वाचताना वेचलेले
☆ सत्यवान, सावित्री आणि वटपौर्णिमेच्या निमित्ताने— श्री सुजीत भोगले ☆ प्रस्तुति – सुश्री गीता पटवर्धन ☆
(पुरोगाम्यांना कारल्याचा रस.)
सावित्री सत्यवान , करवा चौथ या सारख्या प्रथांच्या मध्ये पुरुष प्रधान आणि स्त्री शोषण संस्कृती शोधणाऱ्या निर्बुद्ध आत्म्याच्या साठी…
सावित्री ही राजकन्या. अत्यंत सुंदर, अत्यंत गुणवान तितकीच बुद्धिमान सुद्धा. तिच्या सौंदर्याची आणि बुद्धिमत्तेची कीर्ती अशी पसरली असते की तिच्याशी विवाह करण्याचे प्रस्ताव देव सुद्धा नाकारतात, ते पण या भीतीने की आपण तिच्याशी विवाह करण्यास पात्र नाहीत म्हणून.
अशा सावित्रीचा जीव सत्यवानावर जडतो. सत्यवानाचे वडील हे राजे असतात परंतु त्यांचे राज्य हरण होते. त्यांना अंधत्व येते आणि आता सत्यवान लाकडे तोडून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असतो. अशा सत्यवानाशी विवाह करायचे सावित्री ठरवते. नारदमुनी तिला त्याचे आयुष्य लग्नाच्यानंतर एकच वर्ष आहे या शापाची पूर्वकल्पना देतात, तरीही ती अविचल राहते आणि त्याच्याशीच विवाह करते.
इथे एक पराकोटीची बुद्धिमान आणि सुंदर राजकन्या जिची अभिलाषा देवांना सुद्धा आहे आणि त्याच वेळी आपण तिच्या पात्रतेचे नाहीत याची कल्पना असल्याने ते तिच्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव सुद्धा नाकारतात, हे दोन्ही सत्य समजून घ्या..
त्यानंतर तिला सत्यवान आवडतो आणि ती त्याला वरते. इथे मुलीला स्वतःचा वर निवडण्याची मुभा होती हे सुस्पष्ट होते. आज सुद्धा जिथे ऑनर किलिंग होतात तिथे हे समजणे अत्यंत आवश्यक आहे.
जुन्या काळात बऱ्याचदा असा प्रश्न येत असे– तुम्हाला बुद्धिमान पुत्र हवा असेल तर अल्पायु असेल. मंदबुद्धी चालणार असेल तर दीर्घायू होईल. त्याच प्रमाणे सावित्रीच्या समोरही प्रश्न निर्माण होतो. तिच्या सौंदर्य आणि बुद्धिमत्तेमुळे तिचा विवाह अशक्य होऊन बसला असतो. त्यावेळी सत्यवान आवडला आहे पण तो अल्पायु आहे हे समजते.
परंतु अल्पकाळ का होईना आपल्याला मनोवांच्छित पतीचा सहवास प्राप्त होईल म्हणून सावित्री त्याच्याशी लग्न करते. त्यात तिची गुणग्राहकता दिसते आहे.
नंतर यम ज्यावेळी त्याचे प्राण हरण करून घेऊन जाऊ लागतो, ती त्याच्याशी शास्त्रार्थ करते आणि त्याच्याकडून तीन वरदान मिळवते. यमाशी शास्त्रार्थ करणारे फक्त दोनच जण आहेत– एक नचिकेता आणि दुसरी सावित्री ( एक स्त्री आणि एक बालक. आपण या दोघांना सुद्धा अजाण समजतो ).
ती पहिल्या वरदानात सासऱ्यांच्यासाठी नेत्र मागते. दुसऱ्या वरदानात त्याचे राज्य मागते आणि तिसऱ्या वरदानात पती मागून घेते.
ती पहिल्यांदा आपल्या कुलाच्या हिताचा विचार करते. यमाने तिला पुढील वरदान दिले नसते तर तिचे सहगमन झाले असते. मग त्या दोघांच्या पश्चात वृद्ध आणि अंध सासऱ्याला नेत्र मिळणे आवश्यक , राज्य मिळणे आवश्यक, इतका विवेक तिचा त्या क्षणी सुद्धा जागा असतो.
सावित्रीची ही बुद्धिमत्ता आणि आपल्या कुलाप्रती असणारा समर्पण भाव हा आजच्या तरुणींनी आत्मसात करण्याच्या सारखी गोष्ट आहे.
आपल्याला आवडलेला पुरुषच पती म्हणून निवडणे आणि त्याच्यासह संसार करण्यासाठी साक्षात मृत्यूशी सुद्धा आपली बुद्धी पणाला लावून शास्त्रार्थ करण्याचे धाडस आणि बुद्धिमत्ता असणारी स्त्री, म्हणून सुद्धा आपण सावित्री कडे पाहू शकतो.
राजकन्या असणारी सावित्री आपल्या वडिलांच्याकडून आर्थिक मदत सुद्धा घेऊ शकली असती. परंतु ती मदत स्वीकारत नाही. नवऱ्याच्यासह झोपडीत सुखाने संसार करते. आपल्या आवडत्या पुरुषाच्यासाठी तडजोड करणे ती स्वीकारते, पण मनाविरुद्ध आणि गुणहीन असा नवरा स्वीकारत नाही. तिचा स्वाभिमानी स्वभाव हा गुण सुद्धा आत्मसात करण्यासारखा आहे.
आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचे निर्णय स्वतः घेणे आणि त्याच्या परिणामांची सुद्धा संपूर्ण जबाबदारी घेणे, समोर आलेल्या परिस्थितीसमोर हतबल होऊन हातपाय न गाळता आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर त्या समस्येवर मात करणे, हे एक व्यक्ती म्हणून सावित्रीचा विकास किती परिपूर्ण झाला आहे याचे निदर्शक आहे.
जर वटसावित्रीची आपण पूजा करणार असलो तर प्रत्येक स्त्रीला या कथेतील हा सगळा भाग ज्ञात असणे आवश्यक आहे. या कथेतून यमाच्या तावडीतून नवऱ्याला सोडवून आणणे हा भाग गौण आहे. एक व्यक्ती म्हणून आयुष्यातील सगळे निर्णय स्वतः घेणे, त्याच्या परिणामांची कल्पना असूनही आपल्या तत्वांशी तडजोड न करणे आणि ज्यावेळी सर्वस्व पणाला लावायची वेळ येईल त्यावेळी त्या पातळीवरील त्यागाच्यासाठी सुद्धा उद्युक्त असणे, हे दैवी गुण ही कथा आपल्याला आत्मसात करायला प्रेरित करते.
ही कथा प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलीला असे स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रेरणास्त्रोत म्हणून सांगितली पाहिजे. ही कथा प्रत्येक पुरुषाने, आपल्याला सावित्रीसारखी गुणवान पत्नी हवी असेल तर आपल्याला सुद्धा तितके चांगले लोकोत्तर गुण आत्मसात करायला हवे हे ध्यानात घेण्यासाठी वाचली पाहिजे.
यातील स्त्रीचे शोषण आणि पुरुषप्रधान संस्कृतीचे वर्चस्व शोधून काढणारे लोक महान आहेत. या कथेत पुरुषप्रधान संस्कृतीचे अवशेष शोधणाऱ्या लोकांना माझा प्रश्न :— ज्या प्रमाणे सावित्री स्वतःला हवा तो वर निवडते आणि त्या पुढील घडणाऱ्या घटनाक्रमाची जबाबदारी घेते, इतके स्वतंत्र आणि परिपक्व तुम्ही तुमच्या मुलीला वाढवले आहे का? तिने तसे वागले तर तुम्हाला चालेल पटेल का ? तुम्ही तुमच्या मुलीला तितके स्वातंत्र्य दिले आहे का ?—-
लेखक : श्री सुजीत भोगले
संग्राहिका : सुश्री गीता पटवर्धन
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈