श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ मी सांगतो कथा जी… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(वृत्त: शुद्ध सती  मात्रा:८+४)

मी सांगतो कथा जी

तुमचीच रे कहाणी

तुमचेच हुंदके हे

तुमचीच ही विराणी !

 

आमंत्रणाविनाही

येतो कबीर दारी

गीतात नित्य वाजे

त्याचीच एकतारी !

 

ती दूरची तुफाने

त्यांचीहि गाज श्रवणी

वणव्यात दूर राने

त्यांचीहि राख कवनी !

 

तारा अनाम कोणी

माझा प्रकाश होतो

शब्दांस चांदण्याचे

आभाळ एक देतो !

 

त्या पैलपार हाका

भरती शिडात वारा

त्यांचीच ही कृपा की

कधि लाभतो किनारा !

 

मातीतल्या कहाण्या

झाल्या दिगंत काही

त्यांचीच मंत्रबाधा

या अक्षरांस काही !

 

जादू भगीरथांची

ये ओंजळीत गंगा

करी कोरडे निमित्त

घेण्यास श्रेय दंगा !

 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments