सुश्री शुभदा जोशी

? मनमंजुषेतून ?

 ☆ शोध आनंदाचा…भाग -2 ☆ सुश्री शुभदा जोशी ☆ 

माझा स्वभाव कृतीशील आहे. सतत काही ना काही करण्यासाठी माझं मन प्रवृत्त होत असतं. एकेकदा फरपट व्हावी एवढी ही कृतिशीलता! माझ्या समवेतच्या लोकांनादेखील ती अस्वस्थ बनवते. त्याच्या जोडीला मला सगळ्याचीच खूप घाई असते. ही घाई मला थांबू देत नाही, रमू देत नाही कशातही.

‘ चला …’ अशी हाक माझ्या आतून वारंवार उचल खात असते. कुठे जायचंय? कुठे पोचायचंय? आणि तिथे पोचल्यावर तरी मिळणार आहे का आनंद? की पुन्हा, चला…? माझ्या आनंदाला माझ्याच स्वभावातल्या अशा काही गोष्टी ग्रहण लावतात.

कसा बनला असेल हा स्वभाव?

मला स्वतःवर काम करायला आवडते. मानसशास्त्र हा काही माझा विषय नाही. पण मला जर आनंदाचा शोध घ्यायचा झाला तर मला माझ्या मनाबद्दल समजून घ्यायला हवे ना?

प्रश्न पडायला लागल्यापासून या संदर्भात काहीही ऐकू आलं तर मी कान टवकारते. पुस्तकं, लेक्चर्स, वर्कशॉप्स, अभ्यास गट अशा मिळेल त्या मार्गाने मी शोध घेत रहाते. जिवंत रहाण्यासाठी मला ते आवश्यक वाटते. कुठून कुठून काही काही समजत जातं आणि पावलापुरता प्रकाश मिळतो.

आपल्या स्वभावातल्या गमती जमती समजतात आणि त्यातून मार्ग काढायच्या युक्त्याही समजतात.

लहानाचं मोठं होत असताना, आपल्या काही गरजा पूर्ण होत नाहीत, मनाजोगे घडत नाही. त्या वेळी आपल्या हातात काहीच नसतं. या प्रकारच्या भावनांच्या वादळांतून वाट काढताना, जाणता अजाणता काही मार्ग शोधले जातात.

जसं की संतापी अभिव्यक्ती, स्वतःला दोष देत राहणं, मनाला लावूनच न घेणं अशा वेगवेगळ्या मार्गांनी आपण स्वतःला वाचवतो. आजूबाजूच्या इतर माणसांचे अनुकरण आणि प्रभाव देखील असतात या निवडीवर. त्या त्या वेळी आपण काढलेल्या मार्गांची, patterns ची नंतर सवयच होऊन जाते.  

खरं तर आज तसं वागायची गरज नसते. पण ते patterns अगदी पक्के भिनलेले असतात आपल्यात. स्वभावच बनून गेलेला असतो तो!  पण स्वभाव बदलता येतो हे मी अनुभवातून सांगते.

शालेय वयात विविध कारणानी जोपासल्या गेलेल्या माझ्यातल्या न्युनगंडावर मात करण्यासाठी शोधलेला हा मार्ग असू शकतो, हे आता समजते. आता वयाच्या या टप्प्यावर गरज नाहीये या ‘घाईची’ आणि स्वतःची फरपट करणा-या ‘कृतीशीलतेची’ देखील! उलट ह्या दोन्ही गोष्टी, एकाग्र होऊन माझे आकलन, समज एकत्र बांधण्याच्यामध्ये, आनंदाच्या वाटेवर अडथळाच बनत आहेत.

हे लक्षात येणं खूप भारी आहे! आता मी सांगू शकते माझ्या मनाला…

माझिया मना…

जरा थांब ना

धावणे तुझे 

अन मला वेदना…

©  सुश्री शुभदा जोशी  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments