँडमच्या केबीनकडे.
त्याची छाती धडधडत होती.रोजचा पायाखालचा रस्ता संपता संपत नव्हता. डोक्यात विचारांचे काहूर माजलेले.
कशासाठी बोलवलं असेल मॅडमने ? खूप शक्यता पडताळून पाहिल्या गंगाने.. All permutations, combinations…पण छे !आपल्या कामात चोख होता तो.
टकटक…टकटक…त्यानं दार वाजविले…
बाहेरुनच विचारले….
“ मॅडम, तुम्ही मला बोलावलंत ? “
“ आत ये.”..आतून एक जरब असणारा आवाज ..
तो आणखीनच Nervous…
दार लोटून तो आत गेला…
करडे,रुपेरी केसांची फ्रेंच नॉट घातलेली आणि धारदार नाकावर आकर्षक फ्रेमचा चष्मा असलेल्या प्राचार्यांनी त्याच्याकडे बघितले आणि टेबलवरच्या एका कागदाकडे बोट दाखवले……
म्हणाल्या….
“ वाच हे ! “
गंगा बावचळला पण लगेच म्हणाला…
“ मॅडम अहो मी निरक्षर माणूस, मला लिहता वाचता येत नाही.. आणि इंग्रजी तर फारच लांबची गोष्ट.
माझी काही चूक झाली असेल तर मला माफ करा…एक संधी द्या मॅडम मला….मी आजन्म ऋणी राहीन तुमचा. तुमच्या या बड्या शाळेत तुम्ही माझ्या मुलीला फुकटात शिकण्याची संधी दिली. मी तर स्वप्नातही हा विचार केला नव्हता….”
तो थरथर कापत, स्फुंदून स्फूंदून बोलत होता.
“ थांब जरा तू. शांत हो.खूप गोष्टी गृहीत धरल्यास तू. तुझ्या मुलीला शिक्षणाची संधी आम्ही दिली कारण ती खूप हुशार आहे आणि तू आहेस आमच्याकडचा आज्ञाधारक Gardner…माळी…..थांब जरा.”
बेल वाजवून शिपायाला त्यांनी एका शिक्षिकेसाठी निरोप धाडला… “ ही शिक्षिका आली की वाचून दाखवेल आणि अर्थही सांगेल तुला. “ कागदाकडे निर्देश करीत म्हणाल्या, “ हे तुझ्या मुलीनं लिहलयं आणि मला वाटत होतं की तू हे वाचावंस…
तेवढ्यात टीचर आल्याच. टीचरने वाचायला सुरवात केली आणि प्रत्येक ओळीचं हिंदी भाषांतर करत वाचलं.
ते लिहलेलं असं होतं….।
…. “ आज आम्हाला आमच्या “आई “बद्दल लिहायला सांगितले…. कारण Mother’s day….
बिहारमधल्या एका छोट्या खेड्यातून मी आले. शिक्षण आणि आरोग्यसुविधांची वानवाच तिथे. कित्येक माता बाळांना जन्म देतांना मृत्युला कवटाळतात. माझी आई त्यातलीच एक….मी या जगात आल्यानंतर मला कौतुकानं कवटाळताही आले नाही तिला. माझा बाबा हा पहिला व्यक्ती होता ज्यानी मला हातात घेतलं….आणि कदाचित एकमेव… प्रत्येक जण दुःखी होता…
कारण– कारण मी अशी मुलगी होते जिनं जन्माला येतांना आपल्या आईला खाल्लं….
— क्रमशः…
लेखिका – सुश्री ज्ञानदा कुळकर्णी.
संग्राहिका – सौ. स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈