श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 106 – दान मागते धरणी ☆
वृक्षवल्ली या फुलल्या सुंदर स्वर्ग भासते अवनी।
लाड पुरविण्या कुशीत घेई धरा नसे ही जननी।
अविरत शमवी क्षुधा तृषाही भरण पोषणा सजली।
अमृत रसमय फळे चाखण्या नित्य देतसे वदनी।
सोनेरी तव किरण भास्करा शेत शिवारी डुलती।
पहाट वारा मना भुलवितो शीतल छाया सदनी।
आनंदाची करण्या उधळण चंद्र चांदणे जमती।
नयन रंम्य त्या सोनकिड्यांनी नयन मनोहर रजनी ।
निसर्गास या नकोस लावू नजर मानवा जहरी।
जीव चक्र हे अखंड फिरते वसुंधरेच्या भवनी ।
भू जल वायू टाळ प्रदूषण दान मागते धरणी।
स्वच्छंदाने खुशाल घेई उंच भरारी गगनी।
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈