श्री अरविंद लिमये
जीवनरंग
☆ ‘ऋणमुक्त’ – भाग – २ ☆ श्री अरविंद लिमये☆
(पूर्वसूत्र-माझ्या नजरेसमोर अंथरुणाला खिळलेली, शेवटच्या घटका मोजणारी, नाना भिकू कुलकर्णींची कृश मूर्ती अलगद तरळून गेली.)
“हं.. चला हतंच ” बेलीफ म्हणाला.
एका पडक्या वाड्यापुढे आम्ही उभे होतो. भुसभुशीत भिंतीच्या आधाराने कसंबसं तग धरून उभ्या असणाऱ्या दारांच्या चौकटीला धक्का न लावता बेलीफ अलगद आत शिरला. मी घुटमळत बाहेरच उभा राहिलो.
“साहेब, .. आत या ” बेलीफ म्हणाला. मी आत गेलो. पण त्या टिचभर खोलीत टेकायला जागाच नव्हती ! )
पडे निघालेल्या भिंतींसारखं त्या अंधाऱ्या खोलीतलं मलूल वातावरणही बोचणारं होतं. लाकडी फळ्यांच्या काॅटवर कुणीतरी झोपलेलं होतं. मास्तरच असावेत. आतल्या विझू लागलेल्या चुलाण्याजवळ सावली हलल्याचा मला भास झाला.
“ताईसाब, बॅंकेचं सायब आल्यात” बेलीफने मुद्द्यालाच हात घातला.
मांडीवरल्या पोराला खांद्यावर टाकून ती पुढे आली. त्या भग्न वाड्याच्या कृश सावलीसारखा रापलेला रंग, वाळलेल्या अंगकाठीवर लोंबणारं जुनेरं.. त्रासलेल्या चेहऱ्यावर उदासीत कालवलेले .. मला शापणारे भाव.. !
काय बोलावं, कशी सुरुवात करावी मला समजेचना.
एवढ्यात काॅटवरच्या अंधारात थोडीशी हालचाल जाणवली. बेलीफ पुढे झाला.
“मास्तर, ब्याकेचं सायब आल्यात.. “
“या.. या.. “कुलकर्णी धडपडत उठायचा प्रयत्न करु लागले. एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखा बेलीफ त्यांना सावरायला पुढे झेपावला.
“या.. बसा असे.. ” पायथ्याजवळची कळकट चादर गोळा करुन लाकडी काॅटचा एक कोपरा रिकामा करुन देत नाना भिकू कुलकर्णीनी मला थरथरते हात जोडत बसायची खूण केली. विरघळू पहाणारी माझी नजर रंग उडालेल्या भिंतींवरुन मास्तरांच्या वाळून गेलेल्या चेहऱ्यावर येऊन स्थिरावली.
“बोला.. काय म्हणताय?”
“हे बेलीफ. यांच्यामागोमाग आम्ही आलो. म्हणजे.. यावं लागलं.. ” मी बेलीफकडे पाहिलं.
“मास्तर, कोरटाचं वारंट निघलंय. तुमाला अटक कराय आलोय आमी.. “
“तुम्ही जामिनदार आहात ‘प्रसन्न इलेक्ट्रीकल्स’च्या कर्जाला. दोन वर्षांपूर्वी कोर्टाचा
हुकूमनामा मिळूनही कर्जखात्यात कर्जदाराने पैसे भरलेले नाहीत. त्यांची कांही मालमत्ताही नाही. आता त्यांच्या कर्जाचे जामिनावर म्हणून त्यांच्या पश्चात तुम्हीच बॅंकेचे एकमेव ऋणको आहात. एकूण व्याज, कोर्टखर्च मिळून वीसएक हजार रुपये भरावे लागतील… ” मी म्हणालो. ते विचारात पडले. गप्प बसले. शून्यात नजर लावून कांहीतरी शोधत राहिले.
मग बेलीफच पुढे झाला.
“मास्तर.. “
“अं.. ?”
“अटकेचा पंचनामा करायला हवा… “
“अं.. ? हो.. रितसर जे असेल, ते करा. तयारी आहे माझी. ” बेलीफला काय बोलावं कळेना. तो जागचा उठला. दाराजवळ जाऊन मला खूणेनं बोलावून घेतलंन्.
“काय करायचं?” हलक्या आवाजात मला विचारलं.
“कायद्यानुसार जे काही असेल ते करायचं. “
“त्ये झालंच. पन सायब मास्तर द्येवमानूस हाय हो. जावयानं पुरता धुतलाय याला. तुमचा मेल्याला कर्जदार जावईच की ह्येंचा. जाताना सोताचं न् ह्येंचं दोनी घरं पार धुळीला मिळवून मेलाय बगा. हाय खाऊन मास्तरांची बायकू गेली. सोन्यासारक्या यांच्या पोरीची जावयानं पार दशा करुन टाकलीया बगा. दोन पोरींच्या पाठीवरचं त्ये एक लेकरु हाय तिच्या पदरात. दोन घरी सैपाकाची कामं करुन चूल पेटती ठेवतीया. मास्तरांच्या पेन्शनीत त्येंचं औषदपानीबी भागत न्हाईय” बेलीफ सांगत राहीला. मी ऐकत होतो. नाना भिकू कुलकर्णींचं अंधारं म्हातारपण, अर्धवट जळलेल्या वाळक्या लाकडासारखा त्यांच्या मुलीचा धुरकट संसार, खोलीत भरुन राहिलेला कळकट अंधार.. आणि माझ्या मनात भरुन आलेलं मळभ… या सगळ्यांच्या नातेसंबंधातला गुंता वाढत चालला….. !
क्रमशः…
©️ अरविंद लिमये
सांगली
(९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈