☆ अष्टपैलू आचार्य ☆ प्रस्तुती – श्री सुरेश नावडकर ☆
एकोणीसावं शतक संपताना पुण्याजवळील सासवड येथील कोडित खुर्द गावात १३ आॅगस्ट १८९८ साली, एक ‘सरस्वती पुत्र’ जन्माला आला.. ज्यानं अवघ्या ७१ वर्षांच्या आयुष्यात साहित्य, नाट्य, चित्रपट, पत्रकारिता, राजकारण, शिक्षण, इ. क्षेत्रात मोलाची कामगिरी केली.. त्यांचं नाव, प्रल्हाद केशव अत्रे!
पाचवीत असतानाच, माझ्या वडिलांनी ‘मी कसा झालो’ हे अत्र्यांचं पुस्तक वाचायला हातात दिलं.. त्या पुस्तकात आचार्य अत्र्यांनी, लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत कसे घडत गेले, ते लिहिलेलं आहे. शाळेत असतानाच ‘श्यामची आई’ हा चित्रपट पाहिला.. तो हृदयस्पर्शी चित्रपट पाहून, मन हेलावून गेलं. दहावीच्या दरम्यान मी वाचनालयातून ‘कऱ्हेचे पाणी’चे पाचही खंड आणून, वाचून काढले..
नाटक-चित्रपटांच्या जाहिराती करताना, आचार्य अत्रे यांच्या लग्नाची बेडी, मोरुची मावशी, तो मी नव्हेच, भ्रमाचा भोपळा, प्रितीसंगम, ब्रह्मचारी या नाटकांच्या जाहिराती केल्या. थोडक्यात, आचार्य अत्रेंना जरी प्रत्यक्ष मी पाहिलेलं नसलं तरी त्याचं साहित्य वाचून, नाटक व चित्रपट पाहून त्यांना गुरुस्थानी मानलं..
आचार्य अत्रे इतके भाग्यवान की, राम गणेश गडकरींच्या ते संपर्कात होते. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे शिष्य, राम गणेश गडकरी.. राम गणेश गडकरींचे शिष्य.. आचार्य अत्रे! संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा अर्धपुतळा, आचार्य अत्रे यांच्याच शुभहस्ते बसविलेला आहे..
आचार्य अत्रे यांनी शालेय शिक्षणानंतर फर्ग्युसन काॅलेज व पुणे विद्यापीठातून पदवीधर झाल्यानंतर, शिक्षक म्हणून नोकरीस सुरुवात केली. १९२८ साली लंडनमध्ये जाऊन टी.डी. ही पदवी घेतली.
अत्रे यांची साहित्यिक व पत्रकारिता म्हणून कारकीर्द १९२३ च्या ‘अध्यापन’ या मासिकापासून सुरु झाली. २६ साली ‘रत्नाकर’, २९ साली ‘मनोरमा’, ३५ साली ‘नवे अध्यापन’, ३९ साली ‘इलाखा शिक्षक’, ४० साली साप्ताहिक ‘नवयुग’, ४७ साली सायंदैनिक ‘जयहिंद’, ५६ साली दैनिक ‘मराठा’ अशी आहे..
चित्रपटाच्या बाबतीत अत्रे यांनी सुरुवातीला कथा, पटकथा व संवाद लिहिले आहेत. १९३४ साली ‘नारद नारदी’ चित्रपटापासून या क्षेत्रात त्यांनी पदार्पण केले. ३८ साली ‘ब्रह्मचारी’ चित्रपटाची कथा लिहिली. त्यांच्या ‘ब्रॅंडीची बाटली’ या चित्रपटानेही अफाट लोकप्रियता मिळवली. १९५४ सालातील ‘श्यामची आई’ या चित्रपटाने पहिला राष्ट्रीय पुरस्कार व सुवर्णकमळ मिळविले.
आचार्य अत्रे हे हाडाचे शिक्षक होते, त्यांनी सुरुवातीला मुंबईत काही महिने शिक्षकाची नोकरी करताना इंग्रजी, गणित, संस्कृत विषय शिकविले. नंतर पुण्यात येऊन कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे मुख्याध्यापक म्हणून १८ वर्षे काम केले. तसेच पुण्यात राजा धनराज गिरजी व मुलींसाठी आगरकर हायस्कूलची स्थापना केली. १९३७ साली नगर पालिकेच्या निवडणुकीत निवडून आल्यावर शिक्षकांसाठी ट्रेनिंग काॅलेज काढले. प्राथमिक शाळेसाठी, नवयुग वाचनमाला व दुय्यम शाळेसाठी अरूण वाचनमाला, अशी पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली.
आचार्य अत्रे यांची भाषणे त्याकाळी फार गाजलेली होती. सदानंद जोशी यांनी ‘मी अत्रे बोलतोय’ या एकपात्री प्रयोगातून त्यांच्या भाषणकलेचा आस्वाद अनेक वर्षे प्रेक्षकांना दिला.
१३ जून हा दिवस, पाश्चिमात्त्य देशांत अशुभ मानला जातो.. १९६९ साली त्याचा प्रत्यय महाराष्ट्रात देखील आला.. याच दिवशी आचार्य अत्रे, अनंतात विलीन झाले.. त्यांचा जन्मही १३ तारखेचा व मृत्यूही १३ तारखेलाच.. विलक्षण योगायोग! त्यांना जाऊन ५३ वर्षे झालेली आहेत.. मात्र अजूनही ते आपल्याला पुस्तकातून, भाषणांतून, नाटकांतून, चित्रपटांतून आसपासच आहेत असं वाटतं.. खरंच अशी मोठी माणसं जरी शरीराने गेलेली असली तरी त्यांच्या कर्तुत्वाने शतकानुशतके, अमरच असतात..
आचार्य अत्रे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!!!
© सुरेश नावडकर
१३-६-२२
मोबाईल ९७३००३४२८४