श्री अरविंद लिमये
विविधा
☆ ‘थोडी सोडायलाच हवी अशी जागा..!’ ☆ श्री अरविंद लिमये ☆
‘माया’ या शब्दाचे शब्दकोशातले अनेक अर्थ आपल्याला या शब्दाचा अर्थ सांगू शकतील फक्त. पण ‘माया’ या शब्दाची व्याप्ती त्या अर्थापुरती मर्यादित नाहीय याची ओझरती कां होईना जाणीव करून देईल ते फक्त संत-साहित्यच !
अनेक संत-महात्म्यांनी त्यांच्या विविध साहित्य रचनांमधून जगण्याचं तत्त्वज्ञान सामान्य माणसालाही समजेल, पटेल, रुचेल अशा सोप्या शब्दात सांगितलेले आहे. श्री शंकराचार्यांचे अद्वैत तत्वज्ञान रामदासस्वामींनी त्यांच्या ‘दासबोध’ या ग्रंथात अतिशय सोपे करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात त्यांनी अतिशय सोप्या,सुलभ पद्धतीने, क्लिष्ट न वाटता बोध घेता येईल असे त्याचे सविस्तर विवरण केलेले आहे. दासबोध हा अत्यंत सखोल अभ्यासाचा विषय आहे हे खरेच पण ‘माया’ या संकल्पनेची व्याप्ती सोप्यापद्धतीने जाणून घेण्यासाठी तो एक सहजपणे उपलब्ध असणारा मार्ग आहे हेही तितकेच खरे. रामदासस्वामींनी दासबोधात ‘माया’ या शब्दाचा वापर विवेचनाच्या ओघात अनेकदा आणि तोही मूळमाया, महामाया, अविद्यामाया अशा अनेक वेगवेगळ्या रुपात केलेला आहे.आजच्या लेखनसूत्रासाठी यातील ‘वैष्णवीमाया’ या संकल्पनेचे प्रातिनिधिक उदाहरण घेऊया.’वैष्णवीमाया’ म्हणजे विष्णूची म्हणजेच परमात्म्याची माया! ही माया मोहात पाडणारी आहे. विधात्याने निर्माण केलेली सृष्टी म्हणजेच हे विश्वाचे अवडंबर!मायेने निर्माण केलेले एक दृश्यरुप! या विश्वात जे जे चंचल,जड,अशाश्वत ते ते सर्व या मायेचाच पसारा! या मायेने संपूर्ण ब्रह्म आच्छादलेले आहे. या मायेला अलगद बाजूला सारून ‘ब्रम्ह’ जाणून घेणे म्हणजे ज्ञान! अर्थात ते प्राप्त करून घेणे सर्वसामान्यांच्या दृष्टीने अतिशय गूढ,अशक्यप्राय वाटावे असेच आणि म्हणूनच संतसाहित्य त्यांना ते अधिक सोपे,सुकर करुन समजावून सांगते.अतिशय सोप्या शब्दात हे संतसाहित्य माणसाला जगावे कां, कसे आणि कशासाठी हे शिकवते.
गंमत म्हणजे माणसाचे हे जगणे सहजसुंदर करण्यासाठी वेगळ्या अर्थाने त्याच्या मदतीला येते ती मायाच.माया चंचल, अशाश्वत जशी तशीच वात्सल्य, प्रेम आणि मार्दवही! मायेला जेव्हा माणुसकीचा स्पर्श होतो तेव्हा ममता,जिव्हाळा,आपुलकी, आत्मीयता,ओलावा,प्रेम,स्नेह अशा विविध रंगछटा मायेला अर्थपूर्ण बनवतात.या लोभस रंगांनी रंगलेली माया माणसाचं अशाश्वत जगातलं जगणं सुसह्य तर करतेच आणि सुंदरही.ही माया माणसाच्या जगण्याला अहम् पासून अलिप्त करीत दुसऱ्यांसाठी जगायला प्रवृत्त करते. दुसऱ्याला स्नेह,प्रेम,आनंद देणाऱ्यालाही ती आनंदी करते. या मायेला विसरून माणूस जेव्हा ‘अहं’शी लिप्त होऊन जातो तेव्हा तो मायेच्या पैसा-अडका, धनदौलत या मायाजालात गुरफटून भरकटत जाऊ लागतो. जगण्यातला आनंदच हरवून बसतो. मायेच्या ‘मायाळू’ आणि ‘मायावी’ अशा दोन्ही परस्परविरोधी रुपांमधला फरक संतसाहित्यच आपापल्या पध्दतीने सामान्य माणसालाही समजेल असे सांगत असते. आणि मग त्याला सारासार विचार, आणि नित्यविवेक अंगी बाणवून स्वार्थाचा लोप करीत सावली देणारा परमार्थ समजून घेणे सोपे जाते. यातील ‘सारासार विचार’ म्हणजे तरी नेमके काय?
पंचमहाभूतांनी बनलेला,जड, म्हणजेच अनित्य या अर्थाने ‘देह’ हा ‘असार’,अशाश्वत आणि नित्य ते शाश्वत या अर्थाने ‘आत्मा’ हा ‘सार’! हा ‘सारासार’ विचार हीच आपल्या ठायी वसणाऱ्या अंतरात्म्यातील परमात्म्याला जाणून घेण्याची पहिली पायरी!या पायरीवरच्या आपल्या पहिल्या पाऊलातच मायेला चिकटलेला स्वार्थ अलगद गळून पडलेला असेल.
‘माया’ या शब्दाच्या वर उल्लेखित अर्थांपेक्षा वरवर अतिशय वेगळा वाटणारा आणखी एक अर्थ आहे.या अर्थाचा वरील सर्व अर्थछटांशी दुरान्वयानेही कांही सबंध नाहीय असे वाटेल कदाचित,पण हा वेगळा भासणारा अर्थही माणसाच्याच जगण्याशी नकळत आपला धागा जोडू पहातोय असे मला वाटते.
शिवताना दोरा निसटू नये म्हणून वस्त्राचा थोडा भाग बाहेर सोडला जातो त्याला ‘माया’ असेच म्हणतात. लाकडावर एका सरळ रेषेत खिळे ठोकताना लाकडाच्या फळीवरचा मोकळा ठेवला जाणारा थोडा भाग त्यालाही ‘माया’ म्हणतात. कापड कापतानाही अशी थोडी माया सोडूनच कापले जाते.लेखन करताना कागदाच्या डाव्या बाजूला थोडी माया सोडूनच केले जाते.अशा अनेक ठिकाणी जाणिवपूर्वक सोडाव्या लागणाऱ्या जागांचा निर्देश करणारी माया! या मायेला जगताना माणसानेही ‘अहं’ पासून थोडी माया सोडून जगणंच अपेक्षित आहे याचे भान आपण कधीच विसरुन चालणार नाही !!
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈